Sun, May 26, 2019 18:42होमपेज › Kolhapur › उत्पादन खर्चावर आधारित शेतीमालाचा दर ठरविणार : पाशा पटेल 

उत्पादन खर्चावर आधारित शेतीमालाचा दर ठरविणार : पाशा पटेल 

Published On: May 08 2018 1:56AM | Last Updated: May 08 2018 1:06AMकोल्हापूर : प्रतिनिधी

शेती उत्पादनाचा खर्च वेगवेगळ्या कारणांमुळे बदलत असतो; पण शेतीमालाचा दर ठरविताना त्याचा विचार केला जात नव्हता. यापुढे ही परिस्थिती राहणार नाही. आता या घटकांची शास्त्रीय पद्धतीने मांडणी केली जाणार असल्याने शेतकर्‍यांच्या मालाला निश्‍चितपणे चांगला दर मिळेल, असा विश्‍वास राज्य कृषिमूल्य आयोगाचे अध्यक्ष पाशा पटेल यांनी पत्रकार परिषदेत बोलताना व्यक्‍त केला. 

विदर्भ, मराठवाड्यात चांगला पाऊस झाल्याने ऊस क्षेत्रात वाढ झाली आहे. त्यामुळे साखरेचे अतिरिक्‍त उत्पादन झाले आहे. मात्र, ही तात्पुरती समस्या आहे. स्थानिक बाजारात साखरेचे दर वाढण्यासाठी साखर निर्यातीला चालना देण्याची गरज असल्याचे सरकारला सुचवले असल्याचेही त्यांनी सांगितले. 

उत्पादन खर्चाची माहिती संकलनासाठी 279 गावांत केंद्रे

पटेल म्हणाले, आठ महिन्यांपूर्वी आयोगाची स्थापना झाली. आयोग स्थापन झाल्यानंतर केंद्र सरकारला 23 शिफारशी केल्या. त्यानंतर शेतीमालाच्या उत्पादनासाठी किती खर्च येतो, याची माहिती संकलित करण्याचा निर्णय झाला. त्यासाठी राज्यात 279 केंद्रांची स्थापना केली आहे. या प्रत्येक गावांत विविध पिके घेत असलेल्या 10 शेतकर्‍यांच्या उत्पादन खर्चाच्या नोंदी ठेवल्या जात आहेत. या सर्व नोंदी शेतकर्‍यांकडून घेतल्या जातील. याची सर्व माहिती राज्यपातळीवर एकत्रित करण्यात येणार आहे. त्यातून शेतीमाल उत्पादनासाठी किती खर्च आला, याची माहिती येईल. त्यातून शेतीमालाला किती भाव दिला पाहिजे, हे ठरविण्यात येणार आहे. देशातील प्रत्येक राज्यात ही माहिती संकलित केली जात आहे. ही माहिती एकत्र करून दर ठरविण्यात येणार आहे. यातून शेतकर्‍यांना उत्पादन खर्च अधिक रक्‍कम मिळाली पाहिजे, त्यासाठी सरकारकडून प्रयत्न सुरू आहेत.

साखरेप्रमाणे तुरीचा प्रश्‍न गंभीर

यंदा साखरेप्रमाणे मराठवाडा, विदर्भात तुरीचा प्रश्‍न गंभीर बनला आहे. 2 कोटी 35 लाख क्‍विंटल तुरीचे उत्पादन झाले आहे. राज्य सरकारने 77 लाख क्‍विंटल तुरीची खरेदी केली आहे.

पाडळी खुर्दला भेट 

शेतीमाल उत्पादन खर्चाची माहिती घेण्यासाठी राज्य कृषिमूल्य आयोगाने राज्यात ज्या 279 गावांत केंद्रे सुरू केली आहेत, त्यामध्ये करवीर तालुक्यातील पाडळी खुर्द या गावाचा समावेश आहे. अध्यक्ष पाशा पटेल यांनी सोमवारी दुपारी पाडळी खुर्द गावाला भेट दिली. आयोगाने गावातील दहा शेतकर्‍यांची निवड केली आहे. त्या दहा शेतकर्‍यांकडून अध्यक्ष पटेल यांनी माहिती घेतली.