होमपेज › Kolhapur › कोल्हापूर बदलतेय; पर्यावरणपूरक होतेय...

कोल्हापूर बदलतेय; पर्यावरणपूरक होतेय...

Published On: Aug 24 2018 12:43AM | Last Updated: Aug 24 2018 12:05AMकोल्हापूर : प्रिया सरीकर

व्यवसाय वाढवण्यासाठी आणि टिकवून ठेवण्यासाठी कुंभार बांधवांनी हातातील निवळी सोडून प्लास्टरची कास धरली होती. पण शाडूची मुबलक उपलब्धता आणि पर्यावरणपूरक बाप्पांसाठी होणारी आग्रही मागणी, याचा परिणाम आता मूर्तीकामात दिसून आला आहे. कुंभार बांधवांनी रबरी मोल्डला मागे टाकून पुन्हा हाती निवळी घेतल्याने यावर्षी 200 टन शाडू मातीतून कुंभारवाड्यात तब्बल 80 हजार पर्यावरणपूरक गणेशमूर्ती साकारल्या गेल्या आहेत. पर्यावरणपूरक बदलाची ही नांदी टिकून राहण्यासाठी प्रयत्न आवश्यक आहेत.

प्लास्टर ऑफ पॅरिसच्या गणेश मूर्ती व त्यावर लागणारे रंग यामुळे होणार्‍या पाणी प्रदूषणाचा घातक परिणाम रोखण्यासाठी गेली अनेक वर्षे जनजागृती केली जात आहे; पण यापूर्वी अपेक्षित बदल घडला नव्हता. गोवा आणि कर्नाटक सरकारनेही प्लास्टरच्या गणेशमूर्तींवर बंदी लागू केल्याने परिणाम दिसू लागला. कारण दरवर्षी कोल्हापूरच्या हजारो मूर्ती कर्नाटकात रवाना होतात. 

शहरात शाडूचे काम अक्षरश: बंद झाल्यात जमा होते. पण जनजागृती, नागरिकांतून वाढता प्रतिसाद आणि परराज्यातील मागणी वाढल्याने गतवर्षीपासून कुंभारबांधवांनी प्लास्टरऐवजी पुन्हा शाडूची कास धरली.  

पारंपरिक कला आणि कसब टिकवून केवळ शाडूच्याच मूर्ती बनवणारी अनेक कुटुंबे काम करीत राहिली. केवळ व्यवसाय म्हणून त्यांनी कधीही या कलेकडे पाहिले नाही. अशा कुटुंबांकडे आता ग्राहकांनी आणि व्यापार्‍यांनी आपला मोर्चा वळवला आहे. 

शाडूच्याच मूर्ती बनवणारे मूर्तीकार

तुकाराम एकोंडीकर, मनोहर पुरेकर, मनोहर पाडळकर, शिवाजी तारळेकर, संतोष कातवरे, अशोक वाठारकर, दिनकर सरवडेकर, अनिल वागवेकर, महेश वडणगेकर व बंधू, सुरेंद्र पुरेकर, अशोक माजगावकर, किशोर पाडळकर, गोरख व कमलाकर, आरेकर कुटुंबीय, प्रल्हाद पुरेकर, दिनकर कातवरे. 

90 टन शाडूची उपलब्धता

बापट कॅम्प येथील कुंभार माल उत्पादक सोसायटीकडून नेहमी शाडू मातीच्या मूर्ती बनवण्यासाठी प्रोत्साहन दिले जाते. शाडूची उपलब्धता देखील करून दिली जाते. यावर्षी सोसायटीने 200 टन शाडूमाती मूर्तीकामासाठी दिली आहे. अजून 90 टन शाडूमाती उपलब्ध आहे, असे सचिव कमलाकर आरेकर यांनी सांगितले.