Thu, Jun 04, 2020 03:25होमपेज › Kolhapur › रक्षा विसर्जनासाठी वाराची अट नको...

रक्षा विसर्जनासाठी वाराची अट नको...

Published On: Dec 14 2017 2:18AM | Last Updated: Dec 14 2017 1:38AM

बुकमार्क करा

कोल्हापूर : प्रतिनिधी

करवीरवासीयांना नम्र विनंती......अशा आशयाचा शहरात लागलेला फलक लक्षवेधी ठरत आहे. स्मशानभूमीत विधीसाठी तासन्तास ताटकळणार्‍या नागरिकांसाठी अत्यंत सूचक असा हा फलक आहे. फलकाद्वारे रक्षा विसर्जनासाठी कोल्हापूरकरांकडून मंगळवार, शुक्रवार, शनिवार, पंधरवड्याची एकादशी, संकष्टी, अमावस्या, पौर्णिमा हे वार आणि सण वगळले जातात. यामुळे अनेकदा स्मशानभूमीत विधींसाठी एकाच दिवशी अनेक ठिकाणचे नागरिक जमा होतात आणि नागरिकांचे तासन्तास स्मशानभूमीतील विधींसाठी निघून जातात. 

माणसाच्या जन्माला आणि मृत्यूला मुहूर्त, दिवस, काळ आणि वेळ नाही. मग, मृत्यूनंतरच्या विधींसाठी दिवसाची अट कशासाठी? मृत्यूनंतर केल्या जाणार्‍या रक्षा विसर्जन विधीसाठी ठरावीक वारच धरले जात असल्याने शहरातील स्मशानभूमीत प्रचंड गर्दी होऊ लागली आहे. अनेकदा विधीसाठी नागरिकांना नंबर लावून थांबावे लागत आहे. ही अडचण दूर व्हावी यासाठी नागरिकांनी ठरावीक वारांचे दडपण मनातून दूर करण्याची गरज आहे. याबाबत जनजागृती करण्यासाठी दीपक पोलादे यांनी हा फलक लावला आहे. त्या फलकाद्वारे वस्तुस्थिती मांडण्याचे धाडस त्यांनी केले आहे. शिवाय, पंचगंगा स्मशानभूमीऐवजी शहरात कदमवाडी व बापट कॅम्प येथील स्मशानभूमींचाही वापर व्हावा, असे आवाहन केले आहे.