Tue, Jul 16, 2019 23:53होमपेज › Kolhapur › साजरी करू ‘इको फ्रेंडली रंगपंचमी’

साजरी करू ‘इको फ्रेंडली रंगपंचमी’

Published On: Mar 06 2018 12:38AM | Last Updated: Mar 05 2018 11:04PMकोल्हापूर : प्रतिनिधी

गेल्या काही वर्षांपासून कोल्हापूरकर रंगपंचमीमध्ये रासायनिक रंगांपेक्षा नैसर्गिक रंगाला प्राधान्य देऊ लागले आहेत. आजही ‘इको फ्रेंडली’ रंगपंचमीमध्ये अवघे कोल्हापूर न्हाऊन निघणार आहे. पाणी बचतीचा मूलमंत्र जोपासत कोरडी रंगपंचमी साजरी करण्यासाठी तरुणाई सज्ज झाली आहे. 

शहरातील महाद्वार रोड, भवानी मंडप, पापाची तिकटी, ताराबाई रोड, पानलाईन, महानगरपालिका, लक्ष्मीपुरी, राजारामपुरी आदी ठिकाणी रंगोत्सवाची तयारी पूर्ण झाली आहे. छोटा भीम, स्पायडरमॅन या लहानग्यांच्या आवडत्या हिरोंसह मोठ्या बंदुकीच्या आकारातील पिचकार्‍यांसह बच्चे कंपनी सज्ज झाली आहे. 

रंगपंचमीच्या पूर्वसंध्येला रात्री उशिरापर्यंत बाजारात खरेदीसाठी आबालवृद्धांसह तरुणाईची गर्दी उसळली होती. रंगपंचमीच्या पूर्वसंध्येलाच बच्चे कंपनीने विविध रंगांची उधळण करत रंगोत्सव साजरा केला. युवा वर्गाच्या उत्साहाला उधाण आले होते. रंगोत्सवासाठी रेन डान्सही तयारी करण्यात आली आहे. गल्ली-बोळातही रंगपंचमीची तयारी पूर्ण झाली आहे. सोमवारी सकाळपासूनच रंगोत्सवाचा माहोल तयार झाला आहे. यंदाही कोल्हापूरकरांनी पर्यावरणपूरक रंगपंचमी साजरी करण्यासाठी सज्ज झाली आहे. पर्यावरणास कोणत्याही प्रकारची हानी न पोहोचविणारे, हवा व पाण्याची प्रदूषण न करणारे असे तब्बल एक हजार किलो पर्यावरपूरक रंगांची निर्मिती निसर्गमित्र संस्थेने तयार केले आहेत. या नैसर्गिक रंगांची देखील मोठ्या प्रमाणात खरेदी-विक्री झाली आहे.

घातक रंगांपासून सावधान...

अजूनही ओले रंग, पेस्ट, पावडर आणि वॉरनिशचा रंगपंचमीनिमित्त काहीजनांकडून सर्रास वापर केला जातो. या रंगाचे परिणाम तत्काळ दिसून येतात तर काही दीर्घकाळाने जाणवतात. अशा रंगांपासून सावध राहून नैसर्गिक व पर्यावरणपूरक रंगपंचमी साजरी करावी, असे आवाहन विविध संस्था, संघटनांकडून करण्यात आले आहे.

परीक्षार्थी मित्रांचे शैक्षणिक नुकसान करू नका...

“रंगपंचमी दिवशी दहावी, बारावीच्या परीक्षेला जाणार्‍या विद्यार्थ्यांना वाटेत अडवून त्यांच्यावर रंग टाकून त्यांचे शैक्षणिक नुकसान करू नका. परीक्षार्थी मित्रांना पेपरला जाताना सहकार्य करा”, असे सामाजिक भान जपणारे मेसेज नेटकर्‍यांकडून सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. 

दहावी, बारावीची परीक्षा सुरू असून विद्यार्थी अभ्यासात मग्‍न आहेत. रंगपंचमी सणादिवशी दहावी व बारावीचे पेपर आहेत. रंगपंचमी दिवशी पेपरला सुट्टी नसल्याने विद्यार्थी व पालकांची चिंता वाढली आहे. रंगपंचमी दिवशी रस्त्यावरून जाताना पाल्याच्या अंगावर कोणी रंग टाकू नये, यासाठी दक्षता म्हणून काही पालक स्वत:च विद्यार्थ्यांना परीक्षेला सोडायला जाणार आहेत. कोल्हापूर विभागीय शिक्षण मंडळाकडूनही परीक्षेला जाणार्‍या विद्यार्थ्यांना त्रास होऊ नये, याची सर्वांनी दक्षता घ्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे. दुसरीकडे रंगपंचमीच्या एक दिवस अगोदरच शाळा व महाविद्यालयांतील तरुणाई रंगात नाहून गेली. मित्र- मैत्रिणींच्या अंगावर विविध रंगांची उधळण करीत विद्यार्थ्यांनी कॉलेज कॅम्पसमध्ये जल्लोषात रंगपंचमी साजरी केली. 

पिचकारीचे पाणी..अन् रंगांची गाणी..रंगपंचमीच्या सणाची अशी अनोखी कहाणी..विभन्‍न रंगांनी रंगलेला सोहळा..लहान-मोठ्यांचा उत्साह आहे जगा वेगळा..अशा रंगीबेरंगी शुभेच्छा देणार्‍या पोस्टसह नैसर्गिक रंगांचा वापर, रंगपंचमी सामाजिक ऐक्याची, पाणी वाचविण्याची असे व्हॉटस् अ‍ॅप, फेसबुकवर मेसेज अपलोड करून नेटिझन्सकडून समाज प्रबोधन करण्यात येत आहे. ‘नैसर्गिक रंगांचा वापर करूया, पाण्याचा अपव्यय टाळूया’,‘रंगात रंगपंचमीच्या रंगू या, रंग सामाजिक विद्वेषाला विसरूया, सोडूनी भेद नी भाव, ऐक्य रंग उधळूया’, ‘या सर्वांनी एकत्र येऊन पाणी वाचवूया, कोरडी रंगपंचमी खेळूया’ असेही मेसेज सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.