Wed, Nov 13, 2019 12:29होमपेज › Kolhapur › पंचगंगा प्रदूषणप्रश्‍नी नेमलेल्या समितीची बैठकच नाही

पंचगंगा प्रदूषणप्रश्‍नी नेमलेल्या समितीची बैठकच नाही

Published On: Jul 09 2018 1:18AM | Last Updated: Jul 09 2018 12:49AMकोल्हापूर ः प्रतिनिधी 

पंचगंगा नदीचे प्रदूषण रोखण्यासाठी पर्यावरण मंत्री रामदास कदम यांनी अलीकडेच संपूर्ण नदीपात्राला भेट देऊन प्रदूषण होणार्‍या ठिकाणांची पाहणी केली असताना याबाबत उपाययोजना करण्यासाठी विभागीय आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली नेमलेल्या समितीची बैठकच नऊ महिने उलटले तरी झालेली नाही, असे समोर आले आहे.

गेल्या आठवड्यात मंत्री कदम यांनी कोल्हापूरसह इचलकरंजी, शिरोळ येथे भेट देऊन पंचगंगा नदी प्रदूषणाची माहिती घेतली. त्यानंतर जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या बैठकीत महापालिका आयुक्तांसह इचलकरंजी नगरपालिकेच्या मुख्याधिकार्‍यांवर गुन्हे दाखल करण्याचे आदेश त्यांनी दिले. एकीकडे पर्यावरण मंत्री रस्त्यावर उतरून पंचगंगा नदी प्रदूषणाबाबत गंभीर असताना हे प्रदूषण रोखण्यासाठी नेमलेली समिती मात्र कागदावरच आहे. 

विभागीय आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली नेमलेल्या या समितीत जिल्हाधिकारी, महापालिका आयुक्त, इचलकरंजी नगरपालिकेचे मुख्याधिकारी, पाटबंधारे विभागाचे अधीक्षक अभियंता, प्रदूषण नियंत्रण मंडळाचे प्रादेशिक अधिकारी व स्वयंसेवी संस्थेचे प्रतिनिधी यांचा समावेश आहे. उच्च न्यायालयानेही पंचगंगेचे प्रदूषण रोखण्यासाठी कालबध्द कार्यक्रम तयार करण्याचे आदेश दिले आहेत. त्याची अंमलबजावणी होण्याची गरज असताना या समितीचीच बैठक झालेली नाही. 

याबाबत प्रजासत्ताक संस्थेने विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर यांना पत्र लिहून तातडीने ही बैठक घेण्याची मागणी केली आहे. केवळ कोणत्या कार्यालयात बसून ही बैठक न घेता प्रत्यक्ष पंचगंगेच्या प्रदूषणाला कारणीभूत असलेल्या घटकांची जागेवर जाऊन पाहणी करण्याची मागणीही या संस्थेने केले आहे.