Fri, Jul 19, 2019 22:03होमपेज › Kolhapur › मेघडंबरीचे काम १५ ऑगस्टपर्यंत पूर्ण करा

मेघडंबरीचे काम १५ ऑगस्टपर्यंत पूर्ण करा

Published On: Jul 05 2018 1:38AM | Last Updated: Jul 04 2018 10:37PMकोल्हापूर : प्रतिनिधी 

गेली साडेचार वर्षे शाहू समाधी स्मारकाचे काम सुरूच आहे. अनेक वर्षे काम रखडले असून ते पूर्ण होणार कधी, असा सवाल करत महापौर शोभा बोंद्रे यांनी कोणत्याही स्थितीत 15 ऑगस्टपर्यंत मेघडंबरीचे काम पूर्ण करावे. त्यानंतर संपूर्ण स्मारकाचे काम पंधरा दिवसांत पूर्ण करावे, अशा सक्‍त सूचना बुधवारी महापालिका अधिकार्‍यांना दिल्या. कोणत्याही स्थितीत सप्टेंबरमध्ये समाधी स्मारकाचे लोकार्पण करण्यात येईल, असेही यावेळी महापौर बोंद्रे यांनी स्पष्ट केले. यावेळी आयुक्‍त डॉ. अभिजित चौधरी, उपमहापौर महेश सावंत, काँग्रेस गटनेता शारंगधर देशमुख उपस्थित होते. 

कोल्हापूर महापालिकेच्या वतीने टाऊन हॉलजवळील नर्सरी बागेत राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांचे समाधी स्मारक बांधण्यात येत आहे. साडेचार वर्षांपासून सुरू असलेले काम अद्याप पूर्ण झालेले नाही. त्यामुळे महापौर, आयक्‍तांसह पदाधिकारी व अधिकार्‍यांनी स्मारक व बापट कॅम्पमध्ये सुरू असलेल्या मेघडंबरीच्या कामाची पाहणी केली. 

यावेळी सभागृह नेते दिलीप पोवार, विरोधी पक्षनेता विलास वास्कर, शिक्षण समिती सभापती अशोक जाधव, महिला व बालकल्याण समिती सभापती सुरेखा शहा, नगरसेवक अफजल पिरजादे, नगरसेविका मेहजबीन सुभेदार,  शोभा कवाळे, माजी नगरसेवक इंद्रजित बोंद्रे उपस्थित होते. समाधी स्मारकाचे काम रेंगाळल्याने सर्वांनी अधिकार्‍यांना धारेवर धरले. उपमहापौर सावंत यांनी आता संरक्षक भिंतीच्या कामात हलगर्जीपणा नको, असे सांगत ठेकेदाराचे चोचले पुरविण्यासाठी महापालिका नाही, असा इशारा दिला. यावेळी मराठा महासंघाचे जिल्हाध्यक्ष वसंतराव मुळीक उपस्थित होते. 

29 नोव्हेंबर 2013 ला समाधी स्मारक कामाचे भूमिपूजन करण्यात आले होते. शाहूंचे समाधीस्मारक साकारण्यासाठी महापालिका निधीतून 1 कोटी 3 लाखांचा निधी उपलब्ध करून देण्यात आला आहे. त्याअंतर्गत बहुतांश सिव्हिल वर्क पूर्ण झाल्याचे सांगण्यात येते. समाधीस्थळावर ब्राँझची मेघडंबरी बसविण्यात येणार आहे. त्याचे काम अवघड असून शिल्पकलेचा उत्कृष्ट नमुना म्हणून तो साकारण्याचा प्रयत्न केला जात आहे. मेघडंबरीचे काम 80 टक्के पूर्ण झाल्याचे सांगितले जाते. उर्वरित काम पूर्ण झाल्यावर समाधी स्मारकावर मेघडंबरी बसविण्यात येईल. त्यानंतर स्मारकाचे काम पूर्ण होईल. स्मारकाभोवती कंपाऊंड घालण्यासाठी 1 कोटी 7 लाखांची निविदा महापालिका प्रशासनाने प्रसिद्ध केली आहे. लवकरच त्याचे तांत्रिक छाननी होऊन निविदा प्रक्रिया पूर्ण होईल. त्यानंतर कंपाऊंडचे काम सुरू करण्यात येणार आहे, असे महापालिका अधिकार्‍यांनी सांगितले.

‘त्या’ वृत्ताची गंभीर दखल...

कोल्हापूरचे भाग्यविधाते राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांची समाधी स्मारकाची इच्छा पूर्ण करण्याचा संकल्प महापालिका प्रशासनाने केला. त्यासाठी 4 कोटी 18 लाखांचा प्रस्ताव तयार करण्यात आला. महापालिका निधीतून कामही सुरू करण्यात आले. परंतु, साडेचार वर्षे झाली अद्याप स्मारकाचे काम पूर्ण झालेले नाही. परिणामी, शाहू महाराजांची समाधी स्मारकाची इच्छा पूर्ण होणार कधी, असा प्रश्‍न शाहूप्रेमींतून उपस्थित केला जात आहे. त्याविषयी राजर्षी शाहूंच्या जयंतीदिनी 26 जूनला दै. ‘पुढारी’मध्ये वृत्त प्रसिद्ध करण्यात आले होते. त्या वृत्ताची गंभीर दखल घेत महापौर बोंद्रे यांनी आयुक्‍त व सर्व अधिकार्‍यांसह स्मारकाची पाहणी करून काम त्वरित पूर्ण करण्याच्या सक्‍त सूचना दिल्या.