Thu, Jun 20, 2019 01:08होमपेज › Kolhapur › उचंगी प्रकल्पात जूनपासून पाणी साठवणार

उचंगी प्रकल्पात जूनपासून पाणी साठवणार

Published On: Jan 29 2018 1:40AM | Last Updated: Jan 28 2018 11:25PMगडहिंग्लज : प्रतिनिधी

गडहिंग्लज उपविभागातील पाण्याच्या समस्येबाबत केदारी रेडेकर फौंडेशनने घेतलेली पाणी परिषद ही चांगली बाब असून, येत्या जून महिन्यापासून आजरा तालुक्यातील उचंगी प्रकल्पामध्ये कोणत्याही परिस्थितीत पाणी अडवणार असल्याची घोषणा पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी करून आजच्या पाणी परिषदेतील बहुतांशी मागण्या येत्या महिनाभरामध्ये पूर्णत्वास जातील, अशी ग्वाहीही यावेळी दिली. परिषदेच्या अध्यक्षस्थानी केदारी रेडेकर समूहाच्या अध्यक्षा अंजनाताई रेडेकर होत्या.

स्वागत प्रा. सुनील शिंत्रे यांनी करताना, गडहिंग्लज उपविभागामध्ये असलेल्या पाण्याच्या विविध समस्या सोडवणूक करण्यासाठी काय उपाययोजना करणे आवश्यक आहे, याबाबत सविस्तर मनोगत व्यक्त केले. यावेळी बोलताना ना. पाटील म्हणाले, यापुढील काळामध्ये केवळ पाण्यासाठीच भांडणे होतील, त्यामुळे याकडे आपण गांभीर्याने लक्ष देणे आवश्यक आहे. यापूर्वी सिंचनासाठी असलेला पैसाच पाण्यात गेल्यामुळे पाण्याचे सिंचनच झाले नाही. आता महाराष्ट्रासाठी 26 हजार कोटींची तरतूद सिंचनासाठी केली असून, यामधून प्रलंबित असलेले सर्वच प्रकल्प पूर्णत्वास जातील. आजच्या या पाणी परिषदेमध्ये मांडलेले बहुतांशी प्रश्‍न हे येत्या 15 दिवसांत नक्की पूर्ण करणार असून, मुळातच या प्रश्‍नांची सोडवणूक करण्याचे काम गेल्या अनेक दिवसापासून सुरू आहे. ठिबकसाठी सर्वच शेतकर्‍यांची प्रयत्न करावेत याशिवाय पाणी बचतीसाठी सर्वानीच सामूहीक प्रयत्न करावेत असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.

या परिषदेमध्ये आमदार सतेज पाटील यांनी पाण्याच्या चळवळीसाठी विरोधी बाकावर बसूनही सरकारकडे पाठपुरावा करू. सत्ताधारी मंडळींनी यासाठी पाठपुरावा करून हा प्रश्‍न संपुष्टात आणावा. पाण्याच्या विषयावर आपण गडहिंग्लजकरांच्या सोबत असल्याचे स्पष्ट केले. आम. संध्यादेवी कुपेकर यांनी गडहिंग्लज उपविभागातील पाणी प्रश्‍नांबाबत स्वर्गीय कुपेकरांनी केलेला कामाचा आढावा घेत त्यांच्या नियोजनामुळेच आज बराचसा परिसर पाणी टंचाईपासून मुक्त आहे. यापुढेही त्यांचे काम पुढे नेणार असून शासनदरबारी प्रयत्न करणार असल्याचे मत व्यक्त केले.

यावेळी हमीदवाडाचे चेअरमन संजय मंडलिक, माजी आमदार अ‍ॅड.श्रीपतराव शिंदे, संग्रामसिंह कुपेकर, जयवंत शिंपी, प्रा.किसनराव कुराडे यांनी मनोगतातून पाणी परिषदेबाबत आपली मते मांडली. अनंत पाटील यांनी उपस्थितांना पाणी बचतीची शपथ दिली. जलसंपदा राज्यमंत्री शिवतारे हे उपस्थित राहू न शकल्याने त्यांचे प्रतिनिधी म्हणून आम. सुनिल शिंदे यांनी उपस्थित होते.त्यांनीही यावेळी मनोगतामध्ये या पाणीपरिषदेची सर्व माहिती जलसंपदा मंत्र्यापर्यत पोहचवतो व पुढील कामासाठी पाठपुरावा करण्याचे आश्‍वासन दिले. कार्यक्रमास गोडसाखरचे व्हा.चेअरमन संग्रामसिंह नलवडे, प्रकाशराव चव्हाण,गडहिंग्लज सभापती जयश्री तेली,आजरा सभापती रचना होलम, जयवंत शिंपी, माजी मंत्री भरमू पाटील, संजयबाबा घाटगे,  जि.प.सदस्य सतिश पाटील, उमेश आपटे, चंदगड तालुका संघाचे चेअरमन राजेश पाटील यांच्यासह अन्यजण उपस्थित होते. केदारी रेडेकर समूहाच्या अध्यक्षा अंजनाताई रेडेकर यांनी आभार व्यक्त केले. 

पाणी परिषदेतील 8 ठराव...

यावेळी आठ ठराव करण्यात आले. यामध्ये उचंगी, सर्फनाला व आंबेओहोळ प्रकल्प पूर्ण करावा,गडहिंग्लज उपविभागासाठी 5 टीएमसी वाढीव पाणी मिळावे, हलकर्णी विभागाचा पाणी प्रश्‍न संपवावा, प्रकल्पग्रस्तांचे पुर्नवर्सन आधी, जलसाक्षरता चळवळ जोरदार राबवणे, आजरा येथील शेतकर्‍याच्या योगदानाबददल अभिनंदन,किटवडे प्रकल्प मंजूर करावा, चित्रीचे लाभ क्षेत्र वाढवणे असे आठ ठराव मांडण्यात आले. ते सर्वानुमते मंजूर करण्यात आले. ठराव वाचन अ‍ॅड.दिग्वीजय कुराडे यांनी केले.

आ.मुश्रीफांची दादांच्यावर चौफेर टोलेबाजी.....

या पाणीपरिषदेमध्ये पालकमंत्री चंद्रकांत पाटील हे भाषण करून गेल्यावर आमदार हसन मुश्रीफ आले व त्यांनी आपल्या भाषणामध्ये दादांच्यावर चौफेर टोलेबाजी केली. आ.मुश्रीफ म्हणाले, दादांना कायम घाईच असते लोकांच्यासाठी वेळ देत नाहीत. दादा तेच तेच बोलत असून या पाणीपरिषदेतील सर्व विषय सोडवणे त्यांच्यासाठी किरकोळ बाब आहे. सर्व प्रस्ताव त्यांच्याच टेबलवर पडलेले असून त्यांनी मनावर घेतले तर या विभागातील पाणी प्रश्‍न पाच मिनीटात सोडवू शकतात. राज्यातील दोन नंबरची खुर्ची त्यांच्याकडे आहे या विभागासाठी 77 कोटी जाता जाता देवू शकतात मात्र त्यांनी अदयाप मनावर घेतलेले नाही. दुर्देवाने त्यांचे भाषण ऐकावयास मी नव्हतो. कदाचित गडहिंग्लजकरांना कोरा चेक देवून गेले काय बघा असेही त्यांनी स्पष्ट केले. दीड वर्षापूवी झालेल्या तमनाकवाडा येथील पाणी परिषदेवेळी चंद्रकांत पाटील यांनी एकनाथ खडसेंना हे खाते तुमच्याकडे आहे आठ दिवसात निर्णय घ्या असे सांगितले होते त्याची आठवणही मुश्रीफांनी करून देताना त्यानंतर लगेचच खडसेंचे खाते जावून ते दादांच्याकडे आले आता त्याला दीड वर्षे झाले पण दादांनी काहीच केले नाही अशीही खोचक टिका केली.