होमपेज › Kolhapur › घरच्या घरी ओळखा खाद्यान्नांमधील भेसळ

घरच्या घरी ओळखा खाद्यान्नांमधील भेसळ

Published On: Apr 19 2018 11:01AM | Last Updated: Apr 19 2018 11:01AMसुनिल कदम

अन्‍नपदार्थांमधील भेसळ ही आज राज्यापुढची एक ज्वलंत आणि अतिशय गंभीर समस्या होऊन बसलेली आहे. जनतेच्या मुखात शुद्ध आणि आरोग्यदायी अन्‍न पडणे हे केवळ जिकिरीचे नाही, तर महामुश्कील होऊन बसलेले आहे. याचे प्रमुख कारण आहे ते म्हणजे खाद्यान्‍नांमध्ये मोठ्या प्रमाणात होणारी भेसळ. या भेसळ बाजारामुळे राज्यातील नागरिकांच्या आरोग्याची अक्षरश: वाट लागत आहे. जनतेला अनेक जीवघेण्या आजारांचा सामना करावा लागत आहे. या भेसळीला लगाम घालण्यासाठी शासनाचा ‘अन्‍न आणि औषध प्रशासन’ नावाचा स्वतंत्र विभाग आहे. मात्र, अन्य शासकीय खात्यांप्रमाणेच या खात्याच्या कारभाराचाही फारसा लौकिक नाही. त्यामुळे भविष्यात या भेसळीपासून वाचून स्वत:चे आरोग्य सांभाळण्यासाठी नागरिकांना स्वत:च दक्षता घ्यावी लागणार आहे. त्यासाठी घरच्या घरी कोणत्याही खाद्यान्‍नातील भेसळ ओळखण्याच्या या काही साध्या-सोप्या टिप्स...

खाद्य पदार्थामधील भेसळ
 

yes धान्य

गव्हाच्या रव्यामध्ये अनेकवेळा तांदळाचे बारीक कण मिसळले जातात. एकाच रंगाचे असल्यामुळे हे सहजासहजी ओळखू येत नाहीत; पण असा एक चिमूटभर रवा पाण्यात टाकला, तर तांदळाचे कण दोनच मिनिटात जास्त फुगलेले दिसतात, त्याचप्रमाणे रवाही चिकट होतो. कधी-कधी वजन वाढविण्यासाठी रव्यामध्ये चक्‍क पांढरी मातीही मिसळली जाते. असा रवा पाण्यात टाकल्याबरोबर माती खाली जाते, तर रवा तरंगतो, त्यामुळे भेसळ ओळखता येते.

yes पिठीसाखर

पिठीसाखरेमध्ये खडूची पावडर मिसळली जाते. अशी चिमूटभर साखर पाण्यात टाकताच साखर विरघळते आणि खडूची पावडर भांड्याच्या तळाला साचलेली दिसते, त्यामुळे ही भेसळ सहज ओळखता येते. याशिवाय पिठीसाखरेत कपडे धुण्याचा सोडाही मिसळला जातो. या साखरेवर लिंबाच्या रसाचा थेंब टाकल्यास बुडबुडे येतात, त्यावरून त्यात सोड्याची भेसळ केल्याचे स्पष्ट होते.

yes मिठाई 

अनेक मिठाईंमध्ये चांदीचा वर्ख वापरला जातो; पण काही विक्रेते चांदीच्या वर्खाऐवजी अ‍ॅल्युमिनियमचा वर्ख वापरतात. चांदीचा वर्ख दिव्याच्या ज्योतीवर धरल्यास तो लगेच जळून त्याचा एक छोटा गोळा तयार होतो; पण अ‍ॅल्युमिनियमचा वर्ख असेल, तर त्याची जळून राख होते, यावरून ही भेसळ ओळखता येते. त्याचप्रमाणे मिठाईच्या तुकड्यावर हायड्रोक्‍लोरिक अ‍ॅसिडचा एक थेंब टाकल्यास मिठाईचा रंग जांभळा होतो. त्यावरून ही मिठाई शुद्ध दुग्धजन्य पदार्थांपासून तयार केली नसल्याचे कडवे सत्य ध्यानात येण्यास हरकत नाही.

yes मध

अनेकवेळा मधामध्ये साखरेचे पाणी किंवा काकवी मिसळली जाते. मात्र, ही भेसळ ओळखणे अत्यंत सोपे आहे. एक कापसाची वात करून ती मधात बुडवून पेटवा, शुद्ध मध असेल तर वात लगेच पेटते; पण जर त्यात साखरपाणी किंवा काकवीची भेसळ असेल, तर एकतर वात पेटत नाही किंवा पेटली तर तडतड असा आवाज येतो, हा आवाज म्हणजेच गोड मधातील कडव्या भेसळीचा अस्सल पुरावा समजण्यास हरकत नाही.

yes कॉफी 

अनेकवेळा कॉफीमध्ये चिकोरी नावाचा पदार्थ मिसळतात. अशा कॉफीची चिमूट पाण्याच्या ग्लासात टाकल्यास शुद्ध कॉफी पाण्यावर तरंगते आणि चिकोरीचे कण लगेच तळाला जातात, हे चिकोरीचे कण बुडत असताना रंगीत रेषा उमटतात, त्यावरून कॉफीतील भेसळ लगेच चव्हाट्यावर येते.

yes चहा पावडर

चहा पावडरमध्ये अनेकवेळा वापरून टाकून दिलेली पावडर, लाकडाचा भुसा, अन्य झाडांच्या पानांचा भुसा मिसळला जातो. पांढर्‍या कपड्यात किंवा कागदावर घेऊन अशी चहा पावडर चोळली, तर कपड्याला भेसळयुक्‍त पदार्थांचा रंग लागतो; पण चहा पावडरचा रंग लागत नाही. त्यावरून भेसळीच्या चहाचा हा ‘कडवा घोट’ सहज ओळखता येतो. ओल्या कागदावर चहा पावडरचे काही कण टाकले, तर तिथे लगेच पावडरचे लाल-काळे डाग दिसतात; पण वापरलेल्या पावडरचे असे डाग दिसून येत नाहीत. याशिवाय केवळ वासावरूनही चहा पावडरची अस्सलता आणि 
गुणवत्ता  ओळखता येते; पण त्यासाठी थोड्या अभ्यासाची गरज आहे.

yes खाद्यतेल

खाद्यतेलांमध्ये अर्जिमोन तेल किंवा मिनरल ऑईल मिसळले जाते. अशा भेसळीच्या चमचाभर तेलात तेवढेच नायट्रिक अ‍ॅसिड टाकल्यास त्याचा रंग लालसर होतो. त्यावरून खाद्यतेलातील बनवेगिरी समजण्यास मदत होते.

yes मिरची पूड

लाल मिरची पावडरमध्ये अनेकवेळा विटांचा भुगा मिसळलेला दिसून येतो. अशी मिरची पावडर पाण्यात टाकल्यास विटांचा भुगा चटकन पाण्याच्या तळाशी जातो, तर मिरची पावडर दीर्घकाळ पाण्यावर तरंगते.

yes हळद

हळदीमध्ये खडूची पावडर, लाकडाचा भुसा व रंगीत पावडरी मिसळल्या जातात. अशी भेसळयुक्‍त पावडर पाण्यात टाकल्यास खडूची पावडर तळाला जाते, लाकडाचा भुसा पाण्यावर तरंगतो, त्याचप्रमाणे रंगीत पावडरीही पाण्याच्या तळाशी जमा होतात. केवळ शुद्ध हळदच पाण्यात विरघळून जाते.

yes डाळी

तूरडाळ, मूगडाळ आणि हरभर्‍याच्या डाळीला पिवळेपणा येण्यासाठी मेर्टलीक यलो हा रंग वापरण्यात येतो. असा रंग लावलेली डाळ कोमट पाण्यात टाकल्यास पाण्याला किंचित गुलाबी रंग येतो, त्यावरून डाळींमध्ये कशा पद्धतीने भेसळीची डाळ शिजत आहे, त्याचा सुगावा लागू शकतो.

yes भाज्या

हिरव्या पालेभाज्या किंवा फळभाज्या अधिक काळ हिरव्यावर दिसण्यासाठी त्यावर मेलाचाईट ग्रीन या पदार्थाचे द्रावण करून मारले जाते. मात्र, ते ओळखणे फारच सोपे आहे, अशा भाज्यांवर ओला कागद फिरवला तरी भाजीचा रंग कागदाला लागतो, त्यामुळे ‘भाजीत भाजी भेसळीची’ ओळखणे सोपे होते.

yes काळी मिरी

अनेकवेळा काळ्या मिरीमध्ये पपईच्या बिया मिसळल्या जातात. मात्र, पपईच्या बिया या निमुळत्या आकाराच्या असल्याने नुसत्या डोळ्यांनी पाहून सहज ओळखता येतात. त्याचप्रमाणे अर्क काढलेल्या मिरीचे दाणे प्रमाणापेक्षा जास्त चमकताना दिसतात. त्यावरून विक्रेत्याने आपल्या डोक्यावर भेसळीचे मिरे वाटले आहे, असे खुशाल समजण्यास हरकत नाही.

yes जिरे

जिर्‍यामध्ये कसल्याही गवती बिया मिसळल्या जातात, असले भेसळीचे जिरे हातावर चोळले, तरी त्याचा काळा रंग हाताला लागतो. कर्‍या शहाजिर्‍याचा रंग हाताला लागत नाही.

yes हिंग

हिंगाच्या खड्यांमध्ये काहीवेळा भलत्याच दगडाचे खडे मिसळलेले दिसतात, तसेच हिंग पावडरमध्ये दगडाची पावडर किंवा चक्‍क माती मिसळली जाते. खरा हिंग पाण्यात टाकल्यास तो लगेच विरघळतो आणि पाण्याचा रंग पांढरा होतो, तर माती आणि दगडाची पावडर पाण्याच्या तळाशी जाऊन बसते. या ठोकताळ्यावरून आपण भेसळीच्या हिंगाला हिंग घालण्याची गरज भासत नाही.

yes केशर 

केशर म्हणून मक्याच्या कणसातील तुर्‍याचे केस माथी मारले जातात. केशराचे धागे चिवट असतात व सहजासहजी तुटत नाहीत; पण हे कणसाचे धागे लगेच तुटतात, त्याचप्रमाणे केशरच्या सुगंधावरूनही भेसळ ओळखण्यास मदत होते.

yes मोहरी 

मोहरीमध्ये धोतर्‍याच्या बिया मिसळण्याचे प्रमाण मोठे आहे; पण ही भेसळ ओळखता येते. मोहरीच्या बिया गुळगुळीत आणि एकसारख्या आकाराच्या असतात, तर धोतर्‍याच्या बिया या काहीशा खडबडीत व एका बाजूला त्रिकोणी असतात.

yes खोबरेल तेल

खोबरेल तेलामध्ये वेगवेगळ्या प्रकारची तेले मिसळली जातात, हे ओळखणेही फारच सोपे आहे. खोबरेल तेल फ्रिजमध्ये ठेवल्यानंतर जर ते गोठले, तर ते शुद्ध आणि न गोठल्यास नि:संशय भेसळीचे असून, विक्रेत्याने आपणास ‘तेल लगाके’ गंडविल्याचे समजण्यास हरकत नाही.

yes शितपेयांमधील दाहकता

आजकाल शीतपेये म्हणजे लहान मुलांपासून ते मोठ्यांपर्यंत जीव की प्राण झालेली आहेत. मात्र, या शीतपेयांमुळे होणारी आरोग्याची नासाडी लक्षात घेण्याची गरज आहे. बहुतेक सगळ्या शीतपेयांमध्ये कॅफीन, साखर किंवा सॅकरिन, हाय फ्रुक्टोज, कॉर्न सिरप, फॉस्फोरिक, कृत्रिम चव घटक, वेगवेगळे रंग, जंतुनाशके आणि कार्बन डाय ऑक्साईड वायूचा वापर करण्यात येतो. साधारणत:, 350 मिलिलिटरच्या एका बाटलीमुळे जवळपास 30 ते 35 गॅम साखर पोटात जाते, जी आरोग्याला अत्यंत हानिकारक असून, मधुमेहाला रीतसर निमंत्रण देणारी आहे. या साखरेमुळे शरिरात अतिरिक्‍त चरबी वाढून रक्‍तदाबाचा विकार बळावतो. कॅफिनमुळे लहान मुलांमध्ये कृत्रिम नशेचे किंवा उत्तेजित भावनेचे प्रमाण वाढते. त्यामुळे मुलांमध्ये वर्तनदोष आणि आक्रमकता वाढीस लागते. त्याचप्रमाणे हाडे ठिसूळ होण्याचे प्रमाणही वाढीस लागते. या सगळ्यावरून शीतपेयांमागची दाहकता पालकांनी समजून घेण्याची आवश्यकता आहे.
 

फळांमधील बनवाबनवी 

फळांमधील भेसळ ही वेगवेगळ्या प्रकारची आहे. अनेकवेळा आपण एखाद्या फळाचा समजून एखादा ज्यूस पितो; पण अनेकवेळा त्या ज्यूसचा आणि त्या फळाचा काहीएक संबंध नसतो. आपण पीत असतो तो केवळ त्या फळाचा कृत्रिम आणि रासायनिक स्वाद असतो. जगाच्या पाठीवरील कोणत्याही फळांचे असे कृत्रिम आणि रासायनिक स्वाद आजकाल बाजारपेठेत उपलब्ध आहेत. मात्र, मानवी आरोग्याच्या द‍ृष्टीने हे असले ज्यूस अत्यंत घातक स्वरूपाचे आहेत.

smiley आंबा 

सध्या आंब्याचा हंगाम चालू आहे, विविध नावांचे, गावांचे आणि चवीचे आंबे बघायला मिळू लागलेले आहेत, त्याचबरोबर याबाबतीत भेसळ आणि फसवणुकीचे प्रकारही दिसून येतात. आंबे लवकरात लवकर बाजारात आणण्यासाठी ते कॅल्शियम कार्बाईड ही रासायनिक पावडर वापरून पिकविण्याचे प्रकार सर्रास आढळून येतात. अशाप्रकारे पिकविलेला आंबा हा अतिशय पिवळा दिसतो. शिवाय, त्याच्यावर थोड्या प्रमाणात हिरव्या रंगाचे डाग दिसून येतात. नैसर्गिकरीतीने पिकविलेला आंबा हा पिवळा नव्हे, तर केशरी रंगाचा दिसतो. कृत्रिमरीतीने पिकविलेल्या आंब्याचा रसही अतिशय पातळ आणि पिवळ्याच रंगाचा असतो. शिवाय, पावडरचा वापर करून पिकविलेला आंबा खाल्ल्यानंतर घसा खवखवतो. दुसरी बाब म्हणजे, आजकाल हापूस आंबा म्हणून कोणताही आंबा ग्राहकांच्या माथी मारण्याचा उद्योग सुरू आहे. हापूस ओळखण्याची पहिली खूण म्हणजे तो रंगाने केशरी असतो आणि त्याच्या देठाजवळचा भाग खोलगट असतो. या दोन बाह्यरूपावरूनच हापूस सहज ओळखता येतो. याशिवाय वेगवेगळ्या नावांवरून आणि परिसरावरूनही आंब्याची बाह्यरूपे आणि चवी ठरलेल्या आहेत.

smiley केळी
गेल्या काही वर्षांमध्ये नैसर्गिकरीत्या पिकविलेली केळी मिळणे जवळजवळ दुरापास्त झालेले आहे. केळी सर्रास कॅल्शियम कार्बाईड पावडरीचा वापर करून पिकविलेली दिसतात. अशी केळी जरी पिवळीजर्द दिसत असली, तरी त्यांचा देठ मात्र हिरवाच दिसतो. यावरून अशाप्रकारे कृत्रिमरीतीने पिकविलेली केळी सहज ओळखता येतात. अशी केळी अपायकारक ठरतात.

smiley सफरचंद

अनेकवेळा बाजारात अतिशय चकचकीत सफरचंद बघायला मिळतात. चकचकीत दिसण्यासाठी आणि बाह्य वातावरणाचा परिणाम होऊ नये म्हणून अशा सफरचंदांना मेणाचा थर लावण्यात येतो. अशी फळे धुतल्याशिवाय खाणे धोकादायक आहे.


दुग्धजन्य पदार्थांमधील भेसळ

surprise दुध

दुधातील स्निग्धांश काढून घेतले जातात किंवा त्यात पाणी मिसळले जाते. पाणी मिसळलेल्या दुधाचा एक थेंब निसरड्या पृष्ठभागावर टाकल्यास असे दूध लगेच ओघळून खाली येते. युरियासारखी घातक रसायने मिसळलेले दूध तापविले की, त्याला  उग्र स्वरूपाचा वास असतो. बाजारात केवळ दोनशे रुपयांत मिळणार्‍या लॅक्टोमीटरच्या सहाय्याने दुधातील पाण्याची भेसळ व काढलेले स्निग्धांश ओळखता येतात. 

surprise पनीर

पनीरमध्ये स्टार्च मिसळण्याचे वाढते प्रकार आढळून येतात. पनीर थोड्या पाण्यात उकळून घेतल्यानंतर ते थंड करून घ्यावे आणि त्यावर आयोडिनचे दोन थेंब टाकावेत. पनीर जर निळे झाले, तर नि:संशय ते स्टार्चयुक्‍त समजून विक्रेत्यास ‘साभार’ परत करावे.

surprise खवा

खव्यामध्येही अनेकवेळा स्टार्च मिसळलेला दिसतो. अशा खव्यावरही उकळून घेऊन आयोडिनचे थेंब टाकल्यास त्याचा रंग निळा होतो. अनेकवेळा खव्यामध्ये बटाटा किंवा रताळी शिजवून त्याची भेसळ केली जाते, ही भेसळसुद्धा आयोडिन परिक्षणाने सहज लक्षात येण्यासारखी आहे.

surprise तूप

खव्याप्रमाणेच तुपामध्येही बटाटा किंवा रताळ्याचा गर मिसळला जातो. ही भेसळही आयोडिनच्या परिक्षणाने ओळखता येते. काहीवेळा तुपात आणि लोण्यात डालडा मिक्स केला जातो. डालडा मिक्स तूप किंवा गरम करून त्यावर हायड्रोक्‍लोरिक आम्लाचे दोन थेंब आणि चिमूटभर साखर टाकल्यास डालड्याला करडा रंग येऊन तो तळात जाऊन बसतो.

surprise आइस्क्रिम 

कोणत्याही आइस्क्रिममध्ये दूध मलईचे प्रमाण हे साधारणत: 12 ते 15 टक्के असणे बंधनकारक आहे. मात्र, काही बनावट आईसक्रीम कंपन्या चक्क दूध मलईऐवजी डालडामिक्स आईसक्रीम विकताना दिसतात. शुध्द  दुधाचे आइस्क्रिम हातात घेतल्यानंतर अवघ्या एक-दोन मिनिटात विरघळायला सुरुवात होते. डालडा मिक्स आइस्क्रिम मात्र जवळपास दहा-पंधरा मिनिटेसुद्धा सर्वसाधारण तापमानाला तसेच राहते. काही आइस्क्रिममध्ये धुण्याचा सोडा वापरला जातो. अशा आइस्क्रिमवर लिंबाच्या रसाचे दोन थेंब टाकल्यास त्यावर बुडबुडे येतात आणि भेसळीचा बुडबुडा फुटण्यास मदत होते. आइस्क्रिम खाल्ल्यानंतर काहीवेळाने जिभेवर जर कडवट चव जाणवली, तर त्या आइस्क्रिममध्ये साखरेऐवजी सॅकरिन वापरले आहे, असे समजण्यास हरकत नाही.

दूध आणि दुग्धजन्य पदार्थांमधील वेगवेगळ्या प्रकारच्या भेसळी ओळखण्यासाठी काही ठिकाणी कापडी स्ट्रीप्स मिळतात. त्याच्या माध्यमातून भेसळ लगेच ओळखता येते; पण या स्ट्रीप्सना अजून वैज्ञानिक मान्यता मिळालेली नाही. असे असले तरी काही शहरांमध्ये दुधातील भेसळ ओळखण्यासाठी या स्ट्रीप्स वापरात आहेत.