Tue, Jul 14, 2020 00:06होमपेज › Kolhapur › ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांना शाहू पुरस्कार

ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांना शाहू पुरस्कार

Published On: Jun 12 2019 6:27PM | Last Updated: Jun 13 2019 1:13AM
कोल्हापूर : प्रतिनिधी

प्रतिष्ठेचा शाहू पुरस्कार गांधीवादी, ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांना जाहीर करण्यात आला. जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी बुधवारी सायंकाळी पत्रकार परिषदेत ही घोषणा केली. शाहू जयंतीदिनी 26 जून रोजी या पुरस्काराचे वितरण केले जाणार आहे.

राजर्षी शाहू छत्रपती मेमोरियल ट्रस्टच्या वतीने शाहू जयंतीनिमित्त सामाजिक, साहित्य, कला, संस्कृती, क्रीडा, विज्ञान आदी विविध क्षेत्रांत दीर्घकाळ उल्‍लेखनीय काम करणार्‍या व्यक्‍ती अथवा संस्थेला 1984 पासून ‘शाहू पुरस्कारा’ने गौरवले जाते. यंदाचा 34 वा पुरस्कार देशाच्या समाजकारणात मोठे योगदान दिलेल्या अण्णा हजारे यांना जाहीर करण्यात आला आहे. रोख एक लाख रुपये, स्मृतिचिन्ह व मानपत्र असे पुरस्काराचे स्वरूप आहे.

ट्रस्टच्या विश्‍वस्त मंडळाची जिल्हाधिकारी देसाई यांच्या अध्यक्षतेखाली दुपारी जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक झाली. या बैठकीत पुरस्कारासाठी अण्णा हजारे यांच्या नावाला एकमुखी संमती देण्यात आली. यानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत देसाई यांनी पुरस्काराची घोषणा केली. 

यापूर्वी या पुरस्काराने भाई माधवराव बागल, व्ही. शांताराम, डॉ. बाबा आढाव, तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी, गुरू हनुमान, दिल्‍ली, शाहीर विषारद पिराजीराव सरनाईक, साथी नानासाहेब गोरे, चंद्रकांत मांडरे, कुसुमाग्रज, उत्तर प्रदेशच्या मुख्यमंत्री मायावती, न्या. पी. बी. सावंत, रँग्लर जयंत नारळीकर, आशा भोसले, राजेंद्र सिंह, प्रा. एन. डी. पाटील, कॉ. गोविंद पानसरे, भाई वैद्य, माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार, पुष्पा भावे आदींनाही या पुरस्काराने सन्मानित करण्यात आल्याचेही देसाई यांनी सांगितले.

अण्णा हजारे यांनी केले राळेगणसिद्धीला दुष्काळमुक्‍त अहमदनगर जिल्ह्यातील भिंगार येथे 15 जून 1937 साली जन्मलेल्या अण्णा हजारे यांनी लष्करात वाहनचालक म्हणून सेवा बजावली. सैन्यातून राजीनामा दिल्यानंतर स्वामी विवेकानंद आणि महात्मा गांधी यांच्या विचारांपासून प्रेरणा घेत  त्यांनी समाजकार्याला प्रारंभ केला. राळेणगसिद्धी येथे ग्रामविकास व जलनियोजनाचे विविध प्रयोग राबवत त्यांनी गावाला दुष्काळमुक्‍त केले. राळेगणसिद्धीचा प्रकल्प हा आदर्श प्रकल्प म्हणून ओळखला जातो.

माहिती अधिकार कायद्याचे जनक

सर्वसामान्य जनतेला कोणतीही शासकीय माहिती मिळविण्याचे मोठे आयुध म्हणून ओळखल्या जाणार्‍या माहितीच्या अधिकार कायद्याचे अण्णा हजारे हे जनक आहेत. कित्येक आंदोलने करून त्यांनी सर्वसामान्य नागरिकांना माहिती मिळविण्याचा हक्‍क या कायद्याद्वारे प्राप्त करून दिला आहे. गावातील शाळेला मान्यता मिळवून देण्यासाठी अण्णांनी सर्वप्रथम 1979 मध्ये पहिले उपोषण केले. त्यांचे हे उपोषण यशस्वी झाले. यानंतर राज्य शासनाच्या वीस कलमी कार्यक्रमाची योग्य अंमलबजावणी व्हावी, यासाठी 1983 मध्ये अण्णांनी दुसर्‍यावेळी उपोषण केले. यानंतर विविध प्रश्‍नांवर अण्णांनी आंदोलन करत सरकारी यंत्रणेला जाग आणली. भ्रष्टाचाराविरोधात अण्णांनी अहिंसेच्या गांधीवादी मार्गाने केलेल्या आंदोलनामुळे काही मंत्र्यांना राजीनामा द्यावा लागला. अधिकार्‍यांवर कारवाया झाल्या. अण्णांनीच उभारलेल्या लढ्याने लोकायुक्‍त, लोकपाल नियुक्‍ती सुरू झाली आहे.

अहिंसेचा पुजारी; गांधीवादी समाजसेवक

ग्रामविकास, स्वावलंबन, साधी राहणी, अन्यायाविरोधात सातत्याने संघर्ष, उपोषण व सत्याग्रह या महात्मा गांधीजींच्या तत्त्वांचा अवलंब करत देशातील एक श्रेष्ठ गांधीवादी कार्यकर्ता अशी मान्यता मिळवलेल्या अण्णांनी जीवनात मोठे त्याग केले आहेत. सत्य, अहिंसा, असंग्रह, अस्तेय व ब—ह्मचर्य या सूत्रांचे ते काटेकोर पालन करत आले आहेत. अण्णांच्या आजवरच्या कार्याचा गौरव करत तामिळनाडू येथील गांधीग्राम सरल युनिव्हर्सिटीच्या वतीने त्यांना मानद डॉक्टरेट (डी.लिट.) ही पदवी बहाल करण्यात आली आहे. भारत सरकारने पद्मश्री व पद्मभूषण पुरस्कार देऊन त्यांच्या कार्याचा सन्मान केला आहे. यासह वर्ल्ड बँकेचा जिट गिल मेमोरियल अ‍ॅवॉर्ड, ट्रान्सपरन्सी इंटरनॅशनलचा इंटिग्रिटी पुरस्कार, भारत सरकारचा इंदिरा प्रियदर्शनी वृक्षमित्र पुरस्कार, केअर इंटरनॅशनल पुरस्कार तसेच  राज्य सरकारचा कृषिभूषण, असे 11 महत्त्वाचे पुरस्कार त्यांना मिळाले आहेत.

पत्रकार परिषदेला महापालिका आयुक्‍त मल्‍लिनाथ कलशेट्टी,  ट्रस्टच्या सचिव, तथा जिल्हा पुरवठा अधिकारी राणी ताटे, विश्‍वस्त ज्येष्ठ इतिहास संशोधक डॉ. जयसिंगराव पवार, प्रशासकीय अधिकारी राजदीप सुर्वे, व्यवस्थापक कृष्णाजी हारूगुडे, युवराज कदम आदी उपस्थित होते.

छत्रपती शाहू महाराजांचे कार्य प्रेरणादायी आहे. या महापुरुषांच्या नावाचा पुरस्कार मला जाहीर झाल्याचा सर्वोच्च आनंद आज झाला आहे.
- अण्णा हजारे, ज्येष्ठ समाजसेवक