Fri, Jan 18, 2019 02:41होमपेज › Kolhapur › खंडणीसाठी अपहरण, मारहाण योगेश राणेसह तिघांना अटक

खंडणीसाठी अपहरण, मारहाण योगेश राणेसह तिघांना अटक

Published On: Jun 10 2018 1:48AM | Last Updated: Jun 10 2018 1:12AMकोल्हापूर : प्रतिनिधी

25 लाख रुपयांच्या खंडणीसाठी कमिशन एजंट विजय निवृत्ती कांबळे (वय 38, रा. निगवे खालसा. ता करवीर) यांचे कळंबा येथून अपहरण करून अमानुष मारहाण करणार्‍या शाहूपुरीतील सराईत टोळीचा म्होरक्या योगेश बाळासाहेब राणे (34, रा. पाचवी गल्ली, शाहूपुरी) सह तिघा संशयितांच्या शनिवारी पोलिसांनी मुसक्या आवळल्या. दहशतीच्या धाकावर कांबळे यांच्या पत्नीकडून 78 हजार 500 रुपये उकळल्याचे उघड झाले आहे.

राणेसह आकाश आनंदा आगलावे (25, न्हाव्याचीवाडी, ता. भुदरगड), मारुती मधुकर कांबळे (29, निगवे खालसा, ता. करवीर) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. योगेश राणे टोळीचा म्होरक्या असून, त्याच्यासह साथीदारांविरुद्ध खुनाचा प्रयत्न, बेकायदा शस्त्रे कब्जात बाळगून दहशत माजविणे, दरोडा, फसवणुकीसह जुगाराचे 13 गुन्हे दाखल आहेत, असे पोलिस उपअधीक्षक डॉ. प्रशांत अमृतकर, राजवाडा पाोलिस ठाण्याचे निरीक्षक अनिल गुजर यांनी सांगितले.

दि. 30 एप्रिल 2018 मध्ये ही घटना घडली होती. संशयितांनी अमानुष मारहाण केल्याने कांबळे गंभीर जखमी झाले होते. संशयितांच्या दहशतीमुळे पती, पत्नीवर भीतीचे सावट होते. पोलिसांनी दाम्पत्याला धीर दिल्यानंतर कांबळे यांनी योगेश राणेसह आठजणांविरुद्ध दि. 3 जूनला राजवाडा पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे.

न्यायालयाने संशयितांना पाच दिवसांची पोलिस कोठडी दिली आहे. टोळीतील फरारी पाच साथीदारांचा शोध घेण्यात येत आहे. विजय कांबळे हे इस्टेट एजंटासह विविध बँका व वित्तीय संस्थांकडून गरजूंना कमिशनवर कर्जप्रकरणे करून देतात. राणे टोळीतील संशयित मारुती कांबळे याच्याशी त्यांची पूर्वी भागीदारी होती. तथापि, अलीकडच्या काळात त्यांच्यात बिनसले आहे. योगेश राणे व साथीदारांना हाताशी धरून विजय कांबळेकडून 25 लाख रुपयांच्या खंडणीसाठी अपहरण, अमानुष मारहाणीचा कटही मारुती कांबळे याने रचल्याचे चौकशीत उघड झाले.

दि. 30 एप्रिलला सायंकाळी संशयितांनी विजय कांबळे यांच्याशी संपर्क साधून कर्जप्रकरणाच्या निमित्ताने कळंबा येथील साई मंदिराजवळ बोलावून घेतले व त्यांचे अपहरण केले. 25 लाखांच्या खंडणीची विजय कांबळे यांच्याकडे मागणी करण्यात आली. संशयितांनी त्यांना मोटारीतच बेदम मारहाण केली.
दागिने गहाण टाकून 78 हजार रुपये उकळले
दरम्यानच्या काळात संशयितांनी कांबळे यांना पत्नी मेघा यांच्याशी संपर्क साधण्यास भाग पाडले. घरात ठेवण्यात आलेली पाच हजारांची रक्कम तसेच दागिने गहाण ठेवून आलेली 78 हजार 500 रुपयांची रोकडही संशयितांनी उकळली.
पोलिस अधीक्षक संजय मोहिते यांना घटनेची माहिती मिळताच त्यांनी पोलिस उपअधीक्षक डॉ. अमृतकर, निरीक्षक गुजर यांना चौकशीचे आदेश दिले.
राणेसह तीनही संशयितांकडे रात्री उशिरापर्यंत चौकशी करण्यात येत होती. गुन्ह्यात वापरलेल्या दोन मोटारी हस्तगत करण्यात आल्या आहेत, असेही गुजर यांनी सांगितले.