होमपेज › Kolhapur › पर्यायी पुलाचे काम सुरू

पर्यायी पुलाचे काम सुरू

Published On: May 22 2018 1:25AM | Last Updated: May 22 2018 1:04AMकोल्हापूर : प्रतिनिधी

पंचगंगेवरील पर्यायी पुलाचे काम अखेर सोमवारी सुरू करण्यात आले. कृती समिती आणि ठेकेदार यांच्यात वादावादी झाल्याने काही काळ वातावरण तणावपूर्ण बनले होते. या कामात सातत्य राहील, अशी स्पष्ट ग्वाही जिल्हा प्रशासनाने दिल्याने मंगळवारी शिवाजी पुलावर होणारे आंदोलन स्थगित करण्यात येत असल्याचे कृती समितीने जाहीर केले.

पंचगंगेवरील पर्यायी पुलाच्या कामाची वर्क ऑर्डर दिल्यानंतरही कंपनीने तांत्रिक कारणास्तव काम करता येत नसल्याचे पत्र विभागाला दिले. यामुळे कृती समितीने मंगळवार, दि. 22 रोजी शिवाजी पुलावर आंदोलन करण्याचा इशारा दिला. यासाठी गावागावांत जनजागृती करण्यात येत होती. हे आंदोलन स्थगित करावे, यासाठी जिल्हा प्रशासनाच्या वतीने कृती समितीला विनंती करण्यात येत होेती. दरम्यान, रविवारी रात्री पोलिस अधीक्षक संजय मोहिते यांनी तातडीची बैठक घेऊन सोमवारपासून काम सुरू होईल, असे स्पष्ट केले होते.

राष्ट्रीय महामार्ग विभागाचे कार्यकारी अभियंता विजय कांडगावे सोमवारी सकाळी नऊच्या सुमारास शिवाजी पुलावर आले. यापाठोपाठ काही वेळात ठेकेदार कंपनीचे प्रतिनिधी एन. बी. लाड जेसीबी व ट्रॅक्टर-ट्रॉलीसह आले. शहर पोलिस उपअधीक्षक डॉ. प्रशांत अमृतकर यांच्यासह लक्ष्मीपुरी पोलिस ठाण्याचे निरीक्षक तानाजी सावंत, जिल्हा विशेष शाखेचे पोलिस निरीक्षक शशिराज पाटोळे, शहर वाहतूक शाखेचे निरीक्षक अशोक धुमाळ आदीही फौजफाट्यासह शिवाजी पुलावर आले. सकाळी साडेदहाला सपाटीकरणाला  सुरुवात केली. नदीपात्रातील काम करण्यासाठी स्मशानभूमीच्या बाजूने रस्ता करता येईल का, याचीही यावेळी पाहणी केली. दरम्यान क्रीडाईचे अध्यक्ष महेश यादव, बिल्डर्स असोसिएशनचे राजू लिंग्रस, कोल्हापूर कॉलिंगचे पारस ओसवाल, अर्थमुव्हिंग असोसिएशनचे रवी पाटील, उद्योगपती चंद्रकांत जाधव आदी शिवाजी पुलावर आले.

कृती समिती-ठेकेदार वादावादी

सपाटीकरणाचे काम सुरू असताना सकाळी साडेअकराच्या सुमारास कृती समितीचे निमंत्रक आर.के. पोवार, बाबा पार्टे, अशोक पवार व रमेश मोरे शिवाजी पुलावर आले. पर्यायी पुलासाठी कोल्हापूरच्या बाजूला जेसीबीच्या सहाय्याने सपाटीकरण करण्यात येत होते, ते पाहून समितीचे कार्यकर्ते आक्रमक झाले. हे काम करण्यास असमर्थता दर्शवत होता, तर आता कसे काय काम करत आहात. असा सवाल ठेकेदाराला केला. हे काम करायचे असेल तर ते रीतसर करा. वर्क ऑर्डरनुसार काम करता येणार नाही, असे प्रशासनाला दिलेले पत्र मागे घ्या आणि काम सुरू करत असल्याचे पत्र द्या, त्यानंतर काम करा, अशी भूमिका कृती समितीने घेतली. मंगळवारी आंदोलन स्थगित करण्यासाठी हा प्रकार सुरू आहे का? आम्हाला काय खुळे समजता का? अशी विचारणा करत कृती समिती कार्यकर्ते आणि ठेकेदार यांच्यात वादावादी सुरू झाली. 

हा वाद सुरू असताना पारस ओसवाल, महेश यादव आदी त्या ठिकाणी आले. त्यांना पाहताच कार्यकर्ते पुन्हा आक्रमक झाले. गेली तीन वर्षे हे आंदोलन सुरू आहे, या कालावधीत कुठे होता, असा सवाल ओसवाल यांना करण्यात आला. काही कार्यकर्त्यांनी त्यांना बाजूला हटकण्याचा प्रयत्न केला. पुलाचे काम जनतेसाठी होत आहे, त्याला मदत करण्याच्या उद्देशाने आल्याचे ओसवाल यांनी सांगितले. पोलिस निरीक्षक सावंत यांनी मध्यस्थी करत हा वाद मिटवण्याचा प्रयत्न केला.

दरम्यान, या प्रकाराची माहिती पोलिस अधीक्षक मोहिते यांना मिळाली. ते तातडीने शिवाजी पुलावर आले. तुम्हाला काम बंद पाडायचे आहे का, असा थेट सवाल कृती समितीला करत तुम्हाला व्यक्‍ती महत्त्वाची की काम महत्त्वाचे ते सांगा, तुम्ही ठेकेदाराशी बोलू नका, माझ्याशी बोला, असे मोहिते यांनी सांगितले. त्यावर हे काम उद्याचे आंदोलन स्थगित होण्यासाठी सुरू केले का, ते नियमित सुरू राहणार असेल तर त्याबाबत खात्री आहे का, अशी विचारणा कृती समितीने मोहिते यांच्याकडे केली. त्यावर मोहिते यांनी या कामाची जबाबदारी मी घेतली आहे. याबाबत बैठक घेऊ, त्यात चर्चा करू आणि त्यानंतर तुम्ही निर्णय घ्या, तोपर्यंत काम सुरू ठेवू द्या, अशी विनंती समितीला केली. त्यावर सायंकाळपपर्यंत होणारे काम पाहू आणि त्यानंतर निर्णय घेऊ, असे समितीच्या वतीने सांगत समितीचे कार्यकर्ते जनजागृतीसाठी रवाना झाले.

हौदाचे बांधकाम पाडण्यास प्रारंभ

वातावरण निवळल्यानंतर दुपारी एकच्या सुमारास पुन्हा कामाला प्रारंभ झाला. जेसीबीच्या सहाय्याने या ठिकाणी असणार्‍या हौदाचे बांधकाम पाडण्यास सुरुवात करण्यात आली. सायंकाळपर्यंत हौदाचे बहुतांशी बांधकाम पाडण्यात आले होते. हे बांधकाम पाडल्यानंतर तेथे खोदकाम सुरू करण्यात येणार आहे.

प्रशासनावर विश्‍वास ठेवण्याचे आवाहन

दरम्यान, दुपारी पोलिस अधीक्षक कार्यालयात जिल्हा व पोलिस प्रशासन आणि कृती समितीची बैठक झाली. या बैठकीला विविध गावांतील लोकप्रतिनिधींसह कृती समितीचे प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते. प्रारंभी प्रभारी जिल्हाधिकारी नंदकुमार काटकर, पोलिस अधीक्षक मोहिते यांनी समितीला बांधकाम परवानगीसाठी सुरू असलेल्या प्रयत्नांची माहिती दिली. लवकरच परवानगी मिळेल आणि पूर्ण क्षमतेने कामही सुरू होईल, प्रशासनावर विश्‍वास ठेवा, असे आवाहन करत आंदोलन मागे घेणार की करणार याबाबत चर्चा करा, निर्णय घ्या आणि तो सांगा, असे म्हणत काटकर आणि मोहिते बैठकीच्या ठिकाणाहून आपल्या कार्यालयात गेले. कृती समितीचे कार्यकर्ते आणि विविध गावातील लोकप्रतिनिधींची चर्चा झाली. यानंतर काटकर, मोहिते यांना पुन्हा बोलावून घेण्यात आले.

तूर्त आंदोलन स्थगित

काटकर म्हणाले, जनतेला वेठीस धरून काही साध्य होणार नाही. प्रशासनावर विश्‍वास ठेवा आणि आंदोलन मागे घ्या. मोहिते म्हणाले, आपल्या आंदोलनाच्या रेट्यामुळेच हे काम सुरू झाले आहे. पूल आवश्यकच आहे. त्यामुळे सुरू झालेल्या कामात सातत्य राहील, अशी ग्वाहीही त्यांनी दिली. यानंतर समितीच्या वतीने निमंत्रक आर. के. पोवार म्हणाले, या कामाची जबाबदारी प्रशासनाने घेतली आहे. सुरू केलेले काम थांबू नये, हीच आंदोलकांची इच्छा आहे. यामुळे दहा दिवस हे काम कसे चालते हे पाहिले जाईल, तोपर्यंत आंदोलन स्थगित करण्यात येत असल्याचे त्यांनी जाहीर केले.

यावेळी कृती समितीचे बाबा पार्टे, अशोक पवार, दिलीप पवार, रमेश मोरे, किशोर घाटगे, रघुनाथ कांबळे, सतीशचंद्र कांबळे, चंंद्रकांत जाधव, राजू लिंग्रस, जयकुमार शिंदे, दिलीप माने, तानाजी पाटील, संभाजी जगदाळे, प्रयाग चिखलीच्या सरपंच उमा पाटील, माजी जि. प. सदस्य संभाजी पाटील, आंबेवाडीचे सरपंच सिकंदर मुजावर, रजपूतवाडीचे माजी सरपंच रामलिंग रजपूत, वडणगेचे सरपंच सचिन चौगले, निगवेचे मारुती किडगावकर, माजी जि. प. सदस्य, बी. एच. पाटील, चिखलीचे सुरेश पाटील, राजाराम कासार, सर्जेराव एकशिंगे, इंद्रजित पाटील आदी उपस्थित होते.