Sun, Jul 21, 2019 06:10होमपेज › Kolhapur › महापालिकेच्या परवाना विभागात चोरी

महापालिकेच्या परवाना विभागात चोरी

Published On: Dec 17 2017 1:28AM | Last Updated: Dec 17 2017 12:52AM

बुकमार्क करा

कोल्हापूर : प्रतिनिधी

महापालिकेच्या परवाना विभागाचे कार्यालय अज्ञातांनी फोडून फाईल्सच्या अनेक गठ्ठ्यांसह रजिस्टर पळवून नेल्याचा प्रकार शनिवारी उघडकीला आला. याप्रकरणी रात्री उशिरा लक्ष्मीपुरी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे चोरट्याचा शोध घेण्यात येत आहे.

येथील शिवाजी मार्केटमध्ये परवाना विभागाचे कार्यालय आहे. गुरुवारी सायंकाळी कार्यालय बंद करून कर्मचारी निघून गेले. शुक्रवारी मनपा वर्धापनदिनाची सुट्टी जाहीर करण्यात आल्याने दिवसभर कार्यालय बंद होते. शनिवारी सकाळी अधिकारी, कर्मचारी आल्यानंतर हा प्रकार उघडकीला आला. कार्यालयाला लागून असलेल्या खोलीचे कुलूप तोडल्याचे, तसेच फाईल्सचे गठ्ठे व रजिस्टर पळवून नेल्याचे प्रथमदर्शनी दिसून आले. खोलीतील अन्य फायली व साहित्य विस्कटून टाकण्यात आल्याचे दिसून आले.

परवाना अधीक्षक सचिन दत्तात्रय जाधव व अन्य अधिकार्‍यांनी परिस्थितीची पाहणी करून रात्री अनोळखी व्यक्तीविरुद्ध लक्ष्मीपुरी पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद केला. 1980 ते 2015 या काळातील फाईल्स व रजिस्टर पळवून नेण्यात आल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. परवाना विभागात झालेल्या चोरीची महापालिका वर्तुळात दिवसभर उलट-सुलट चर्चा चालू होती.