Sun, May 26, 2019 13:08होमपेज › Kolhapur › जिल्ह्यात हजारांवर मुले कुपोेेेषित

जिल्ह्यात हजारांवर मुले कुपोेेेषित

Published On: Aug 22 2018 12:56AM | Last Updated: Aug 21 2018 11:06PMकोल्हापूर : प्रतिनिधी

जिल्ह्यात 1 हजार 164 मुले कुपोषित आहेत. त्यापैकी 643 मुले तीव्र व 521 मुले मध्यम कुपोषित असल्याची माहिती महिला व बालकल्याण समितीच्या बैठकीत मंगळवारी देण्यात आली. जिल्ह्यातील कुपोषणाचे प्रमाण कमी करण्याच्या सूचना प्रशासनाला या बैठकीत देण्यात आल्या. अध्यक्षस्थानी महिला व बालकल्याण समिती सभापती सौ. वंदना मगदूम होत्या.

बैठकीत सुरुवातीला विविध योजनांचा तसेच कुपोषित बालकांचा आढावा घेण्यात आला. यामध्ये जिल्ह्यात कुपोषित बालकांची संख्या करवीरसारख्या सधन तालुक्यातही आढळत असल्याची माहिती पुढे आली. सर्वाधिक दरडोई उत्पन्नात आघाडीवर असलेल्या शिरोळ तालुक्यातही कुपोषित मुलांची अधिक असल्याचे सांगण्यात आले. या तालुक्यात 111 मुले अतिकुपोषित तर 90 मुले मध्यम कुपोषित असे एकूण 201 मुले कुपोषित असल्याचे आढळून आले आहे. करवीर तालुक्यात ही संख्या 63 इतकी आहे. त्यात 33 मुले अतिकुपोषित आहेत. सर्वात कमी कुपोषणाची संख्या आजरा तालुक्यात आढळून येते. या तालुक्यात कुपोषित मुलांची संख्या 28 इतकी आढळून आली आहे. याशिवाय भुदरगडमध्ये 85, चंदगड 70, गगनबावडा 62, हातकणंगले 163, कोल्हापूर ग्रामीण 75,
 कागल 104, पन्हाळा 96, राधानगरी 61, व शाहूवाडी तालुक्यात 90 मुले कुपोषित असल्याचे आढळून आले आहे.

आजच्या बैठकीत अंगणवाड्यांची तपासणी करण्याचा निर्णय घेण्यात आला. यामध्ये अंगणवाडीच्या समस्या तसेच कर्मचार्‍यांच्या अडचणी समजावून घेण्यात येणार आहेत. त्याचप्रमाणे अंगणवाड्यांना पुरविण्यात येणार्‍या आहाराच्या दर्जाबाबतही तपासणी करण्यात येणार आहे. कागल तालुक्यातून त्याची सुरुवात करण्यात येणार असल्याची माहितीही देण्यात आली.  समितीच्या वतीने राबविण्यात येणार्‍या वैयक्तिक लाभाच्या योजनांबाबतही आजच्या बैठकीत चर्चा झाली. लाभार्थ्यांच्या नावावर थेट अनुदान जमा करण्यापूर्वी ती रक्कम लाभार्थ्याला वस्तू घेताना भरावी लागत असल्याने या योजना राबविण्यावर मर्यादा येऊ लागल्या आहेत. त्यामुळे ही पद्धत बंद करावी व पूर्वीप्रमाणे लाभार्थ्यांना वैयक्तिक योजनांचा लाभ द्यावा, अशी मागणी या बैठकीत करण्यात आले. चर्चेत सौ. शिवाणी भोसले, सौ. आकांक्षा पाटील, सौ. सुनीता रेडेकर, श्रीमती रेखा हत्तरगी, सौ. कल्पना चौगुले आदींनी भाग घेतला.