Tue, Apr 23, 2019 19:44होमपेज › Kolhapur › ससा मारला तरी तीन वर्षांचा आहे तुरुंगवास!

ससा मारला तरी तीन वर्षांचा आहे तुरुंगवास!

Published On: Apr 07 2018 2:00AM | Last Updated: Apr 07 2018 1:33AMकोल्हापूर : विजय पाटील 

दिसायला इवलासा आणि गोजिरवाणा असलेल्या सशाला मारल्यावर तीन वर्षांपर्यंत सक्तमजुरीची शिक्षा आहे, हे कदाचित कुणाच्या गावीही नसेल. कोल्हापूर जिल्ह्यात सर्रास चोरट्या शिकार्‍यांच्या निशाण्यावर असलेल्या गेळ्याची शिकार केल्यास, तर सात वर्षांपर्यंत थेट तुरुंगवास आहे. अभिनेता सलमान खानला चिंकारा शिकारप्रकरणी पाच वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा झाल्यानंतर चोरट्या शिकारींबद्दलचा मुद्दा ऐरणीवर आला आहे. 

कोल्हापूर जिल्हा हा जंगलपट्ट्याने श्रीमंत आहे. शेकडो वन्यप्राण्यांच्या प्रजातींचा या जंगलात अधिवास आहे. वाघ, बिबटे, गवा, अस्वल इथपासून भेकर, सांबर, शेकरू व रानकुत्रे अशी जैवविविधतेने इथली जंगले नटली आहेत. घनदाट झाडी आणि दर्‍या, डोंगरांच्या रांगाची जंगले असल्याने चोरट्या शिकारींचे प्रमाणही आहे. जंगलाच्या हद्दीत कुठल्याही वन्यप्राण्याला इजा करण्यास किंवा शिकारीचा प्रयत्न केल्यास वन्यजीव संरक्षण अधिनियम 1972 अन्वये कमीत कमी तीन ते जास्तीत जास्त सात वर्षांपर्यंत तुरुंगवासाची शिक्षा तसेच रोख रकमेच्या दंडाची कायद्यात तरतूद आहे. वन्यजीव कायदा हा कडक आहे. अभिनेता सलमान खान प्रकरणावरून या कायद्याबाबत चर्चांना ऊत आला आहे. 

कारण, अजूनही शिकार करणे हे प्रतिष्ठेचे मानणार्‍यांचे प्रमाण मोठे आहे. त्याचमुळे मुंबई किंवा परजिल्ह्यांतून सुट्टीनिमित्त ग्रामीण भागात आलेले तरुण पाहुणे मंडळी चोरून शिकारीला जाणे म्हणजे एन्जॉय समजतात. अनेक जण तर शिकार म्हणजे जंगलसफारीतला  थरार मानतात. त्यामुळेच अजूनही चोरून शिकार करणार्‍यांचे प्रमाण मोठे आहे. दुसर्‍या बाजूला दिवाळी, होळी आदी सण-उत्सवाला जंगलानजीकच्या काही गावांत शिकार करण्याची पद्धत रूढ आहे. कायद्याने अशा शिकारींनाही तेवढीच शिक्षा आहे. 

गेळा या देखण्या प्राण्याची शिकार आपल्याकडे सर्रास केली जाते. कारण, हा प्राणी सहज सापडतो. त्यामुळे ‘पाहुणं या की गावाकडं गेळा मारून आणतो,’ असं म्हटलं जातं. वाघ, बिबट्यांप्रमाणे गेळा हा शेड्युल्ड 1 मध्ये समाविष्ट आहे. त्यामुळे गेळ्याची शिकार ही सात वर्षांचा तुरुंगवास देऊ शकते, हे अद्याप अनेकांना माहिती नसेल. 

रानडुकराची शिकारसुद्धा शिक्षेस पात्र
अनेकांचा असा समज आहे की, रानडुक्कर मारायला परवानगी आहे; मात्र रानडुक्करसुद्धा शेड्युल्ड (अनुसूची) 3 मध्ये समाविष्ट असणारा प्राणी आहे. त्याच्या शिकारीलासुद्धा परवानगी नाही. मात्र, शेतकर्‍यांचे नुकसान आणि उपद्रव टाळण्यासाठी ज्या भागात डुकरांची संख्या मोठी असते आणि त्यांचा उपद्रव शेतपीकांना होतो, अशा ठिकाणी वन विभागाच्या कायदेशीर परवानगीने डुक्कर मारण्याची परवानगी मिळू शकते. गेल्या काही वर्षांत अशी एकही परवानगी वन विभागाने दिलेली नाही, हे लक्षात घ्यायला हवे. तसेच रानडुक्कर मारल्यास इतर वन्यप्राण्यांच्या शिकारीइतकीच शिक्षा होऊ शकते.यासाठी होऊ शकते शिक्षा
 शिकारीचा प्रयत्न, शिकारीसाठी जंगलात प्रवेश, अधिवास नष्ट करणे, विनापरवाना जंगलात आढळणे आदींसाठी सात वर्षांपर्यंत शिक्षेची वन्यजीव कायद्यात तरतूद आहे.
Tags : rabbit, Prison, kolhapur