Mon, Jun 24, 2019 21:37होमपेज › Kolhapur › 383 कोटी एफआरपी थकीत

383 कोटी एफआरपी थकीत

Published On: Jun 29 2018 12:55AM | Last Updated: Jun 29 2018 12:46AMकोल्हापूर : प्रतिनिधी

कोल्हापूर विभागातील 22 साखर कारखान्यांकडे यावर्षीच्या हंगामातील सुमारे 383 कोटी रुपयांची एफआरपीची रक्‍कम थकीत आहे. यापैकी 175.39 कोटी रुपये हे कोल्हापूर, तर 188.62 कोटी हे सांगली जिल्ह्यातील कारखान्यांकडे थकीत आहेत. 

30 जूनपर्यंत ही रक्‍कम न दिल्यास साखर जप्तीची कारवाई करण्याच्या नोटिसा साखर आयुक्‍तांनी बजावल्या असल्या, तरी दोन दिवसांत ही रक्‍कम देणे अशक्यच आहे.यावर्षी कोल्हापूर विभागातच नव्हे, तर संपूर्ण देशातच साखरेचे विक्रमी उत्पादन झाले आहे. महाराष्ट्रात तर हे उत्पादन गेल्यावर्षीच्या तुलनेत अडीचपट झाले आहे. एकीकडे उत्पादन जादा आणि मागणी ठप्प यामुळे साखरेचे दरही प्रचंड घसरले. हंगामाच्या सुरुवातीला प्रतिक्‍विंटल 3400 रुपये साखरेचे दर होते, ते शेवटच्या टप्प्यात 2500 रुपयांपर्यंत खाली आले. त्यामुळेच कारखान्यांना एफआरपीही देता आलेली नाही. डिसेंबर, जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात  तुटलेल्या उसाला विभागातील सर्वच कारखान्यांनी एफआरपीएवढे पैसे दिले, अन्य जिल्ह्यात तेही दिलेले नाहीत.

दुसरीकडे दर घसरल्याने राज्य बँकेकडूनही साखरेचे मूल्यांकन कमी करण्यात आले. त्यामुळे कारखाने शॉर्टमार्जिनमध्ये गेले. याची दखल घेऊन केंद्र शासनाने काही चांगले निर्णय घेतले, त्याचा परिणामही दिसू लागला; पण तोपर्यंत साखर आयुक्‍तांनी 30 जूनची डेडलाईन थकीत एफआरपीसाठी दिली, अन्यथा साखर जप्तीची कारवाई करण्याच्या नोटिसा बजावल्याने कारखानदारांसमोर मोठा प्रश्‍न निर्माण झाला आहे. राज्यात सुमारे 2300 कोटी, तर कोल्हापूर विभागात 150 कोटी रुपये एफआरपीचे थकीत आहेत.