Sat, Jul 20, 2019 23:32होमपेज › Kolhapur › शाहूवाडीतील ‘त्या’ 13 शाळा सुगमच!

शाहूवाडीतील ‘त्या’ 13 शाळा सुगमच!

Published On: Apr 23 2018 1:51AM | Last Updated: Apr 22 2018 11:08PMकोल्हापूर : नसिम सनदी 

शाळेपर्यंत जाण्यासाठी दळणवळणाची सोय नसल्याने शाहूवाडी तालुक्यातील 13 शाळांचा दुर्गममध्ये  समावेश करण्याच्या जिल्हा परिषदेच्या विनंतीला शासनाने केराची टोपली दाखवली आहे. 170 दुर्गम शाळांची यादी पाठवली असताना या 13 शाळा वगळून 157 शाळाच दुर्गम असतील, असे शिक्षण सचिवांनी जि.प. ला कळवले आहे. या शाळांनुसार बदली प्रक्रिया राबवण्याचे आदेशही दिले आहेत. 
दरम्यान, या निर्णयामुळे या 13 शाळा सुगम ठरल्याने आतापर्यंत प्रतिकूल परिस्थितीत शिकवणार्‍या शिक्षकांचा बदलीचा मार्ग काही वर्षांसाठी बंद झाल्याने त्यांच्यात नाराजी पसरली आहे. 

फेब्रुवारी 2017 च्या शासन आदेशानुसार सुगम, दुर्गम अशी स्थल निश्‍चिती करूनच खो पद्धतीने प्राथमिक शिक्षक बदलीचे धोरण यावर्षी राबवले जात आहे. आतापर्यंत मॅपिंग पूर्ण होऊन संवर्गनिहाय सेवाज्येष्ठतेनुसार अंतिम यादीही तयार झाली आहे. आता शासनाच्या आदेशानुसार प्रत्येक जिल्ह्याला स्वतंत्र वेळापत्रक देऊन आंतरजिल्हा बदली पूर्ण करून जिल्हांतर्गत बदली प्रक्रिया सुरू होणार आहे. 15 जूनला शाळा सुरू होण्याआधी ही प्रक्रिया पूर्ण करण्याचे शिक्षण सचिवांचे आदेश असल्याने संपूर्ण मे महिना या बदलीतच जाणार आहे. 

मॅपिंगनुसार सुगम-दुर्गम शाळा ठरवताना गेल्या वर्षी जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाने बराच गोंधळ घातला. तब्बल सहाशेच्या वर शाळा दुर्गममध्ये दाखवण्यात आल्या. राज्यातील इतर जिल्ह्याच्या तुलनेने कोल्हापूरचाच आकडा मोठा दिसत असल्याने त्यांनी फेरपडताळणी करण्यासाठी समिती पाठवली. या समितीने गटशिक्षणाधिकार्‍यांमार्फत फेरपडताळणी केल्यानंतर ही संख्या 600 वरून अवघ्या 157 पर्यंत खाली आली. 

दरम्यान, शाहूवाडीसारख्या डोंगराळ आणि अति पावसाच्या तालुक्यातील बर्‍याच शाळा दुर्गममधून काढून सुगममध्ये घातल्या गेल्याने विरोध होऊ लागला. या शाळांकडे जाण्यासाठी रस्ता नाही, मुख्यालयापासूनचे अंतर जास्त आहे. दळणवळणाच्या सुविधा पोहोचत नाहीत अशा तक्रारी वाढल्याने अखेर सीईओ डॉ. कुणाल खेमनार यांनी गटशिक्षणाधिकारी व विस्तार अधिकार्‍यांमार्फत या तालुक्यातील शाळांची फेरपडताळणी करण्यास सांगितले. त्यानुसार फेरपडताळणीत 13 शाळा या दुर्गम असल्याचे समोर आले. 

या शाळा दुर्गममध्ये समाविष्ट करून एकूण 170 शाळांचा अहवाल शासनाकडे पाठवण्यात आला, पण शिक्षण सचिव असिम गुप्‍ता यांनी या शाळा दुर्गम करण्यास स्पष्ट शब्दात नकार दर्शवला आहे. सुगममध्येच असल्याचे स्पष्ट करत त्याप्रमाणेच बदली प्रक्रिया राबवावी, असे सांगितले.

Tags : Kolhapur, schools, Shahuwadi,  accessible