Sun, Apr 21, 2019 14:34होमपेज › Kolhapur › छेडछाडीविरोधात आवाज उठवा

छेडछाडीविरोधात आवाज उठवा

Published On: Jul 02 2018 1:51AM | Last Updated: Jul 01 2018 11:58PMकोल्हापूर : गौरव डोंगरे 

छेडछाडीला कंटाळून आत्महत्येचे पाउल उचलण्याचे प्रकार कोल्हापुरात घडले आहेत; पण छेडछाड रोखण्यासाठी महिलांनीच निर्भयपणे आवाज उठविण्याची गरज आहे. शनिवारी मंगळवार पेठेत छेडछाड करणार्‍या एका विकृताला नागरिकांनी चोप देत पोलिसांच्या हवाली केले. हा विकृत तरुण मागील दीड महिन्यापासून असे प्रकार करत असल्याचे तपासात पुढे आले आहे. 

बोंद्रेनगर परिसरात वारंवार होणार्‍या छेडछाडीला कंटाळून पल्लवी बोडेकर व गीता बोडेकर या युवतींनी आत्महत्या केल्याच्या घटना मागील दोन वर्षात घडल्या आहेत. अशा अनेक पल्लवी आणि गीतांचा आवाज दबलेला आहे. वर्गातील मित्र, महाविद्यालय आवारात फिरणारे रोडरोमिओ, नोकरीच्या ठिकाणी असणारे सहकारी यांच्याविरोधात बोलण्याचे धाडस अनेकदा महिला करीत नाहीत. परिणामी, अशा प्रकारांना वेळीच आळा घालण्याची गरज आहे. 

राजारामपुरी, मंगळवार पेठ परिसरात गेले दीड महिने एका विकृत तरुणाकडून महिलांची छेड काढण्याचे प्रकार सुरु होता. घराच्या अंगणात पाणी मारण्यास, रांगोळी काढण्यास येणार्‍या महिलांचा हात पकडण्याचा प्रकार या विकृत तरुणाने अनेकदा केला. मोटारसायकलवरून येणारा हा विकृत तरुण नंबरप्लेट कापडाने झाकत होता. हा प्रकार राजारामपुरीतील काही तरुणांच्या निदर्शनास आला. या तरुणांनी याकडे गांभीर्याने लक्ष घालून त्याला पकडण्याचा निर्धार केला. पहाटेपासून ‘वॉच‘ ठेवून तरुणांनी त्या विकृताचा माग काढला. या तरुणांची ही कृती अभिनंदनास पात्र असल्याने राजारामपुरीतील या तरुणांचा सत्कार करण्यात आला. 

छेडछाडीच्या घटना रोखण्यासाठी निर्भया पथके पोलिसांनी तैनात केली आहेत. पण, प्रत्येक ठिकाणी पोहोचणे सहज साध्य होणारे नाही. छेडछाड ही अनेकदा ओळखीच्या व्यक्तीकडून होत असल्याचे समोर आले आहे. 

महिलांनी धडा शिकवण्याची गरज

अन्यायाला वाचा फोडण्यासाठी महिलांनी धाडसाने अशा रोडरोमिओंना धडा शिकविण्याची गरज आहे. भरचौकात रोडरोमिओंना याचा जाब विचारला गेला पाहिजे. मिरजकर तिकटी परिसरात एका रणरागिणीशी उर्मट वर्तन करणार्‍या तरुणाला अडवून त्याला कानाखाली लगावली होती. तिच्या कृतीचे कौतुक झाले. 

विनयभंगाच्या गुन्ह्यात वाढ

छेडछाडप्रकरणी विनयभंगाचा गुन्हा पोलिस ठाण्यात नोंदविला जातो. 2016 मध्ये 177 गुन्हे नोंद झाले होते. तर 2017 मध्ये 217 गुन्ह्यांची नोंद झाली. यावर्षी जानेवारी ते मेअखेर 116 गुन्हे दाखल झाले आहेत. पाच महिन्यांतील ही आकडेवारी मोठी आहे.