Thu, Apr 25, 2019 21:44होमपेज › Kolhapur › तब्बल 125 गावांत स्मशानभूमीच नाही

तब्बल 125 गावांत स्मशानभूमीच नाही

Published On: Aug 03 2018 1:35AM | Last Updated: Aug 02 2018 11:55PMकोल्हापूर : विकास कांबळे

सधन जिल्हा म्हणून ओळखण्यात येणार्‍या कोल्हापूर जिल्ह्यातील ग्रामीण भागात अजूनही अंत्यसंस्काराची हेळसांड होत आहे. जिल्ह्यातील गावे, वाड्या व वस्त्या मिळून साधारणपणे सव्वाशे ठिकाणी अजूनही स्मशानशेड अभावी उघड्यावरच दहन द्यावे लागत आहे. स्मशानाच्या दुरुस्तीसाठी निधी उपलब्ध होत नसल्यामुळे जवळपास तेवढ्याच स्मशानशेडवरील पत्रे गायब झाले असल्याने अंत्यसंस्कार करताना नातेवाईक व गावकर्‍यांना पावसातही घाम फुटत आहे.

दरडोई उत्पन्नात कोल्हापूर जिल्ह्याचे नाव देशपातळीवर घेतले जाते. मात्र, जिल्ह्यातील सर्वच तालुके सधन नाहीत. काही तालुके अतिशय मागासलेले आहेत. काही तालुक्यांमधील गावे अशी आहेत की ही गावे नकाशावरही लवकर सापडत नाहीत. अशा गावांना अजूनही मूलभूत सुविधांसाठी वाट पहावी लागते. अजूनही जिल्ह्यातील सर्व गावांमध्ये स्मशानशेड नसल्यामुळे त्याठिकाणी उघड्यावर प्रेतांना दहन द्यावे लागत आहे. डोंगराळ, दुर्गम भागातील वाड्या-वस्त्यांमध्ये लोकसंख्या कमी असते. त्यामुळे याठिकाणी प्रशासनही लक्ष देत नाही आणि राजकारणी लोकही त्याकडे बघत नसल्याने अजूनही जवळपास सव्वाशे ठिकाणी स्मशान शेडच बांधण्यात आलेले नाही.

काही ठिकाणी जागेचा प्रश्‍न आहे. स्मशानभूमीसाठी जागा देण्यासाठी कोणी तयार होत नाही. सरकारी जागा जरी असली तरी त्याच्या शेजारी असणारा खासगी जागा मालक त्याठिकाणी स्मशानभूमीला विरोध करत असल्याचे चित्र आहे. पूर्वी गावाबाहेर म्हणून स्मशानशेड उभारण्यात आली आहेत. गावांचा विकास झापाट्याने होत आहे. नागरिकरणाचा वेग दिवसेंदिवस वाढत आहे. त्यामुळे बांधकामांची संख्या वाढली. त्याचा परिणाम पूर्वी गावाबाहेर म्हणून उभारण्यात आलेल्या स्मशानभूमी आता गावाच्या मध्यावर येऊ लागली आहेत. अशा स्मशानभूमी हलविण्यासाठी प्रयत्न सुरू होतात; मात्र पर्यायी जागा उपलब्ध होत नसल्याने ही स्मशानभूमी हटविणे शक्य होत नाही. मग त्याची मोडतोड करण्यास सुरुवात होते. स्मशानभूमी बांधण्यासाठी निधी उपलब्ध करून दिला जातो. त्यातून स्मशानशेड उभारण्यात येते. दुर्गम, डोंगराळ भागात एकाच पावसाळ्यात स्मशानशेडवरील पत्रे खराब होतात. स्मशानभूमीच्या दुरुस्तीसाठी जिल्हा परिषदेकडून निधी दिला जात नाही. ग्रामपंचायत निधीतूनच ही कामे करावी लागतात. शहरालगत असलेल्या ग्रामपंचायतींची आर्थिक स्थिती चांगली आहे. मात्र, जिल्ह्यातील  सर्वच ग्रामपंचायतींची आर्थिक स्थिती बळकट नाही. पाण्याचे, लाईटचे बिल भागवितानाही काही ग्रामपंचायतींना कसरत करावी लागते. अशी परिस्थती जिल्ह्याच्या काही भागातील गावांची आहे. त्यामुळे अजूनही सव्वाशे गावांना माळावर उघड्यावरच प्रेतांवर अंत्यसंस्कार करावे लागत आहेत.