Fri, Jul 19, 2019 13:26होमपेज › Kolhapur › राज्यात ठिकठिकाणी तेरा जण बुडाले

राज्यात ठिकठिकाणी तेरा जण बुडाले

Published On: Aug 20 2018 1:37AM | Last Updated: Aug 20 2018 1:19AMमुंबई/ कोल्हापूर ः प्रतिनिधी

पश्‍चिम महाराष्ट्रातील  कृष्णा-पंचगंगासह अनेक नद्या पुरामुळे दुथडी भरून वाहू लागल्या असून, त्यामुळे अनेक गावांना पुराचा वेढा पडला आहे. अनेक ग्रामीण भागांचा संपर्क तुटला आहे. राज्यात रविवारी वेगवेगळ्या घटनेत बारा जणांचा बुडून मृत्यू झाला आहे. यात कोल्हापूर जिल्ह्यातील भादोले येथील एका महिलेचा, तसेच हेब्बाळ कसबा नूल येथील एकाचा  समावेश आहे.

पेठवडगाव : हातकणंगले तालुक्यातील भादोले येथील सौ. जयश्री संभाजी पवार (वय 35, रा शिगाव, ता. वाळवा) या येथील वारणा नदीतून वाहून गेल्याची भीती व्यक्त होत आहे. 

दुसर्‍या घटनेत हेब्बाळ कसबा नूल (ता. गडहिंग्लज) येथील चंद्रशेखर पुजारी (42) हे गवताचा भारा आणण्यासाठी  शेतात गेले होते. येताना हिरण्यकेशी नदीपात्रातून ते वाहून गेले.

सौ. जयश्री व संभाजी पवार  शेती करतात. दोन दिवसांपासून जयश्री घरातून बेपता झाल्या. त्यांचा नातेवाईक, पाहुणे यांच्याकडे शोध घेण्यात आला. मात्र, त्या सापडल्या नाहीत. दरम्यान, त्या वारणा नदीतून वाहून गेल्याची शक्यता असल्याने पोलिस व नातेवाईकांची धावपळ उडाली आहे. रविवारी सायंकाळी सातनंतर हातकणंगले आपत्कालीन पथकाने नदीपात्रात शोधमोहीम सुरू केली. मात्र, हाती काही लागले नाही. रात्री उशिरा शोधमोहीम थांबविण्यात आली. सोमवारी शोधमोहीम सुरू राहणार असल्याचे आपत्ती कक्षातील अधिकार्‍यांनी सांगितले. अधिक तपास पोलिस निरीक्षक अशोक पवार करत आहेत.

यवतमाळ जिल्ह्यातील आर्णि तालुक्यात लोणी येथे पोहायला गेलेल्या  दोघा सख्ख्या चुलतभावांचा बुडून मृत्यू झाला. विनायक ढवळे (वय 14) आणि रोहन ढवळे (11) अशी त्यांची नावे आहेत. गावाशेजारच्या एका तलावात दोघेही पोहायला गेले होते. पावसामुळे तलावात भरपूर पाणी साठले होते. त्यात हे दोघे बुडाले.

गोंदियातील चौघांचा मृत्यू

मध्य प्रदेशातील बालाघाट जिल्ह्यात चार युवकांचा बुडून मृत्यू झाला. हे चौघेही गोंदिया जिल्ह्यातील आहेत. सर्व जण सहलीसाठी मध्य प्रदेशात गेले होते. चौघांंपैकी दोघांचे मृतदेह हाती लागले असून, इतर दोघांचा शोध सुरू आहे. उशिरापर्यंत त्यांचा शोध न लागल्याने शोधकार्य थांंबविण्यात आले. सोमवारी सकाळी पुन्हा शोधकार्य सुरू केले जाणार असल्याचे पोलिसांनी सांगितले.

रावेरमध्ये दोन मुले बुडाली

पाय घसरून नाल्यात पडल्याने दोघा शाळकरी मुलांचा मृत्यू झाल्याची घटना जळगाव जिल्ह्यातील रावेर येथे घडली. हे दोघेही घरी निघाले होते. त्यापैकी एकाचा पाय घसरून तो नाल्यात पडला. त्याला वाचविण्यासाठी दुसरा धावला आणि दोघेही बुडून मरण पावले.

कर्जतजवळ आई, दोन मुलींचा मृत्यू

रायगड जिल्ह्यातील कर्जत तालुक्यात कळंब येथे आईसोबत गेलेल्या दोन चिमुरड्या मुलींचा बुडून मृत्यू झाला. मारिया आणि तबिया अशी त्यांची नावे आहेत. आई कपडे धूत असताना, दोघीही जवळच पाण्यात खेळत होत्या. अचानक पाण्याच प्रवाह वाढला आणि दोघीही वाहून गेल्या.
रायगड जिल्ह्यातील माणगाव तालुक्यात गोरेगाव येथे तलावात बुडून चौदा वर्षांच्या मुलाचा मृत्यू झाला.