Sun, Jul 21, 2019 05:35होमपेज › Kolhapur › पर्यायी शिवाजी पुलाचे काम बंदच

पर्यायी शिवाजी पुलाचे काम बंदच

Published On: Jul 10 2018 1:02AM | Last Updated: Jul 10 2018 12:35AMकोल्हापूर : प्रतिनिधी

पंचगंगेवरील पर्यायी पुलाचे काम राष्ट्रीय महामार्ग विभागातील अधिकार्‍यांच्या वादात रखडले आहे. पुलाच्या उंचीवरून सुरू असलेल्या वादामुळे पायासाठी करण्यात येणारे डिझाईन अद्याप अंतिम झालेले नाही. यामुळे पुलाचे काम बंदच आहे.  तातडीने निर्णय झाला नाही तर पुरामुळे हे काम आणखी लांबण्याची शक्यता आहे.

पर्यायी पुलासाठी कोल्हापूरच्या दिशेने अबडमेंटचे काम हाती घेण्यात आले आहे. आवश्यक पाया न लागल्याने पुलाच्या उंचीपासून (टॉप लेवल) खाली किती अंतरावर पाया असावा, याबाबत विभागात एकमत झालेले नाही. पायाच्या पातळीसाठी  81.900 मीटर उंचीला मुंबई येथील ‘ड्राईंग सर्कल’च्या अधिकार्‍यांनी सहमती दर्शवली होती. या ठिकाणी ‘फ्रॅक्‍चर रॉक्स’ (दगड) असला तरी तो एकसंध असल्याने या ठिकाणी असलेली विहीर मुजवण्यात यावी, अशी विभागाची भूमिका होती. त्यानुसार विहीर मुजवण्यात आली. मात्र, त्यापुढे अद्याप डिझाईन आले नसल्याने पुढील काम बंदच आहे.

या कामावर देखरेख करण्याची जबाबदारी असलेल्या उपअभियंत्यांनी 81.200 मीटर उंचीचे मोजमाप वरिष्ठ कार्यालयाला कळवले आहे. त्यामुळे आणखी खोदकाम करावे लागणार आहे. मात्र, आणखी खोदकाम केले तर ते शिवाजी पुलालाही धोकादायक आहे. त्यासह विहीर मुजवण्यासाठी केलेल्या काँक्रीटलाही तडे जाण्याची शक्यता आहे. यामुळे आणखी खोदकाम करू नये, असे वरिष्ठ अधिकार्‍यांंचे म्हणणे आहे. मात्र, त्याच विभागाच्या उपअभियंत्याने कळवलेल्या उंचीनुसार आणखी खोदकाम करावे लागणार आहे. यामुळे उंची कोणती  ग्राह्य धरायची याबाबत  निर्णय झालेला नाही. त्यामुळे पायाचे डिझाईनही अंतिम झालेले नाही.

संबंधित उपअभियंत्यांनी कशाच्या आधारे ही उंची निश्‍चित केली याबाबत वरिष्ठांनी त्यांच्याकडे माहिती मागवली आहे. ज्या वेळी विहीर मुजवण्याचे काम सुरू होते, त्यावेळी संबंधित अभियंत्यांनी ते काम का थांबवले नाही? त्यावेळी उंचीबाबत का माहिती दिली नाही, असे सवाल आता उपस्थित होत आहेत. हे काम ‘बी-2’ प्रकारच्या निविदेतील आहे. यामुळे कामाचे डिझाईन वरिष्ठ अधिकार्‍यांना द्यावे लागते. त्यानुसार ठेकेदार काम करतो. कामाच्या ठिकाणी ‘लाईन आऊट’ करणे, मंजूर डिझाईननुसार काम होते की नाही, यावर देखरेख ठेवणे ही जबाबदारी उपअभियंत्यांची आहे. त्यानुसार पर्यायी पुलाच्या कामात ती जबाबदारी पार पाडली गेली का, असा सवालही  उपस्थित करण्यात आला आहे. दरम्यान, याबाबत कार्यकारी अभियंता विजय कांडगावे यांच्याशी संपर्क साधला असता, त्यांच्याशी संपर्क झाला नाही.

तातडीने निर्णय घेण्याची गरज

गेल्या काही दिवसांपासून पावसाची उघडीप आहे. या कालावधीत पायाचे काम पूर्ण करणे शक्य झाले असते. सध्या धरणे भरत आली आहेत, पावसाचा जोर वाढू शकतो. पंगंगेच्या पातळीतही वाढ होण्याची शक्यता आहे. पाणी वाढले तर काम करणे अशक्य होणार आहे. यामुळे याबाबत तातडीने निर्णय घेऊन थांबलेले काम सुरू करण्याची गरज आहे.