Tue, May 21, 2019 00:03होमपेज › Kolhapur › पोलिसांच्या मारहाणीत तरुण बेशुद्ध

पोलिसांच्या मारहाणीत तरुण बेशुद्ध

Published On: May 07 2018 2:02AM | Last Updated: May 07 2018 2:00AMकोल्हापूर : प्रतिनिधी

मद्यधुंद पोलिसांनी केलेल्या मारहाणीत तरुण गंभीर जखमी झाला. रविवारी रात्री दाभोळकर कॉर्नर येथील पादचारी उड्डाण पुलाजवळ हा प्रकार घडला. लाथाबुक्क्यांसह दगड-विटांनी मारहाण झाल्याने बेशुद्ध पडलेल्या तरुणाला सीपीआरमध्ये दाखल करण्यात आले. मार्शल मुकुंद गर्दे (वय 25, रा. मातंग वसाहत, राजारामपुरी) असे या जखमी तरुणाचे नाव आहे. या घटनेची माहिती मिळताच नातेवाईक, मित्र सीपीआरमध्ये आल्याने प्रचंड तणावाचे वातावरण निर्माण झाले. पोलिसांचा मोठा फौजफाटा तैनात करून परिस्थितीवर नियंत्रण ठेवण्यात आले.

मार्शेल गर्दे यांच्या नातेवाईकांकडे बारशाचा कार्यक्रम होता. हा कार्यक्रम आटोपून तो मित्रांसह रात्री 11 च्या सुमारास हॉटेलमध्ये जेवणासाठी गेला होता. जेवण आटोपून तो मित्रांसह बाहेर पडला. यावेळी मार्शेल लघूशंकेसाठी रस्त्याकडेला गेला. याचवेळी त्या ठिकाणी काही साध्या गणवेशातील पोलिस थांबले होते.

एका पोलिसांचा खाली पडलेला मोबाईल मार्शेल यांनी पाहिला, त्याची कल्पना त्याने त्या पोलिसाला दिली. साहेब तुमचा मोबाईल खाली पडला आहे, असे मार्शेल यांनी सांगताच, त्यातील एक पोलिस संतापला. तु आम्हाला कोण सांगणार असा सवाल करत त्याने आम्ही पोलिस आहोत असे दरडावले. त्यावर मार्शेल यांनी साहेब मी फक्त तुमचा मोबाईल पडल्याचे तुम्हाला सांगितले, त्यावर चिडलेल्या पोलिसाने मार्शेलच्या कानाखाली लावली.

अचानक झालेल्या या प्रकाराने मार्शेलसह त्याचे मित्र भांबावले. साहेब तुम्ही पोलिस आहात म्हणून काहीही करणार का, आम्ही काय केले, तुमचा मोबाईल पडला एवढेत तुम्हाला सांगितले होते ना, त्यावर सर्वच पोलिस भडकले आणि त्यांनी मार्शेलला बेदम मारहाण करण्यासा सुरवात केली. त्यांच्या तावडीतून सुटका करून बाहेर पडणार्‍या मार्शेलच्या मागे दगड-वीटा घेऊन पोलिस लागले. काहीच अंतरावर गाठून त्याला पुन्हा बेदम मारले. या मारहाणीत मार्शेल बेशुध्द होऊन जागेवर कोसळला. मार्शेल खाली पडल्याचे पाहताच पोलिसांनी मात्र, धूम ठोकली.

दरम्यान मार्शेलच्या मित्रांनी त्याला सीपीआरमध्ये दाखल केले. ही माहिती त्याच्या नातेवाईक, मित्रांना कळताच त्यांनी सीपीआरमध्ये धाव घेतली. मोठ्या संख्येने लोक सीपीआर आवारात दाखल झाल्याने मोठा तणाव निर्माण झाला. संबधित पोलिसांवर तत्काळ कारवाई करावी अशी आक्रमक मागणी नातेवाईकांनी केली.

शहर पोलिस उपअधिक्षक डॉ. प्रशांत अमृतकर, करवीरचे पोलिस उपअधीक्षक सुरज गुरव यांच्यासह शाहूपुरी, लक्ष्मीपुरी, जुना राजवाडा, राजारामपुरी पोलिस ठाण्याचे निरीक्षक आदींसह अधिकारी, कर्मचारीसीपीआरमध्ये दाखल झाला. डॉ.अमृतकर यांनी नातेवाईकांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला. मात्र, प्रथम पोलिसांवर कारवाई करा अशी मागणी नातेवाईक करत होते. डॉ. अमृतकर यांनी प्रारंभी जखमीवर चांगले उपचार करू, दोषींवर योग्य ती कारवाई होईल, कोणाचीही गय केली जाणार नाही, असे सांगत नातेवाईकांना शांत करण्याचा प्रयत्न केला. यानंतर पोलिस अधिकार्‍यांनी जखमींची भेट घेऊन विचारपूस केली.

मार्शेलच्या डोक्याला गंभीर दुखापत

मार्शेलला पोलिसांनी बेदम मारहाण केल्याचे स्पष्ट होत आहे. त्याच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली असून अंगावर मोठे वळ दिसत होते. त्याचा शरीराचा
काही भाग काळा-निळाही दिसत होता. सुमारे दोन तास त्याला शुध्द आली नव्हती. मध्यरात्री, त्याच्या डोक्याचे सीटी स्कॅन करण्यात आले. रात्री उशिरापर्यंत त्याची प्रकृती चिंताजनक होती.

मद्यधुंद पोलिस खेळाडू

तरूणाला नाहक मारहाण करणार्‍या पोलिसांनी मद्यपान केले होते असा आरोप करण्यात आला आहे. काही पोलिसांना तर नीट उभारताही येत नव्हते अशी परिस्थिती होती. हे सर्व पोलिस खेळाडू असल्याचेही सांगण्यात येते. कसबा बावडा येथे झालेल्या स्पर्धेत यशस्वी कामगिरी केल्यानंतर त्याचा जल्लोष करण्यासाठी सहा पोलिस या हॉटेलमध्ये आले होते, अशीही माहिती पुढे आली आहे.

पोलिसांना कशाची गुर्मी?

शहरात गुन्हेगारीवर नियंत्रण नाही, अवैध धंद्यांना ऊत आला आहे. त्याकडे लक्ष देण्याऐवजी सर्वसामान्यावर अत्याचार करण्याचे पोलिसांचे प्रकार वाढत चालले आहे. मोबाईल पडला आहे, असे चांगले सांगत असतानाही पोलिसांनी मारहाण केली. पोलिसांना इतकी कशाची गुर्मी आहे, तेच खरे गुंड आहेत, त्यांच्यावर कारवाई करा अशी आक्रमक मागणी यावेळी नातेवाईक, मित्रांनी केली.