Wed, Jul 15, 2020 22:51होमपेज › Kolhapur › थेट पाईपचे पाणी दोन वर्षे अशक्य!

थेट पाईपचे पाणी दोन वर्षे अशक्य!

Last Updated: Nov 18 2019 1:26AM
कोल्हापूर : सतीश सरीकर 

कोल्हापूरवासीयांचे स्वप्न साकारण्यासाठी तब्बल 488 कोटींची थेट पाईपलाईन योजना मंजूर झाली. केंद्र व राज्य शासनाकडून योजनेच्या हिश्श्यापोटी संपूर्ण निधीही आला. परंतु, त्याचा नीट उपयोग महापालिका प्रशासनाला करून घेता आला नसल्याचे वास्तव आहे. योजना पूर्ण करण्यासाठी ठेकेदाराला असलेली मूळ मुदत संपून दोनवेळा मुदतवाढ देण्यात आली. त्या मुदतीतही योजना पूर्ण होणार नसल्याचे स्पष्ट झाले आहे. 

गेल्या पाच वर्षांत केवळ 60 टक्केच काम पूर्ण झाले आहे. योजनेचे काम रेंगाळले असल्याने आणखी दोन वर्षे पूर्ण होणे अशक्य आहे. दरम्यान, ठेकेदार कंपनीला आतापर्यंत तब्बल 326 कोटी बिलापोटी देण्यात आले आहेत.  

थेट पाईपलाईन योजनेसाठी मुख्य असलेली काळम्मावाडी धरण क्षेत्रातील हेडवर्क्सची कामे अद्याप अपूर्ण आहेत. यात काळम्मावाडी धरण क्षेत्रात हेडवर्क्स बांधणे, आरसीसी इंटेकवेल, आरसीसी इन्स्पेक्शनवेल, आरसीसी कनेक्टिंग पाईप, आरसीसी जॅकवेल व पंप हाऊस, दोन जुळी जॅकवेल, पंप हाऊस, पंपिंग मशिनरी, दाबनलिका, आरसीसी ब—ेक प्रेशर टँक आदी योजनेसाठी अत्यंत महत्त्वपूर्ण असलेल्या कामांचा समावेश आहे. 

काळम्मावाडी गावात वन विभागाच्या हद्दीत 800 मी. जलवाहिनी टाकण्याच्या कामाला अद्यापही प्रारंभ झालेला नाही. केंद्र शासनाच्या वन विभागाकडून या कामासाठी परवानगी आवश्यक आहे. त्याशिवाय वन विभागाच्या हद्दीत काम करणे अशक्य आहे. एमएसईबीची केबल शिफ्टिंग झाली नसल्याने नरतवडे हायस्कूलजवळ 900 मीटर जलवाहिनी टाकण्याचे काम थांबले आहे. 

सोळांकूर गावातून साडेतीन किलोमीटर जलवाहिनी टाकणे अत्यावश्यक आहे; अन्यथा त्याशिवाय योजना पूर्णच होऊ शकत नाही. योजनेच्या नकाशानुसार गावातील बारा फूट रुंदीच्या रस्तावरून 1800 मि.मी. व्यासाची जलवाहिनी टाकायची आहे. मात्र, त्या रस्त्याच्या दुतर्फा घरे असून, दाट लोकवस्ती आहे. परिणामी, ग्रामस्थांचा तीव— विरोध आहे. गावातून व गावाबाहेरच्या रस्तावरूनही जलवाहिनी टाकण्यास ग्रामस्थांचा नकार आहे. त्याऐवजी गावाबाहेरच्या डोंगरावरून जलवाहिनी न्यावी, असे ग्रामस्थांचे म्हणणे आहे. कपिलेश्‍वर गावातून 600 मी. जलवाहिनी टाकण्यासही तेथील ग्रामस्थांनी विरोध केल्याने काम रखडले आहे.

केंद्र शासनाच्या ‘यूआयडीएसएसएमटी’ कार्यक्रमांतर्गत 24 डिसेंबर 2013 ला कोल्हापूरसाठी थेट पाईपलाईन योजना मंजूर झाली. 488 कोटींची योजना आहे. सुमारे 53 कि.मी. लांबीच्या पाईपलाईनचे काम आहे. ठेकेदार कंपनीला 24 ऑगस्ट 2014 ला महापालिकेतर्फे वर्कऑर्डर देण्यात आली. कामासाठीचा कालावधी 22 नोव्हेंबर 2016 रोजी संपला. कासवाच्या गतीने सुरू असलेल्या थेट पाईपलाईन कामाच्या ठेकेदाराला फेब—ुवारी 2017 मध्ये दीड वर्षासाठी एकदा मुदतवाढ दिली होती. 31 मे 2018 रोजी ती मुदत संपली. या मुदतीत ठेकेदाराने 40 टक्केही काम पूर्ण केलेले नाही. त्यानंतर पुन्हा 31 डिसेंबर 2019 पर्यंत दुसरी मुदतवाढ देण्यात आली आहे. तरीही काम संथगतीने सुरू असल्याने या कालावधीतही ते पूर्ण होणे अशक्य आहे. योजना पूर्ण होण्यासाठी आणखी किती वर्षे लागतील? हे महापालिका अधिकारीही ठोकपणे सांगू शकत नसल्याचे वास्तव आहे.

कोल्हापूर शहरासाठी पहिल्यांदाच एवढ्या मोठ्या रकमेची योजना मंजूर झाली. त्यासाठी 0.56 टक्के फी देऊन कन्सल्टंटही नियुक्‍त करण्यात आला होता. परंतु, पुण्यातील या युनिटी कन्सल्टंट कंपनीने नुसती फी घेण्याचेच काम केले. डीपीआर पूर्ण केलाच नाही. त्यामुळेच योजनेचे काम सुरू होऊन बंद पाडल्यावरच केंद्र व राज्य शासनाच्या विविध विभागांच्या जमिनीतून थेट पाईपलाईन जाणार असून, त्यासाठी परवानगी नसल्याचे स्पष्ट झाले. त्यामुळे योजनेचे काम रेंगाळण्याला कन्सल्टंटचा हलगर्जीपणा आणि अधिकार्‍यांच्या निष्काळजीपणाबरोबरच ठेकेदाराचे संथगतीने सुरू असलेले काम कारणीभूत असल्याचे सांगण्यात येते.

योजनेंतर्गत धरण क्षेत्रातील महत्त्वाची अपूर्ण कामे...

काळम्मावाडी धरण क्षेत्रात हेडवर्क्स बांधणे - अ) आरसीसी इंटेकवेल - व्यास 4.50 मी., उंची 10 मी., ब) आरसीसी इन्स्पेक्शनवेल नं. 1 - व्यास 4 मी., उंची 10 मी., क) आरसीसी इन्स्पेक्शनवेल नं. 2 - व्यास 4 मी., उंची 17.20 मी., ड) आरसीसी कनेक्टिंग पाईप - व्यास 1800 मि.मी., एन.पी. 4, लांबी 150 मी., व्यास 1400 मि.मी., एन.पी. 4, लांबी 160 मी., ई) आरसीसी जॅकवेल व पंप हाऊस 18 मी. व्यासाची दोन जुळी जॅकवेल एकूण उंची 46 मी., पंप हाऊस - 36.50 मी. व 21.50 मी., आयताकृती उंची 11 मी.
पंपिंग मशिनरी - 940 अश्‍वशक्‍तीचे 4 पंप्स हेड 68 मीटर, पाणी फेक क्षमता 26,10,400 लिटर्स प्रतितास, कार्यान्वित पंप 3, स्टँड बाय पंप - 1 
दाबनलिका - 1800 मि.मी. व्यास, एम.एस. पाईप लांबी 100 मी. 
आरसीसी ब—ेक प्रेशर टँक - क्षमता 15 लाख लिटर्स, उंची 20 मी., आऊटलेट लेव्हल 670 मी.