Sat, Jul 20, 2019 11:09होमपेज › Kolhapur › क्रीडा संकुल कामाचे थर्डपार्टी ऑडिट करा

क्रीडा संकुल कामाचे थर्डपार्टी ऑडिट करा

Published On: Jul 12 2018 1:41AM | Last Updated: Jul 12 2018 12:11AMकोल्हापूर : प्रतिनिधी

विभागीय क्रीडा संकुलाच्या पहिल्या टप्प्यात झालेल्या कामाचे थर्डपार्टी ऑडिट करा, असे आदेश देत जलतरण व डायव्हिंग तलावाच्या समस्येवर कायमस्वरुपी उपाययोजना करण्यासाठी आयआयटी मुंबई यांच्याकडून मार्गदर्शन घेऊनच काम करावे, अशी सूचना विभागीय आयुक्‍त डॉ. दीपक म्हैसेकर यांनी केली. विभागीय क्रीडा संकुल समितीची बुधवारी जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक झाली. संकुलासाठी जिल्हा सुरक्षा रक्षक मंडळाकडून सुरक्षा रक्षक नियुक्‍त करण्यास बैठकीस मान्यता देण्यात आली. 

डॉ. म्हैसेकर म्हणाले, जलतरण व डायव्हिंग तलावाच्या समस्येवर कायम स्वरुपी उपाययोजना करण्यासाठी शासकीय यंत्रणा तसेच काही संस्थांकडून प्रस्ताव प्राप्त झाले आहेत. त्या प्रस्तावावर आयआयटी मुंबई यांच्याकडील मार्गदर्शनानुसार कार्यवाही करणे सोयीचे होईल.संकुलातील पहिल्या टप्यात झालेल्या कामांचे थर्ड पार्टी ऑडिट करून घ्या, पहिल्या टप्प्यात 17 कोटी 40 लाखांची विविध कामे झाली आहेत. त्या कामांची गुणवत्ता तपासणी करणे महत्त्वाचे आहे. दुसर्‍या टप्प्यात वसतिगृह आणि मल्टिपर्पज हॉल उभारण्याच्या दृष्टीने परिपूर्ण प्रस्ताव सार्वजनिक बांधकाम विभागाला तत्काळ सादर करावा. त्यामध्ये ग्रीन बिल्डिंग तसेच सोलर एनर्जी सिस्टीम या उपक्रमाचाही समावेश करावा, अशी सूचना त्यांनी केली. 

मुख्य प्रवेशद्वाराचे बांधकाम आणि स्वच्छतागृह बांधकामाची प्रशासकीय प्रक्रिया ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यापर्यंत पूर्ण करून या कामास सुरुवात करण्याच्या दृष्टीने नियोजन करावे. क्रीडा संकुलास नव्याने मिळालेल्या 75 आर जागेबाबतचा डीपी प्लॅन तपासून घेऊन पुढील कार्यवाही करावी. क्रीडा संकुलातील सुविधा भाडेतत्त्वावर चालविण्यास देण्यासाठी सर्व संघटनांकडून प्रस्ताव मागवून त्याबाबतची कार्यवाही करावी, अशीही सूचना त्यांनी केली. या बैठकीस जिल्हाधिकारी अविनाश सुभेदार, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. कुणाल खेमनार, महापालिका आयुक्‍त डॉ. अभिजित चौधरी, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता सदाशिव साळुंखे, कार्यकारी अभियंता संजय सोनवणे, पोलीस उपअधीक्षक सूरज गुरव, शहर अभियंता नेत्रदीप सरनोबत, जिल्हा क्रीडा अधिकारी चंद्रशेखर साखरे, क्रीडा अधिकारी बाजीराव देसाई आदी उपस्थित होते.