Wed, Jul 24, 2019 14:11होमपेज › Kolhapur › जयसिंगपुरात तीन लाखांची बॅग हिसडा मारून पळवली

जयसिंगपुरात तीन लाखांची बॅग हिसडा मारून पळवली

Published On: Dec 16 2017 2:06AM | Last Updated: Dec 16 2017 2:06AM

बुकमार्क करा

जयसिंगपूर : प्रतिनिधी

जयसिंगपूर येथे भर दुपारी घरासमोर तीन लाखांची बॅग हिसडा मारून चोरटे  मोटारसायकलवरून पसार झाले. बँकेतून रक्कम काढून घराचे गेट उघडून आत जाताना चोरट्याने डल्ला मारला. दुपारी सव्वाबारा वाजता ही वाटमारी झाली. बँकेपासूनच चोरट्यांनी पाळत ठेवून पाठलाग करून संधी साधल्याचे स्पष्ट होत आहे.

याबाबत चंद्रकांत गणपती गुजर (वय 59, रा.साई मंदिर, प्लॉट नं. 499/2, शाहूनगर) यांनी पोलिसांत फिर्याद दिली आहे. पाठीमागून अचानक येऊन कशाने तरी हातावर मारून गुजर यांच्या हातातील बॅग पळवली. या चोरट्यांचा पाठलाग करताना रस्त्यावर पडल्याने गुजर जखमी झाले. त्यांच्यावर प्राथमिक आरोग्य केंद्रात पोलिसांनी उपचार केले. मुलगा प्रशांत याला फ्लेक्स मशीन खरेदी करण्यासाठी गुजर यांनी रक्कम काढली होती. गुजर हे वनविभागातून सहायक संचालक म्हणून गतवर्षी निवृत्त झाले आहेत.

गुजर हे सकाळी सव्वाअकराच्या सुमारास घरातून अ‍ॅक्टिव्हा मोपेडवरून (एमएच 09 ईसी 2748) बँकेत गेले होते. राधाबाई रोडवरील 9 व्या गल्लीतील बँक ऑफ इंडियामधून त्यांनी प्रथम दोन लाख रुपये काढले. ती रक्कम काळ्या बॅगेत ठेवून ते आठव्या गल्लीतील राममंदिर शेजारी असणार्‍या महाराष्ट्र बँकेत मोपेडवरून गेले. डिकीतून बॅग घेऊन ते बँकेत गेले. एक लाख रुपये रक्कम काढून ती बॅगेत ठेवली. 

एकूण तीन लाखांची रक्कम असलेली बॅग अ‍ॅक्टिव्हा मोपेडच्या डिकीत त्यांनी ठेवली. कोल्हापूर महामार्गावरून शाहूनगरात ते घरी गेले.  घरासमोर मोपेड उभी करून पैशाची बॅग हातात धरून घराचे गेट उघडत असताना त्यांच्या पाठीमागून आलेल्या दोघांपैकी एका चोरट्याने त्यांची बॅग हिसडा मारून पळविली. बॅगेत बँकांचे चार पासबुक, चेकबुक, लॉकरची चावी व रोकड असा ऐवजही चोरीस गेला आहे.

गुजर यांनी पळणार्‍या चोरट्यास पकडण्याचा प्रयत्न केला. मात्र,  साथीदार  चोरट्याच्या मोटारसायकलवर बसून दोघेही घरासमोरील रस्त्यावरून पूर्वेला सुदर्शन चौकाकडून चोरटे पसार झाले. गुजर यांनी घटनेची माहिती त्यांचे भाऊ श्रीकांत गुजर यांना दिली. त्यानंतर पोलिस ठाण्यात जाऊन फिर्याद देण्यात आली. पोलिस उपनिरीक्षक किरण दिडवाघ हे तपास करीत आहेत. त्यांनी दोन्ही बँकांजवळील सीसीटीव्ही कॅमेर्‍याचे फुटेज तपासल्याचे समजते.