Thu, Mar 21, 2019 15:26होमपेज › Kolhapur › ...मग दूध संस्था गप्प का?

...मग दूध संस्था गप्प का?

Published On: Aug 23 2018 1:27AM | Last Updated: Aug 23 2018 12:04AMकुडित्रे : प्रतिनिधी 

दिवाळीच्या दरम्यान प्राथमिक सहकारी दूधसंस्था दूध उत्पादकांना दूध फरक देतात. यामध्ये गोकुळने दिलेला दूध फरक अधिक संस्थांचा वाटा घालून वाटप झाल्यामुळे दूध उत्पादकांची दिवाळी खर्‍या अर्थाने गोड होत असे; पण ‘गोकुळ’ने आगामी 2018-19 मध्ये गाय दूधपुरवठ्यावर दूध दर फरक न देण्याचा निर्णय घेतल्याने दूध उत्पादकांची दिवाळी कडू होणार आहे. याचा परिणाम पुढील वर्षी जाणवणार आहे. या निर्णयामुळे दूध उत्पादकांना 33 कोटी रुपयांचा फटका बसणार आहे.

अल्पभूधारक, भूमिहिनांचे ‘अर्थ’कारण बिघडणार

साखर उद्योग हा जिल्ह्याच्या अर्थकारणाचा केंद्रबिंदू असला तरी ऊस दराच्या बेभरवशामुळे शेतकरी आर्थिक अरिष्टात सांपडला आहे; पण शेतकर्‍यांना खर्‍या अर्थाने दूध व्यवसायाने तारले आहे. ऊस उद्योगात केवळ ऊस उत्पादक शेतकरी आहेत; पण दूध उद्योगात सबल शेतकर्‍यांपासून भूमिहीन शेतकरी, अल्पभूधारक शेतकरी शेतमजूर आहेत. त्यामुळे या व्यवसायातील चढ-उतारामुळे ग्रामीण भागातील अर्थकारण बिघडते. 8, 18, 28 तारखेला हमखास मिळणार्‍या दूध बिलामुळे गरीब शेतकर्‍यांची चूल पेटते.

‘गोकुळ’ची परंपरा होणार खंडित 33 कोटी 13 लाखांचा फटका 

आर्थिक वर्षात संघास पुरवठा केलेल्या गाय दूध दराला प्रतिलिटर 1 रुपया 65 पैसे दूध दर फरक दिला जातो. दरवर्षी यात वाढच होत गेली आहे. गायीच्या अतिरिक्‍त दुधाचे कारण पुढे करीत दूध दरात कपात झाली. 

सरकारच्या अनुदानाच्या घोषणेनंतर दोन रुपये दरवाढ झाली. तोपर्यंत गोकुळने गायीच्या दूध उत्यादकांना 2018 - 19 च्या कालावधीतील म्हणजे 1 एप्रिल 2018 ते 31 मार्च 2019 या कालावधीतील दूध दर फरक न देण्याचा निर्णय घेतला आहे. 

गोकुळ रोज सरासरी साडेपाच लाख लिटर गायीचे दूध येते. वार्षिक 20 कोटी 07 लाख 50 हजार लिटर्स गाय दूध संकलित होते. यावर प्रतिलिटर 1 रुपये 65 पैसे दराने सुमारे 33 कोटी 13 लाख रुपये दूध फरकावर दूध उत्पादकांना पाणी सोडावे लागणार आहे.

वाढ दोन रुपयांची आणि कपात...

शासनाकडून पाच रुपये अनुदान घेऊन गोकुळने दूध उत्पादकांना दोन रुपये दिले; पण फरकाच्या माध्यमातून 1 रुपये 65 पैसे काढून घेतले. म्हणजे दूध उत्पादकांच्या पदरात फक्‍त 35 पैसेच!