Tue, Jan 22, 2019 22:07होमपेज › Kolhapur › पोलिस असल्याच्या बहाण्याने साडेतीन लाखांचे दागिने लंपास

पोलिस असल्याच्या बहाण्याने साडेतीन लाखांचे दागिने लंपास

Published On: Mar 06 2018 12:38AM | Last Updated: Mar 06 2018 12:22AMकोल्हापूर : प्रतिनिधी

पोलिस असल्याची बतावणी करून रुईकर कॉलनी येथील वृद्धाला दोन भामट्यांनी साडेतीन लाखाला हातोहात लुटले. अंगावरील दागिने, किमती घड्याळ असा ऐवज घेऊन  पोबारा केला. रविवारी (दि.4) सायंकाळी रुईकर कॉलनी येथील मैदानावर ही घटना घडली. शाहूपुरी पोलिस ठाण्यात नोंद झाली आहे.

शिवाजी महादेव लायकर (वय 64, रा. एल.आय.सी.कॉलनी, रुईकर कॉलनी) असे फसगत झालेल्या वृद्धाचे नाव आहे. लायकर यांचे पूर्वी इचलकरंजी येथे चित्रपटगृह होते. पाच वर्षांपासून पती-पत्नी रुईकर कॉलनीत वास्तव्यास आहेत. तीनही मुली विवाहित असल्याने बंगल्यात दोघेच राहतात. लायकर रोज सायंकाळी शिवाजी विद्यापीठ परिसरात फिरायला जातात. मात्र, रविवारी मोटार चालकाला सुट्टी असल्याने सायंकाळी  रुईकर कॉलनीतील मैदानावर फिरायला गेले होते.

दोन अनोळखी तरुणांनी त्यांना  आम्ही दोघेही पोलिस आहोत. अंगावर सोने घालून फिरू नका. शहरात लूटमारीच्या घटना घडताहेत. अंगावरील सर्व सोने काढून खिशात ठेवा, असे  सांगितले. त्यावर विश्‍वास ठेवून लायकर यांनी 10 तोळ्याची सोन्याची साखळी, अंगठी, घड्याळ, अन्य किमती ऐवज रूमालात ठेवला. भामट्यानी रूमालाला गाठ मारतो, असे सांगून क्षणार्धात तेथून पलायन केले. या घटनेमुळे भांबावलेल्या लायकर यांनी शाहूपुरी पोलिस ठाण्यात धाव घेऊन रात्री उशिरा अनोळखी व्यक्‍तीविरुद्ध गुन्हा दाखल केला.