होमपेज › Kolhapur › कोल्हापूरचा कांदा तीन राज्यांत

कोल्हापूरचा कांदा तीन राज्यांत

Published On: Apr 26 2018 1:23AM | Last Updated: Apr 26 2018 12:32AMकोल्हापूर : विजय पाटील

कोल्हापूरचे शेतकरी कांदा पिकवत नाहीत. उसाच्या लागणीत कुटुंबापुरता कांदा पिकवला तर पिकवला, इतका दूरचा संबंध कांद्याबाबतीत कोल्हापूरचा आहे. कोल्हापुरी कांदा हा कर्नाटक, आंध्र प्रदेश आणि तामिळनाडू या दाक्षिणात्य प्रमुख राज्यांतील लोकांच्या दररोज थाळीत असतो. या लोकांचे जेवण कोल्हापूरच्या कांद्याशिवाय पूर्णच होऊ शकत नाही, असे सांगितले तर ते मात्र खरे आहे. वर्षाला साडेसहा लाख क्‍विंटल कांदा कोल्हापूरमधून या राज्यांना पुरवला जातो. हा कांदा कोल्हापूरचा नसला, तरी तो येथून जात असल्याने दाक्षिणात्य राज्यांत कोल्हापुरी कांदा या नावानेच या कांद्याची ओळख बनली आहे.

कोल्हापूर जिल्ह्यात ऊस हे प्रमुख पीक, हे सार्‍या देशाला ठाऊक आहे. उसाबरोबर फारतर भाताचे पीक स्थानिक शेतकरी घेतात. याव्यतिरिक्‍त सूर्यफूल, गहू, ज्वारी ही पिके पूरक म्हणजेच उसाला बदली म्हणून फार कमी प्रमाणावर घेतली जातात. त्यामुळे कोल्हापुरी गूळ आणि साखर अशी इथल्या शेती पिकाची पारंपरिक ओळख कायम आहे; पण आता दाक्षिणात्य राज्यांमध्ये कोल्हापुरी कांदा ही दमदार ओळख तयार झाली आहे. कर्नाटक, आंध्र प्रदेश आणि तामिळनाडू या प्रमुख राज्यांमध्ये कोल्हापूरच्या मार्केटमधून कांदा पुरवला जातो. नगर, नाशिक, लासलगाव येथून हा कांदा कोल्हापूरच्या कृषी उत्पन्‍न बाजार समितीत येतो. पारदर्शी, रोख आणि चोख व्यवहार असल्याने कोल्हापुरात कांदा मोठ्या प्रमाणावर परजिल्ह्यांतील शेतकरी आणतात. यंदा कांद्याची उलाढाल 310 कोटी रुपयांच्या घरात जाऊन पोहोचली आहे. गतसाली ही बाजारपेठ 252 कोटी रुपयांची होती. तर 2010 साली ही उलाढाल 175 कोटी रुपयांची होती.
कांदा पिकवला जात नसतानाही आता कांद्याचा कोल्हापुरी ब्रँड तयार झाला आहे. साहजिकच, याचा प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष फायदा कोल्हापूरच्या अर्थकारणावर झाला आहे. ही बाजारपेठ दरवर्षी वाढत असल्याने कांद्याची उलाढाल आगामी काळात पाचशे कोटींवर जाऊन पोहोचेल, असा अंदाज या क्षेत्रातील जाणकारांकडून व्यक्‍त करण्यात येत आहे.


कोल्हापुरी ब्रँडची कथा

कोल्हापूरच्या शेती उत्पन्‍न बाजार समितीत 1989 पासून कांद्याची आवक सुरू झाली. शेतकर्‍यांसमोर मालाचे वजन आणि सौदे, तसेच दुपारी हातात पैसे मिळत असल्याने या बाजारपेठेची विश्‍वासार्हता वाढू लागली. आजमितीला दररोज 70 ते 72 ट्रक कांदा पहाटे मार्केट यार्डात येतो. प्रत्येक ट्रकमध्ये दहा टन कांदा असतो. आता कांद्याची उलाढाल 310 कोटींवर जाऊन पोहोचली आहे. हा कांदा परजिल्ह्यांतून येतो आणि यातील 80 टक्के कांदा दाक्षिणात्य राज्यांत जातो. कांदा कोल्हापुरातून बाहेर जात असल्याने या कांद्याची ओळख कोल्हापुरी अशीच झाली आहे.

Tags : Kolhapur, Three, states,  Kolhapur, onion