होमपेज › Kolhapur › जवानांना टोल नाक्यांवर सॅल्यूट!

जवानांना टोल नाक्यांवर सॅल्यूट!

Published On: Dec 15 2017 2:49AM | Last Updated: Dec 15 2017 2:46AM

बुकमार्क करा

कोल्हापूर : विजय पाटील

रात्रंदिवस डोळ्यात तेल घालून देशासाठी तैनात असणार्‍या लष्करी जवानांना टोल नाक्यांवर आदरार्थी सलाम देण्याचा आदेश राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने काढला आहे. जवानांना टोलमाफीही असणार आहे.प्रवास करणार्‍या जवानांना सैनिकहो तुमच्यासाठी ‘सॅल्यूट’, असा अनुभव येणार आहे. 

जवान जीवाची पर्वा न करता देशासाठी लढतात. देशाच्या सीमा जवान सुरक्षित ठेवतात म्हणून देशवासीय शांततेने जगतात.  जवानांप्रती सर्वांनाच आदर असतो. वेळोवेळी लोक हा आदरभाव व्यक्‍त करत असतात; पण आता सार्वजनिक ठिकाणीही जवानांना सन्मान देण्याचा चांगला उपक्रम महामार्ग प्राधिकरणाने सुरू केला आहे. टोल नाक्यांवरील प्रमुखाने सलाम करावा, असे निर्देश देण्यात आले आहेत. तसेच जवानांना टोलमाफी असणार आहे. जवानांचे आयकार्ड तपासण्यासाठी प्रशिक्षित आणि सक्षम कर्मचारी टोल नाक्यांवर चोवीस तास उपस्थित असावा, अशा सूचना या आदेशात देण्यात आल्या आहेत.

राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण या सर्वोच्च संस्थेने हा आदेश काढला असल्याने राज्य महामार्ग तसेच अंतर्गत मार्गावरील टोल नाक्यांवरही जवानांना आदरभाव व्यक्‍त करणारा सलाम दिला जाणार आहे.
यापूर्वी टोल नाक्यांवर जवानांना अनेकवेळा चुकीची वागणूक मिळत असल्याच्या तक्रारी आल्या होत्या. सूचना करूनही या तक्रारी कमी होत नव्हत्या. आता मात्र हा आदेश काढण्यात आला आहे.