Fri, Mar 22, 2019 22:40होमपेज › Kolhapur › दोन खात्यांच्या वादात तिलारी रस्ता मृत्यूचा सापळा

दोन खात्यांच्या वादात तिलारी रस्ता मृत्यूचा सापळा

Published On: Jul 10 2018 1:02AM | Last Updated: Jul 09 2018 11:08PMकोल्हापूर : निवास चौगले

रस्त्याचा दर्जा चांगला नसल्याने तो आमच्याकडे नको, अशी सार्वजनिक बांधकाम विभागाची तक्रार, तर अपुरा निधी मिळत असल्याने या रस्त्यावर तात्पुरत्या डागडुजीशिवाय काही करता येत नाही, हे पाटबंधारे विभागाचे म्हणणे. या दोन खात्यांच्या वादात चंदगड तालुक्यातील तिलारी घाटातील रस्ता मात्र मृत्यूचा सापळा बनला आहे. याच घाटात रविवारी चारचाकी दरीत कोसळून पाच जणांचा मृत्यू झाल्यानंतर हा रस्ता पुन्हा चर्चेत आला आहे. किरकोळ दुरुस्तीशिवाय या रस्त्यावर काहीही झालेले नाही. संरक्षक कठडे नाहीत, उतराच्या वळणांवर दिशादर्शक नाहीत. फक्‍त हा रस्ता वाहतुकीसाठी धोकादायक असल्याचे दोन फलक सोडले, तर काहीही उपाययोजना या रस्त्यावर नाहीत. 

हा रस्ता पाटबंधारे विभागाच्या मालकीचा. अजूनही हीच स्थिती आहे. सुमारे 16 किलोमीटरच्या  हा घाट रस्ता सुरू होण्यापूर्वी व संपल्यानंतर राज्य महामार्ग सुरू होतो. 1980 च्या सुमारास तिलारी धरण ते त्याच्या खाली बांधलेल्या वीजनिर्मिती केंद्राकडे जाण्यासाठी हा रस्ता त्यावेळी तयार केला गेला. त्या काळात पाटबंधारे विभागाची बांधकामाची वाहने, जीप यासारखी वाहने त्यावर चालत होती. धरण आणि वीज केंद्रही पूर्ण झाल्यानंतर हा रस्ता सार्वजनिक वाहतुकीसाठी खुला झाला. गेल्या अनेक वर्षांपासून ही वाहतूक सुरूच आहे. 

हा रस्ता सार्वजनिक बांधकाम विभागाने ताब्यात घ्यावा, यासाठी पाटबंधारे विभागाकडून पाठपुरावा सुरू आहे; पण रस्त्याचा दर्जा चांगला नसल्याचे कारण सांगून सार्वजनिक बांधकाम विभाग तो घेण्यास तयार नाही. यात आणखी एक अडथळा आहे तो वन जमिनीचा. हा संपूर्ण रस्ता वन विभागाच्या हद्दीतून जातो. ज्यावेळी रस्ता केला त्यावेळी वन जमिनीचे कायदे फारसे कडक नव्हते. आता रस्ता हस्तांतरण करून त्याची डागडुजी करायची झाल्यास वन विभागाची परवानगी मिळवणे हेच मोठे आव्हान आहे. त्यामुळे तो ताब्यात घेणे किंवा त्याची दुरुस्ती, याकडे कोणाचे फारसे लक्ष नाही. त्याचा पाठपुरावा होत नाही. सार्वजनिक वापरासाठी रस्ता बंद करणेही शक्य नाही. 

एस.टी. बसचीही वाहतूक 

प्रवाशांनी खचाखच भरलेल्या एस.टी.ची वाहतूकही याच रस्त्यावरून होते. विशेष म्हणजे, या मार्गावर एस.टी. चालवणारेही काही ठराविकच चालक आहेत. त्यांच्याशिवाय या रस्त्यावर कोणी एस.टी. चालवूच शकत नाही. मोठी वळणे, तीव्र चढ-उतार असलेल्या या रस्त्यावरून एस.टी. चालवणे म्हणजे मोठी परीक्षाच आहे.