Tue, May 21, 2019 04:04होमपेज › Kolhapur › दौलतनगरात दोन गटांत धुमश्‍चक्री

दौलतनगरात दोन गटांत धुमश्‍चक्री

Published On: Jul 27 2018 1:25AM | Last Updated: Jul 27 2018 12:51AMकोल्हापूर : प्रतिनिधी 

लहान मुलांत झालेल्या भांडणातून दौलतनगरातील दोन गटांतील वाद उफाळून आला. दगड, विटा, बाटल्या घरांवर भिरकावण्यात आल्या. यामध्ये तीन महिलांसह चौघे जखमी झाले, तर चार ते पाच वाहनांची तोडफोड करण्यात आली. गुरुवारी रात्री दहाच्या सुमारास तीनबत्ती चौकात हा प्रकार घडला. पोलिसांनी धरपकड करून दहा ते बारा जणांना ताब्यात घेतले. सुरेखा रामचंद्र पाटील (वय 50), जयश्री संजय पाटील (38), धनाजी तानाजी पाटील (26, सर्व रा. तीनबत्ती चौक, दौलतनगर) अशी जखमींची नावे आहेत. जखमींवर सीपीआरमध्ये उपचार सुरू असून अन्य एका महिलेच्या डोक्यात दगड लागल्याने तिला खासगी रुग्णालयात हलविण्यात आले.

रविवारी दौलतनगरातील दोन मंडळातील लहान मुलांचे भांडण झाले होते. याच कारणावरून गुरुवारी सायंकाळी काही तरुणांत वाद झाला. हा वाद रात्री उफाळून आला. तीन बत्ती चौकातील दोन मंडळांचे कार्यकर्ते एकमेकांना भिडले. दगड, विटांसह काचेच्या बाटल्या शेजारील घरांवर भिरकावण्यात आल्या. चौकातील चार ते पाच मोटारसायकलींचीही जमावाकडून तोडफोड करण्यात आली. दगडफेकीची माहिती मिळताच राजारामपुरी पोलिस घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांच्या वाहनावरही विटा फेकण्यात आल्या. तीन बत्ती चौक आणि परिसरातील दोन बोळांमध्ये विटा व दगडांचा खच पडला होता. 

पोलिसांनी रात्री उशिरापर्यंत कोंम्बिंग ऑपरेशन राबवून दहा ते बारा जणांना ताब्यात घेतले. संशयितांमध्ये दोन्ही गटांतील तरुणांचा समावेश आहे. त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्याचे काम रात्री उशिरापर्यंत सुरू होते. पोलिस निरीक्षक औदुंबर पाटील, सहायक निरीक्षक गजेंद्र लोहार, उपनिरीक्षक मीनाक्षी माळी या अधिकार्‍यांसह पोलिस घटनास्थळी थांबून होते. आणखी काही संशयितांची धरपकड करण्यात येणार असल्याचेही पोलिसांकडून सांगण्यात आले. यामुळे ताब्यात घेतलेल्या संशयितांची संख्या वाढणार आहे. 

दोन मंडळांतील वाद 

दौलतनगर परिसरातील दोन तरुण मंडळात नेहमी हाणामारीचे प्रकार घडतात. त्र्यंबोली यात्रेच्या पार्श्‍वभूमीवर असे वादाचे प्रसंग पुन्हा निर्माण होण्याची शक्यता गृहीत धरून पोलिसांकडून याठिकाणी बंदोबस्त लावण्यात आला आहे. 

उमा टॉकीज चौकात वादावादी

दरम्यान, गुरुवारी रात्री अकराच्या सुमारास उमा टॉकीज चौकात तरुणांमध्ये वादावादी झाली. चौकातील पानपट्टीसमोरच तरुण एकमेकांच्या अंगावर धावून गेले. पूर्वीच्या वादातून हा प्रकार झाल्याचे समजते. काही वेळातच पोलिस घटनास्थळी आल्याने जमाव पांगला. रात्री उशिरापर्यंत याची नोंद पोलिसांत झाली नव्हती.