Thu, Apr 25, 2019 03:42होमपेज › Kolhapur › कृषिपंपांची निम्मी थकबाकी बोगस!

कृषिपंपांची निम्मी थकबाकी बोगस!

Published On: | Last Updated:

बुकमार्क करा

कोल्हापूर : सुनील कदम

जिल्ह्यातील निम्म्याहून अधिक कृषिपंपांची थकबाकी ही बोगस असल्याची बाब माहिती अधिकारामुळे चव्हाट्यावर आली आहे. शेतकर्‍यांकडून प्रत्यक्ष वापर होत असलेल्या विजेपेक्षा जवळपास दुप्पट वीज वापराची बिले महावितरणने त्यांच्या खात्यावर लादल्याचे यामुळे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे या संपूर्ण प्रकाराची चौकशी होण्याची आवश्यकता आहे.

राज्य शासनाने 1 नोव्हेंबर 2017 रोजी कृषी संजीवनी योजना जाहीर केली होती. या योजनेनुसार कृषिपंपांच्या वीज बिलांची तपासणी व दुरुस्ती करण्यात आली होती. या योजनेनुसार संबंधित शेतकर्‍यांच्या वीज बिलात किती रकमेची कपात झाली याची माहिती वीज ग्राहक संघटनेच्या वतीने माहिती अधिकारात विचारण्यात आली होती. त्यानुसार जिल्ह्यातील एकूण आठ उपविभागांतील शेतकर्‍यांनी केलेल्या तपासणी अर्जानुसार 53.3 टक्के वीज बिलांची थकबाकी ही बोगस असल्यामुळे कमी झाल्याचे महावितरणच्या वतीने स्पष्ट करण्यात आलेले आहे. याचा अर्थ शेतकर्‍यांच्या दाखविल्या जात असलेल्या वीज बिलांच्या थकबाकीपैकी जवळपास निम्म्याहून अधिक थकबाकी खोटी असल्याची बाब स्पष्ट झाली आहे. यामधून आणखी असाही अर्थ काढला जाऊ शकतो की आजपर्यंत शेतकर्‍यांकडून जवळपास दुपटीहून अधिक दराने वीज बिलांची वसुली करण्यात आलेली आहे.

ही सगळी आकडेवारी विचारात घेता शासनाने कृषिपंपांसाठी दिलेल्या अनुदानातही घपला झाल्याची बाब अधोरेखीत होते. राज्य शासनाकडून शेतकर्‍यांना जे अनुदान देण्यात येते ते अनुदानही जवळपास दुपटीने लाटण्यात आल्याचेही या निमित्ताने स्पष्ट होत आहे. या आकडेवारीतून आणखीही एक बाब स्पष्ट होत आहे, ती म्हणजे महावितरणच्या माध्यमातून दाखविण्यात येत असलेली वीज गळती प्रत्यक्षात जादा असली पाहिजे. कारण ज्या प्रमाणात शेतकर्‍यांच्या वीज बिलात वाढ दिसते, त्याच प्रमाणात गळतीचेही प्रमाण असण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे या सगळ्या बाबींची सखोल चौकशी होण्याची आवश्यकता आहे. वाढीव वीजबिलाच्या माध्यमातून होणारी लूट लक्षात आल्याने राज्यातील लाखो शेतकरी एकजुट झाले आहेत. महावितरणच्या अन्यायी दरवाढीविरोधात शेतकरी रस्त्यावरच्या लढाईसाठी सज्ज आहे.

Tags : Kolhapur, Kolhapur News, need, complete, inquiry.


  •