होमपेज › Kolhapur › तुरडाळ विक्रीवर आता तीन रुपये कमिशन

तुरडाळ विक्रीवर आता तीन रुपये कमिशन

Published On: May 08 2018 1:56AM | Last Updated: May 07 2018 11:35PMकागल : प्रतिनिधी

सरकारमान्य स्वस्त धान्य दुकानामधून विकल्या जाणार्‍या तुरडाळीमधून दुकानदारांना फारच कमी नफा मिळू लागल्यामुळे दुकानदारांनी डाळ विक्रीकडे दुर्लक्ष केले आहे. त्यामुळे तुरडाळीची विक्री मोठ्या प्रमाणात होण्यासाठी अन्‍न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागाने तुरडाळीच्या विक्रीवर तीन रुपयांचे  कमिशन देण्याचा निर्णय घेतला आहे. त्याबाबतचे परिपत्रक नुकतेच काढण्यात आले आहे. पूर्वी तुरडाळीच्या विक्रीवर केवळ 70 पैसे कमिशन देण्यात येत होते. त्यामुळे स्वस्तधान्य दुकानदारांमधून समाधान व्यक्‍त होत आहे.

राज्य शासनामार्फत बाजार हस्तक्षेप योजनेंतर्गत खरेदी करण्यात आलेल्या तुरीची भरडाई केल्यानंतर तुरडाळीची विक्री राज्यातील स्वस्त धान्य दुकानांमधून करण्याबाबतचा निर्णय दि. 28 नोव्हेंबर 2017 च्या शासन निर्णयान्वये घेण्यात आला आहे.

रास्तभाव दुकानदारांना अन्‍नधान्य वितरणासाठी पॉझमशिनद्वारे होणार्‍या व्यवहारानुसार वितरित होणार्‍या तुरडाळीस 1.50 रुपये प्रतिकिलो व पॉझमशिन व्यतिरिक्‍त वाटप होणार्‍या तुरडाळीस 0.70 पैसे प्रतिकिलो एवढे मार्जीन देण्यात येत होते. तथापि या तुरडाळीचा विक्री दर 55 रुपये प्रतिकिलो एवढाच असून त्या करिता गुंतवणुकीचे प्रमाण अन्‍नधान्याच्या दरापेक्षा फार मोठ्या प्रमाणात असून देखील तुरडाळीकरिता अन्‍नधान्याप्रमाणे 1.50 रुपये अथवा 0.70 रुपये मार्जीन असल्याने तुरडाळीच्या विक्रीवर परिणाम झाल्याचे दिसून आल्यानंतर तुरडाळीची विक्री मोठ्या प्रमाणात व्हावी. या द‍ृष्टीने तुरडाळीकरिता रास्तभाव दुकानांच्या निश्‍चित करण्यात आलेल्या मार्जीनमध्ये बदल करण्यात येऊन तुरडाळीच्या विक्रीकरिता रास्तभाव दुकानदारांना 1.50 अथवा 0.70 एवढ्या मार्जीनऐवजी तीन रुपये प्रतिकिलो एवढे मार्जीन देण्याचा निर्णय घेण्यात आला. याबाबतच्या सूचना अन्‍न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागाचे उपसचिव स. श्री. सुपे यांनी दिला आहे.

गेल्या वर्षीप्रमाणे यंदाही शासनाने शेतकर्‍यांकडील तुरडाळ मोठ्या प्रमाणात खरेदी केली. ती सध्या प्रत्येक स्वस्त धान्य दुकानांमधून पॅकिंगच्या स्वरुपात विक्रीसाठी येत आहे. पॉझमशिनद्वारे विक्री करण्यात येत असल्यामुळे विक्रीमध्ये पारदर्शकता आली आहे. सध्या तुरडाळ विक्रीसाठी दुकानदारांना कमिशन वाढविण्यात आल्यामुळे आता डाळीची विक्री देखील वाढण्याचे चिन्हे निर्माण झाली आहेत.