होमपेज › Kolhapur › पर्यायी पुलाचे काम आज सुरू

पर्यायी पुलाचे काम आज सुरू

Published On: May 21 2018 1:05AM | Last Updated: May 21 2018 1:04AMकोल्हापूर : प्रतिनिधी

पर्यायी पुलाचे बांधकाम सोमवारपासून (दि. 21) सुरू करण्यात येणार आहे. रविवारी रात्री पोलिस अधीक्षक कार्यालयात झालेल्या बैठकीत ही माहिती पोलिस अधीक्षक संजय मोहिते यांनी कृती समितीला दिली. पाऊस सुरू होईपर्यंत शक्य तितके काम करण्याबाबत यावेळी चर्चा झाली. मंगळवारी होणारे आंदोलन थांबवण्यासाठी ही खेळी असेल, तर त्याचे परिणाम गंभीर होतील, असा इशारा कृती समितीच्या वतीने देण्यात आला.

पर्यायी पुलाच्या बांधकामाची ‘वर्क ऑर्डर’ देण्यात आली. मात्र, पावसाळ्यात हे काम करणे शक्य नसल्याचे ठेकेदार कंपनीने स्पष्ट केले. या कामातील तांत्रिक अडचणी निदर्शनास आणत कंपनीने काम करण्यास असमर्थता दर्शवली होती. वर्क ऑर्डर काढूनही काम सुरू होत नाही, प्रशासनाने केलेली ही फसवणूक आहे, असा आरोप करत कृती समितीने मंगळवारी (दि. 22) शिवाजी पुलावर भिंत बांधून त्यावरील वाहतूक बंद करण्याचा इशारा दिला होता.

मंगळवारी होणार्‍या आंदोलनाबाबत कृती समितीच्या वतीने शहरासह ग्रामीण भागात आजपासून जनजागृती सुरू केली. या आंदोलनामुळे कायदा व सुव्यवस्थेचा तसेच या मार्गावरील वाहतुकीचा गंभीर प्रश्‍न निर्माण होण्याची शक्यता निर्माण झाल्याने पोलिस अधीक्षक संजय मोहिते यांनी रविवारी रात्री तातडीची बैठक बोलवली. या बैठकीला अप्पर जिल्हाधिकारी नंदकुमार काटकर, अप्पर पोलिस अधीक्षक तिरुपती काकडे, राष्ट्रीय महामार्ग विभागाचे कार्यकारी अभियंता विजय कांडगावे, शहर पोलिस उपअधीक्षक डॉ. प्रशांत अमृतकर, करवीरचे पोलिस उपअधीक्षक सूरज गुरव, पोलिस निरीक्षक दिनकर मोहिते, वाहतूक पोलिस निरीक्षक अशोक धुमाळ उपस्थित होते. या बैठकीत प्राथमिक चर्चा झाली. यानंतर ठेकेदार कंपनीचे प्रतिनिधी एन. डी. लाड यांच्यासह कृती समितीचे निमंत्रक आर. के. पोवार, बाबा पार्टे, अशोक पवार व रमेश मोरे यांना पाचारण करण्यात आले.

बैठकीत पाऊस सुरू होईपर्यंत जितके होईल तितके काम करावे, अशी सूचना कंपनीला करण्यात आली. यानंतर मोहिते यांनी पुलाचे काम सोमवारपासून सुरू होईल, असे सांगितले. काम सुरू होणार असल्याने आंदोलन मागे घ्यावे, अशी विनंती कृती समितीला करण्यात आली. मात्र, त्याबाबतचा निर्णय सोमवारी होणारे काम पाहून सायंकाळी निर्णय घेतला जाईल, असे समितीच्या वतीने सांगण्यात आले.