Mon, Jun 17, 2019 03:07होमपेज › Kolhapur › शिवाजी पुलावरून दहा टनांपेक्षा जास्त वाहतूक नको

शिवाजी पुलावरून दहा टनांपेक्षा जास्त वाहतूक नको

Published On: Jan 29 2018 1:40AM | Last Updated: Jan 29 2018 12:58AMकोल्हापूर : प्रतिनिधी 

कोल्हापूर-रत्नागिरी महामार्गावर पंचगंगा नदीवरील ब्रिटिशकालीन शिवाजी पुलावर झालेल्या अपघाताच्या पार्श्‍वभूमीवर रविवारी स्ट्रक्चरल ऑडिट करण्यात आले. सुमारे चार तास केलेल्या पाहणीत या पुलावरून दहा टनांपेक्षा जादा वाहतूक करू नये, या निष्कर्षापर्यंत अधिकारी आले आहेत. याचा अहवाल नॅशनल हायवे विभागास प्राप्त होणार आहे. 

शिवाजी पुलास 140 वर्षे पूर्ण झाली आहेत. या पुलास पर्यायी पूल बांधण्यात येत आहे. मात्र, पर्यायी पुलाचे काम रखडल्याने शिवाजी पुलावरून धोकादायकरीत्या वाहतूक सुरू आहे. शुक्रवारी रात्री पुलाचा कठडा तोडून टेम्पो ट्रॅव्हलर नदीत कोसळली. या भीषण अपघातात तेराजण ठार झाले. या अपघातामुळे पुन्हा एकदा पर्यायी पुलाचा प्रश्‍न ऐरणीवर आला आहे. 

नॅशनल हायवे विभागाच्या सूचनेनुसार ध्रुव कन्स्लटन्सी या एजन्सीने रविवारी दुपारी बारा वाजता शिवाजी पुलाचे स्ट्रक्चरल ऑडिट केले. मोबाईल व्हॅनसह दहा-बाराजणांंचे पथक शिवाजी पुलावर दाखल झाले. मोबाईल व्हॅनला असणार्‍या क्रेनच्या बकेटमध्ये बसून या पथकातील अधिकार्‍यांनी शिवाजी पुलाची संपूर्ण पाहणी केली. पुलाच्या सर्व भिंती, पाचही कमानींची दोन्ही बाजूंनी सविस्तर पाहणी करण्यात आली.

पुलाचे दगड, भिंतीच्या दरजा, कमानी, कमानीचे दगड, भिंतीच्या मुळातील भाग अशा सर्व भागांची या पथकाने पाहणी केली. क्रेनद्वारे पुलाच्या प्रत्येक भागापर्यंत हे पथक पोहोचले. पुलास कुठे क्रॅक आहे का, याचीही पाहणी करण्यात आली. झाडेझुडपे मुळासकट नष्ट करण्यासाठी एक किलो हिंग पावडर वीस लीटर पाण्यात मिसळून ते द्रावण मुळापर्यंत सोडण्याचा सल्ला दिला आहे. ध्रुव कन्स्लटन्सीचे प्रोजेक्ट मॅनेजर बी. बी. इखे यांच्या मार्गदर्शनाखाली दहा ते बारा अधिकार्‍यांच्या पथकाने ही पाहणी केली. यावेळी नॅशनल हायवे विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

इपॉक्सी ट्रिटमेंटद्वारेच दरजा भरा

अधिकार्‍यांच्या पाहणीत कमानीचा दरजा निखळल्याचे स्पष्ट झाले आहे. यामुळे कमानीच्या दगडांना धोका निर्माण झाला आहे. अनेक ठिकाणी वडाची झाडे-झुडपे उगवली आहेत. ती त्वरित काढून टाकण्याच्या सूचना दिल्या आहेत. तसेच दोन दगडांतील सिमेंट निघाल्याने पूल कमकुवत होत आहे. त्यामुळे या दरजा भरताना सिमेंट व वाळूचा वापर न करता इपॉक्सी ट्रिटमेंटद्वारे या दरजा भरा, अशी सूचना केली आहे.