Thu, Jun 27, 2019 15:44होमपेज › Kolhapur › तीन महिन्यांत जात वैधता प्रमाणपत्र

तीन महिन्यांत जात वैधता प्रमाणपत्र

Published On: Sep 11 2018 1:36AM | Last Updated: Sep 11 2018 1:24AMकोल्हापूर : अनिल देशमुख

जात वैधता प्रमाणपत्र तीन महिन्यांत मिळणार आहे. राज्य शासनाच्या सेवा हमी कायद्यात जात पडताळणी समित्यांचा समावेश करण्यात आला आहे. त्यानुसार अपिलीय अधिकारी म्हणून समितीच्याच सदस्य सचिवांची नियुक्‍ती करण्यात आली आहे. याबाबतचे आदेश राज्याच्या सामाजिक न्याय विभागाने काढले आहेत.

सहा महिन्यांत जात वैधता प्रमाणपत्र उपलब्ध झाले नाही म्हणून हजारो लोकप्रतिनिधींवर सदस्यत्व गमावण्याची वेळ आली आहे. वेळेत वैधता प्रमाणपत्र मिळाले नाही म्हणून काहींचे शाळा, महाविद्यालय प्रवेश रखडले, काही जण प्रवेशालाही मुकले. काहींवर नोकरी गमावण्याचीही वेळ आल्याची उदाहरणे आहेत. 

अपुर्‍या कर्मचार्‍यांचे कारण सांगत जात पडताळणीचे हजारो अर्ज महिनोन्महिने समितीच्या कार्यालयात पडून राहत असल्याचेही चित्र राज्यात अनेक ठिकाणी आहे.यापुढे मात्र जात पडताळणी समितीला अर्ज दाखल झाल्यापासून तीन महिन्यांत वैधता प्रमाणपत्र द्यावे लागणार आहे. अपवादात्मक स्थितीत ही मुदत पाच महिन्यांची ठेवण्यात आली आहे. न्यायालयीन प्रकरणात मात्र कोणतीही मुदत नसल्याचेही सामाजिक न्याय विभागाने स्पष्ट केले आहे. तीन महिन्यांच्या कालावधीत वैधता प्रमाणपत्र मिळाले नाही, तर त्याबाबत अर्जदाराला अपील करता येणार आहे.

यापूर्वी पहिले अपील महासंचालक, बार्टी यांच्याकडे, तर दुसरे अपील सामाजिक न्याय विभागाच्या सचिवांकडे करण्यात येत होते. मात्र, राज्यातील सर्व प्रकरणांसाठी एकच अधिकारी असल्याने त्यात वेळ आणि पैसा मोठ्या प्रमाणात खर्च होत होता. सामाजिक न्याय विभागाने आता त्यात बदल केला आहे. संबंधित जात पडताळणीचे सदस्य सचिव यांच्याकडे पहिले अपील करता येणार आहे. त्यावरही अपील करायचे असेल, तर द्वितीय अपिलीय अधिकारी म्हणून त्या समितीच्याच अध्यक्षांकडे अपील करता येणार आहे. यामुळे अर्जदाराला वेळेत जात वैधता प्रमाणपत्र मिळण्याची हमी निर्माण झाली आहे.