होमपेज › Kolhapur › लोकसभेसाठी उमेदवार निश्‍चित, पक्ष अनिश्‍चित

लोकसभेसाठी उमेदवार निश्‍चित, पक्ष अनिश्‍चित

Published On: Mar 13 2018 1:41AM | Last Updated: Mar 13 2018 12:27AMकोल्हापूर : विठ्ठल पाटील

लोकसभेच्या कोल्हापूर मतदारसंघासाठी दोन उमेदवार निश्‍चित आहेत, परंतु त्यांचे पक्ष अनिश्‍चित अशी स्थिती आहे. खा. धनंजय महाडिक राष्ट्रवादी पक्षात आहेत, तर त्यांचे प्रतिस्पर्धी म्हणून निवडणूक लढविणारे प्रा. संजय मंडलिक शिवसेनेचे सहसंपर्कप्रमुख आहेत. कोल्हापूर मतदारसंघातून निवडणूक लढण्याचे दोघांनीही जाहीर केले असले तरी कोणत्या पक्षाकडून हे गुलदस्त्यात आहे. भविष्यातील राजकीय स्थित्यंतरे पाहून योग्यवेळी निर्णयाची भूमिका दोघांनीही घेतली आहे.

पक्ष कोणताही असो, कोल्हापूर मतदारसंघातून आपण पुन्हा खासदार होणारच असे धनंजय महाडिक यांनी जाहीर केले आहे. महाडिक यांचे भाजपमध्ये स्वागत असल्याचे सांगत खासदार झाल्यानंतर थेट मंत्रिपदाची ऑफरही पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी त्यांना दिली आहे. दुसरीकडे प्रा. मंडलिक यांना खासदार करणारच असा विडा आ. हसन मुश्रीफ यांनी उचलला आहे. आता त्यात आ. सतेज पाटीलसुद्धा यामध्ये सहभागी झाले आहेत. आ. मुश्रीफ राष्ट्रवादीचे तर आ. पाटील काँग्रेसचे नेते आहेत. दोघांनीही प्रा. मंडलिक यांना लोकसभेच्या कोल्हापूर मतदारसंघातून लढण्यासाठी थेट पाठिंबा जाहीर केला आहे. याचाच अर्थ जिल्ह्यात दोन्ही काँग्रेस मंडलिक यांच्या बाजूने ठाम राहणार असल्याचे सध्याचे चित्र आहे. त्यामुळे मंडलिक यांना शिवसेनेशिवाय अपक्ष अथवा कोणत्याही काँग्रेसकडूनच लढावे लागेल, असे संकेत आहेत. कारण ते जर सेनेकडून लढले तर काँग्रेसचा पाठिंबा राहणार का असा प्रश्‍न आहे.

भाजपविरोधात दोन्ही काँग्रेस असे या लढतीचे चित्र सध्यातरी आहे. म्हणजेच धनंजय महाडिक भाजपकडून लढणार असे गृहित धरले जात आहे. प्रत्यक्षात लोकसभा निवडणूक पक्षीय स्तरावर कशी लढली जाणार हे महत्त्वाचे आहे. राष्ट्रीय आणि राष्ट्रवादी काँग्रेसने आघाडी केली आणि भाजप-सेनेची युती झाली तर उमेदवारीची गणिते सोपी होतील, पण जागा वाटपाचा तिढा निर्माण होऊ शकतो. जर प्रत्येक पक्षाने स्वबळाचा नारा दिला तर महाडिक आणि मंडलिक यांना पाठिंबा जाहीर करणार्‍यांची पंचाईत होऊ शकते. असे अनेक जर तर चे प्रश्‍न आहेत. तरीही सध्याची राजकीय स्थिती पाहता पुढील दहा महिने निवडणूक जाहीर होईपर्यंत महाडिक विरुद्ध मंडलिक यांच्यातील आरोप-प्रत्यारोप जाहीर सभातून ऐकावे लागणार आहेत. महाडिक भाजपकडून लढले तर मुश्रीफ व पाटील यांचे मनसुभे सोपे होण्यास मदत होईल, तेच जर राष्ट्रवादीकडून लढले तर दोघांची पंचाईत होईल.

स्वबळावर निवडणुकीचा निर्णय झाल्यास आणि महाडिक भाजपकडे गेल्यास अर्थातच मंडलिक यांना सेनेला जय महाराष्ट्र करावा लागेल. राष्ट्रवादीची उमेदवारी घेऊन त्यांना लढावे लागेल. राष्ट्रीय काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसची आघाडी झाल्यास मंडलिक यांना सोपे जाईल, पण काँग्रेसने स्वतंत्र उमेदवार रिंगणात आणायचे ठरविल्यास सतेज पाटील यांना कसरत करावी लागेल. कदाचित त्यावेळी दुबळा उमेदवार देऊन पाटील यांच्याकडून मंडलिक यांना अप्रत्यक्ष मदत केली जाईल, अशी शक्यता वर्तविली जात आहे. जर मंडलिक यांनी सेना सोडली तर जिल्हा प्रमुख विजय देवणे यांना संधी मिळेल, असे कार्यकर्त्यांचे अंदाज आहेत. निवडून येणार्‍या उमेदवाराला प्राधान्य असा भाजपचा अजेंडा असल्याने त्यांच्याकडून महाडिक यांना पक्षात दाखल करण्यासाठी जोरदार प्रयत्न केले जातील, पण दोन्ही काँग्रेसच्या नेत्यांनी महाडिक विरोधात रान उठविण्यासु सुरुवात केल्याने येणारी निवडणूक कोणालाच सोपी जाणार नाही, अशी चिन्हे आहेत.