होमपेज › Kolhapur › थर्ड पार्टी ऑडिटशिवाय निधी नाही : पालकमंत्री

थर्ड पार्टी ऑडिटशिवाय निधी नाही : पालकमंत्री

Published On: Jun 21 2018 1:36AM | Last Updated: Jun 21 2018 1:20AMकोल्हापूर : प्रतिनिधी

विकासकामांचे ‘थर्ड पार्टी’ ऑडिट केल्याखेरीज पुढील निधी दिला जाणार नाही, असे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी बुधवारी स्पष्ट केले. जिल्हा नियोजन समितीची जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक झाली. जानेवारी महिन्यात जागे होऊ नका, कामांची मागणी घ्या, त्यानुसार 1 ऑगस्टपर्यंत आराखडा तयार करा, अशा कडक सूचनाही त्यांनी विविध विभागांच्या अधिकार्‍यांना दिल्या.

प्रारंभी रस्ते दुरुस्तीचे काय झाले, असा सवाल आ. हसन मुश्रीफ यांनी केला. अनेक रस्त्यांची अवस्था खराब आहे, त्याकरिता साडेबारा कोटी रु. निधी दिला. मार्चमध्ये निधी देऊनही काम का सुरू झाले नाही, अशी विचारणाही त्यांनी केली. यावर जिल्हा परिषदेचे कार्यकारी अभियंता बुरूड यांनी 185 कामे मंजूर आहेत. त्यापैकी 175 कामांच्या वर्क ऑर्डर निघाल्या असल्याचे सांगितले. त्यावर पालकमंत्री पाटील यांनी, अशीच परिस्थिती राहिली तर पुढील वर्षी खड्डे भरण्याच्या पलीकडे रस्ते जातील. रस्ताच नसेल तर खड्डे काय भरणार, असे सांगत या कामाची, तसेच पुढील वर्षासाठी वीस कोटींचा निधी देऊ, असे सांगितले. प्रा. जालंदर पाटील म्हणाले, गेल्या बैठकीतील सूचनेनुसार वाड्या-वस्त्या जोडण्यासाठी 386 गावांची यादी केली आहे, त्याला निधी द्यावा. त्यावर आराखडा तयार करा, या रस्त्यांसाठी प्राधान्याने निधी देऊ, असे पाटील यांनी सांगितले.

कृषी विभागाचा निधी परत का गेला, असा सवाल आ. मुश्रीफ यांनी केला. त्यावर ना. पाटील यांनी, त्याची चौकशी सुरू असल्याचे सांगत कृषी विभागाचे काय चाललेय कळत नाही. यावर्षी तरी दक्षता घ्या, असे सुनावत शेतकर्‍यांचे पैसे परत जातात हे चांगले नाही, असे अधिकार्‍यांना सुनावले. साकव उभारणी कामे  निधी उपलब्ध झाल्याने सुरू होतील, असे सांगण्यात आले.  गडहिंग्लज तालुक्यातील हणमंतवाडी येथील तलाव दुरुस्तीची मागणी  करण्यात आली. त्यावर जलयुक्‍त शिवार योजनेत समावेश न झालेल्या गावांनी प्रस्ताव द्यावेत, सिद्धिविनायक ट्रस्टच्या वतीने देण्यात आलेला एक कोटीचा निधी शिल्लक असल्याचे पाटील यांनी सांगितले.  

खासदार धनंजय महाडिक यांनी, डेंग्यूच्या पार्श्‍वभूमीवर तपासणी किट उपलब्ध झाले आहे, त्याची चाचणी घेऊन प्रयोग म्हणून ते काही गावांत देता आले तर त्याबाबतचा निर्णय घ्यावा, अशी विनंती केली. 
यावेळी जिल्हा परिषद अध्यक्षा सौ. शौमिका महाडिक, जिल्हाधिकारी अविनाश सुभेदार, महापालिका आयुक्‍त डॉ. अभिजित चौधरी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. कुणाल खेमनार, जिल्हा नियोजन अधिकारी सरिता यादव, आमदार डॉ.सुजित मिणचेकर, आमदार उल्हास पाटील, जिल्हा परिषदेचे गटनेते अरुण इंगवले आदी उपस्थित होते.

रस्ते व साकव म्हणजे विकास नव्हे

विविध योजनांच्या आदेशाच्या तयार करण्यात आलेल्या पुस्तिकेचे ना. पाटील यांच्या हस्ते प्रकाशन करण्यात आले. या पुस्तिकेचा सर्व सदस्यांनी अभ्यास करावा, असे आवाहन करत रस्ते आणि साकव म्हणजे विकास नव्हे, त्यापलीकडे आपण जात नाही असे सांगत ते म्हणाले, 54 प्रकारच्या योजना आहेत, त्याद्वारे आपल्या भागात निधी आणता येतो. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 125 व्या जयंतीनिमित्त मुख्यमंत्र्यांनी 300 कोटींचा निधी दिला आहे. प्रत्येक विधानसभा मतदारसंघासाठी प्रत्येकी एक कोटीचा निधी दिला जाणार आहे. त्यातून दलित वस्ती सुधारणेचे कोणतेही काम करता येणार आहे. डोंगरीसाठीही प्रत्येक आमदारांना एक कोटीचा निधी देण्यात आला आहे. खनिज प्रतिष्ठानमधूनही यावर्षी 16 कोटींचा निधी दिला आहे. योग्य समन्वय साधला, तर भरपूर निधी उपलब्ध होईल.

‘नियोजन’ सदस्यांना निधी

नियोजन समितीत निवडून आलेल्या 29 सदस्यांना विकासकामांना निधी देण्यात येतो. त्याचप्रमाणे निमंत्रित सदस्यांना निधी दिला जाईल, अशी घोषणा पालकमंत्री पाटील यांनी केली.

तोपर्यंत महापालिका, नगरपालिकांना निधी नको

अनेक कामांचे महापालिका, नगरपालिकांनी उपयोजिता प्रमाणपत्र (खर्च) दिलेले नाही. यापुढे हे प्रमाणपत्र आल्याखेरीज मंजूर निधी देऊ नका, असे आदेशच पाटील यांनी नगरपालिका विभागाचे प्रशासकीय अधिकारी नितीन देसाई यांना दिला.

जादा निधीसाठी प्रयत्न करू

कोल्हापुरात वाहतुकीची कोंडी होत आहे, त्याकरिता सिग्‍नलसाठी निधी द्यावा. शिंगणापूर योजनेच्या दुरुस्तीसाठीही निधीची गरज आहे. उपनगरांत पावसाळ्यात अनेक घरांत पाणी शिरते, त्याकरिता 3 कोटींचा प्रस्ताव सादर केला आहे, सावित्रीबाई फुले हॉस्पिटलला सुविधा द्या आदी मागण्या यावेळी करण्यात आल्या. त्यावर ही सर्व कामे नगरोत्थान योजनेतून केली जातात. याबाबत आपण केवळ ठराव करू शकतो, असे सांगत नगरोत्थानला निधी कमी असल्यास तो वाढवण्यासाठी मुख्यमंत्र्यांकडे पाठपुरावा करू, असे पाटील यांनी सांगितले.

इचलकरंजीच्यानिधीसाठी बैठक घेऊ

इचलकरंजीत अग्‍निशमन यंत्रणा सक्षम करणे, सध्याच्या पाणी योजनेची दुरुस्ती करणे, पालिकांच्या शाळांच्या इमारतींची दुरुस्ती करणे, आयजीएम रुग्णालयात आवश्यक सुविधा उपलब्ध करून देणे, वरदविनायक मंदिरासाठी, तसेच नाट्यगृह दुरुस्तीसाठी निधीची मागणी बैठकीत करण्यात आली. त्यावर या सर्व निधीसाठी संबंधित खात्याच्या मंत्र्यांशी चर्चा करू, त्यानंतर मुंबईत एकत्रित बैठक लावू, असेही पाटील यांनी सांगितले.

स्वच्छतागृह उभारणीसाठी पुढे या

आपल्या वाढदिवसानिमित्त आपण महिलांसाठी स्वच्छतागृहे उभारण्याचा संकल्प केला आहे. केवळ तीन दिवसांत उभा राहतील अशी टेक्नॉलॉजी असलेली स्वच्छतागृहे उभारली जात आहेत. त्यांच्या देखभालीची जबाबदारी कोण घेणार असेल तर सांगा, स्वच्छतागृहे उभारली जातील, असेही पाटील यांनी सांगत आपल्या परिसरात स्वच्छतागृह उभारणीसाठी पुढे या, त्याला निधी आपण देतो, असे आवाहनही केले.

364 कोटी 83 लाखांचा आराखडा

या वर्षीचा आराखडा 364 कोटी 83 लाख रुपयांचा असल्याचे पाटील यांनी सांगितले. यावर्षी 5.41 टक्के निधी वाढवून मिळाला आहे. गतवर्षीच्या आराखड्यापैकी 99.06 टक्के निधी खर्च झाला असल्याचेही त्यांनी सांगितले.

‘आडवाटेवरचे कोल्हापूर’नंतर आता धार्मिक पर्यटन

‘आडवाटेवरचे कोल्हापूर’ या उपक्रमाला उदंड प्रतिसाद मिळाला. या उपक्रमाच्या धर्तीवरच आता श्रावण महिन्यात दिवसाआड एक याप्रमाणे धार्मिक सहलींचे आयोजन करण्यात आले आहे.  अंबाबाईचे दर्शन घेऊन रामलिंग, नृसिंहवाडी, खिद्रापूर, औदुंबर अशा तीर्थक्षेत्रांचे दर्शन घडवले जाणार असल्याचेही पाटील यांनी सांगितले. यावेळी गगनबावड्याचाही पर्यटन विकासाचा आराखडा तयार करण्याच्या सूचना त्यांनी दिल्या.

डेंग्यूचे थैमान रोखण्यासाठी व्यापक प्रबोधन

डेंग्यूबाबत डॉ. खेमनार यांनी माहितीपर सादरीकरण केले. डेंग्यूचे थैमान रोखण्यासाठी प्रबोधन होणे गरजेचे आहे. त्यानुसार विविध माध्यमांद्वारे प्रबोधन करण्याच्या सूचना पाटील यांनी डॉ. खेमनार यांना दिल्या. रोजगार हमी योजनेचा निधी आहे, त्याद्वारेही सांडपाणी निर्गतीकरणाची कामे करता येतील, अशी सूचना आ. हाळवणकर यांनी केली.