Mon, Jun 24, 2019 20:56होमपेज › Kolhapur › जिल्हा बँकेतर्फे तृतीयपंथीयांचे बचत गट

जिल्हा बँकेतर्फे तृतीयपंथीयांचे बचत गट

Published On: Jun 01 2018 2:04AM | Last Updated: Jun 01 2018 1:07AMकोल्हापूर : प्रतिनिधी

समाजाने झिडकारलेल्या तृतीयपंथीयांसाठी सामाजिक बांधिलकी जपत कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती बँकेने स्थापन केलेल्या बचत गटांना पासबुकचे वाटप बँकेचे अध्यक्ष आमदार हसन मुश्रीफ यांच्या हस्ते करण्यात आले. बँकेच्या प्रधान कार्यालयात हा कार्यक्रम झाला. तृतीयपंथीयांचे बचत गट करणारी कोल्हापूर जिल्हा बँक ही पहिली बँक आहे.आ. मुश्रीफ म्हणाले, समाजाने झिडकारलेल्या या घटकांना सन्मानाने जगता यावे, यासाठी बँकेने बचत गटाच्या माध्यमातून अर्थसहाय्य करण्याचे धोरण निश्‍चित केले आहे. अशा बचत गटांना कमी व्याजानेे कर्ज उपलब्ध करून देऊन त्यांना विविध व्यवसाय व उद्योगांचे प्रशिक्षण देऊन घरबसल्या रोजगार उपलब्ध व्हावा व अर्थार्जन होऊन त्यांचे जीवनमान उंचावण्याचा हा प्रयत्न आहे.

अ‍ॅड. दिलशाद मुजावर म्हणाले, तृतीयपंथीयांची संपूर्ण जिल्ह्यात 1800 संख्या आहे. यामध्ये केवळ  इचलकरंजी शहरात ही संख्या 250 आहे. या सगळ्यांच्या आर्थिक स्थैर्यासाठी हळूहळू जिल्हा बँकेच्या माध्यमातून प्रयत्न करण्यात येतील.याप्रसंगी माजी आमदार महादेवराव महाडिक, माजी आमदार पी. एन. पाटील, माजी खासदार श्रीमती निवेदिता माने, श्रीमती उदययानीदेवी साळुंखे, भय्या माने, बाबासाहेब पाटील-आसुर्लेकर, विलासराव गाताडे आदी उपस्थित होते. या कामासाठी नाबार्डचे महाप्रबंधक नंदकुमार नाईक, अ‍ॅड. दिलशाद मुजावर, बँकेचे निरीक्षक राजू लायकर यांनी विशेष परिश्रम घेतले.

यावेळी आदिमाया बचत गटाचे काशिनाथ डोणे व राखी गोरवाडे, दिलासा स्वयंसहाय्यता बचत गटाचे कुमार पाटील व अनिल कोलप, जगदंबा बचत गटाचे मस्तानी नगरकर व संजना जाधव, रेणुका बचत गटाचे संतोष महाजन व नितीन पोवार, धावती रेणुका महिला बचत गटाच्या प्रिया ऊर्फ भरत सवाईराम व सुनील उत्करे, साईनाथ बचत गटाचे अशोक सूर्यवंशी व इस्माईल शेख आदी बचत गटातील कार्यकर्ते उपस्थित होते.स्वागत व प्रास्ताविक मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. ए. बी. माने यांनी केले.