Sun, Mar 24, 2019 22:58
    ब्रेकिंग    होमपेज › Kolhapur › हजारो कार्यकर्ते कुटुंबीय, जनावरांसह अडवणार महामार्ग

हजारो कार्यकर्ते कुटुंबीय, जनावरांसह अडवणार महामार्ग

Published On: Jul 19 2018 1:37AM | Last Updated: Jul 18 2018 11:38PMजयसिंगपूर : प्रतिनिधी

आज गुरुवारी स्वाभिमानी शेतकरी संघटनेतर्फे पुणे-बेंगलोर हायवेवर किणी टोलनाक्यावर चक्‍काजाम आंदोलन करण्याचा निर्णय येथे संघटनेच्या प्रमुख कार्यकर्त्यांच्या बैठकीत बुधवारी घेण्यात आला. जनावरांसह सांगली, कोल्हापूर कार्यकर्त्यांनी आंदोलनात सहभागी व्हावे, असे आवाहन करण्यात आले आहे.  

जयसिंगपूर परिसरात आंदोलनाची तीव्रता वाढली आहे. दोन वाहने जाळण्यात आली. अनेक वाहनांवर दगडफेक करून दूध ओतण्यात येत आहे. जिल्ह्यातील दूध संकलन ठप्प आहे. मात्र, शासनाकडून कोणतीच सकारात्मक भूमिका नसल्याने स्वाभिमानी संघटनेच्या  प्रमुख नेत्यांच्या उपस्थितीत येथील स्वाभिमानी दूध अ‍ॅग्रोच्या कार्यस्थळावर दुपारी बैठक झाली. यावेळी ‘स्वाभिमानी’चे जिल्हाध्यक्ष भगवान काटे, जिल्हा उपाध्यक्ष अजित पाटील, सांगली जिल्हाध्यक्ष सयाजी मोरे, उपाध्यक्ष महावीर पाटील यांच्यासह प्रमुख कार्यकर्ते उपस्थित होते.

सावकर मादनाईक म्हणाले, आंदोलन मोडीत काढण्याचा उद्योग शासन करीत आहे. मात्र, आम्ही घाबरत नाही. आमची ताकद दाखवून देऊ. मगच, दूध उत्पादक आणि शेतकर्‍यांची ताकद शासनाला कळेल. गायीच्या दुधाला पाच रुपयांचे अनुदान मिळावे, यासाठी आमचे आंदोलन आहे. मात्र, पोलिस बंदोबस्तात दुधाच्या गाड्या नेण्याचा प्रयत्न सुरू आहे. अनेक पक्षांनी स्वाभिमानीच्या आंदोलनाला पाठिंबा दिला आहे. नागपुरात सुरू असलेल्या अधिवेशनात प्रश्‍न उपस्थित करूनही दखल घेतली जात नाही. शासनाने आमचा अंत न पाहता योग्य निर्णय घ्यावा. दोन दिवसांत कार्यकर्त्यांवर पोलिसांनी गुन्हे नोंद केले आहेत. जमा केलेले दूध गोरगरिबांना वाटप केले जात आहे. उत्पादकही आंदोलनावर ठाम आहेत. तातडीने निर्णय न झाल्यास आंदोलन तीव्र करू, असा इशाराही मादनाईक यांनी दिला. 

स्वाभिमानी युवा आघाडीचे जिल्हाध्यक्ष सागर संभुशेटे म्हणाले, उद्यापासून चक्‍काजाम आंदोलन करू. याची सगळी जबाबदारी शासनाची राहील. यावेळी जिल्हाध्यक्ष भगवान काटे, प्रा. जालंदर पाटील यांनीही मनोगत व्यक्‍त केले. 

शांततेत आंदोलन  

चक्‍काजाम आंदोलन हे शांततेच्या आणि सत्याग्रहाच्या माध्यमातून केले जाईल. आम्हाला हिंसक व्हायचे नाही. मात्र, शासनाने आमच्या आंदोलनाचा अंत पाहू नये. तत्काळ निर्णय घ्यावा. जिल्ह्यात दूध संकलन ठप्प आहे. असे असताना कर्नाटकातून नंदिनी संघाचे दूध गोकुळ संघामध्ये आणून कोल्हापूर जिल्ह्यात दूध संकलन सुरू असल्याचे भासविले जात असल्याचा आरोपही यावेळी सागर संभुशेटे यांनी केला.