महाड : प्रतिनिधी
343 वर्षांपूर्वी किल्ले रायगडावर सप्त नद्यांच्या अभिषेकामध्ये सार्वभौम राजाचा राज्याभिषेक सोहळा साजरा झाला होता. बुधवारी हजारो शिवभक्तांच्या उपस्थितीमध्ये किल्ले रायगडाच्या राजदराबारामध्ये तारखेनुसार अखिल भारतीय राज्याभिषेक महोत्सव समिती, दुर्गराज रायगड यांच्या संयुक्त विद्यमाने हा सोहळा साजरा होणार आहे. या महोत्सवास किल्ले रायगड प्राधिकरणाचे अध्यक्ष खा. छ. संभाजीराजे यांच्यासह त्यांचे सुपुत्र युवराज शहाजीराजे उपस्थित राहणार आहेत.
या शिवराज्याभिषेकदिनी लाखो शिवभक्त किल्ल्यावर येतात. त्यामुळे मोठा पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला असून, वाहतूककोंडी टाळण्यासाठी पाचाडपर्यंतच या वाहनांना प्रवेश दिला जाणार आहे.रायगड विकास प्रधिकरणातर्फे सोमवारी गडाची स्वच्छता व अन्नछत्राचे उद्घाटनही झाले. दुपारी 3.30 वा. चित्तदरवाजामार्गे छ. संभाजीराजे आणि युवराज शहाजीराजे शिवभक्तांसमवेत पायी गडावर गेले. नगारखाना येथे 21 गावांतील सरपंच व पंचक्रोशीतील ग्रामस्थांच्या उपस्थितीत गडपूजन झाले. गडावर उत्खननात मिळालेल्या वस्तूंच्या प्रदर्शनाचे उद्घाटन संभाजीराजे यांच्या हस्ते झाले. होळीच्या माळावर मर्दानी खेळांचे प्रात्यक्षिक, शाहिरी जलसा, छ. संभाजीराजे यांनी शिवभक्तांशी थेट संवाद साधला. रात्री 8.30 वा. गडदेवता शिरकाई देवीचा गोंधळ घालण्यात आला. जगदीश्वर मंदिरात वारकरी सांप्रदायांकडून जगदीश्वराचे कीर्तन, जागर, काकडआरती, शाहिरी कार्यक्रम झाला. रायगडावर राज्य राखीव दल, शीघ्रकृती दलाच्या दोन तुकड्या तैनात केल्या आहेत. तीन उपविभागीय पोलिस अधिकारी, नऊ पोलिस निरीक्षक, 18 एपीआय, पीएसआय, 168 कर्मचारी, 25 महिला कर्मचारी, 65 वाहतूक पोलिस, 20 वॉकीटॉकी कर्मचारी यांसह बॉम्ब शोधक पथक तैनात केले आहे.
आजचे कार्यक्रम
सकाळ 6 वा. नगारखाना येथे ध्वजपूजन, 6.50 वा. राजसदरेवर शाहिरी कार्यक्रम, 9.30 वा. छ. शिवाजी महाराजांच्या पालखीचे राजसदरेवर आगमन, 9.50 वा. छ. संभाजीराजे व युवराज शहाजीराजे यांचे राजसदरेवर स्वागत, 10.10 वा. छ. संभाजीराजे यांच्या हस्ते छ. शिवाजी महाराजांवर अभिषेक तसेच मेघडंबरीतील छ. शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला सुवर्ण नाण्यांचा अभिषेक, 10.25 वा. समितीचे अध्यक्ष फत्तेसिंग सावंत यांचे प्रास्ताविक, 10.30 वा. छ. संभाजीराजे यांचे शिवरायांना अभिवादन, 11 वा. शिवपालखी सोहळा. या पालखी सोहळ्याची सांगता जगदीश्वर मंदिर व छ. शिवाजी महाराज यांच्या समाधीस्थळी करण्यात येणार आहे.