Mon, Jun 17, 2019 18:26होमपेज › Kolhapur › भाचीसह तिघींवर कोयत्याने हल्ला

भाचीसह तिघींवर कोयत्याने हल्ला

Published On: Apr 18 2018 1:41AM | Last Updated: Apr 18 2018 12:55AMकोल्हापूर / बाजारभोगाव : प्रतिनिधी

पडसाळीहून कोल्हापूरकडे जाणार्‍या एस.टी.त शामराव तुकाराम माळवी (वय 56, रा. पोंबरे, ता. पन्हाळा) याने अल्पवयीन भाचीसह प्रवास करणारी बहीण व अन्य एका महिलेवर धारदार कोयत्याने हल्ला केला. दरम्यान, प्रवाशांसह जमावाने या माथेफिरू हल्‍लेखोराला बेशुद्ध पडेपर्यंत चोप देऊन पोलिसांच्या हवाली केले. ही घटना कांडरवाडी ते काळजवडेदरम्यान मंगळवारी सकाळी घडली.

या हल्ल्यात स्नेहल प्रकाश कांबळे (17), संगीता कांबळे (36, रा. पोंबरे) व गिरजाबाई मारुती गवळी (54, मानवाड, ता. पन्हाळा) जखमी झाल्या आहेत. त्यांच्यावर जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत. हल्‍लेखोराविरुद्ध खुनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल झाला आहे, असे सहायक पोलिस निरीक्षक मंगेश देसाई यांनी सांगितले.

चालक दशरथ डवरी हे एस.टी. (एम.एच. 20 डी 9016) घेऊन पडसाळीतून रंकाळा स्टँडकडे येत होते. मानवाडमध्ये आल्यानंतर गिरजाबाई गवळी, तर पोंबरेत शामराव माळवी, स्नेहल कांबळे व तिची आई आदी प्रवासी चढले. गाडी कांडरवाडीत आली असता अचानकपणे शामराव माळवीने सत्तुराने स्नेहल कांबळेच्या डोक्यात तीन, तर शेजारी बसलेल्या गिरजाबार्ईंच्या डोक्यात एक वार केला. रक्‍ताच्या चिळकांड्या उडू लागताच एस.टी.तील अन्य प्रवाशांनी आरडाओरडा सुरू केला. एस.टी.त हलकल्लोळ माजला. काही युवकांनी माळवीच्या हातातून सत्तूर काढून घेईपर्यंत एस.टी. काळजवडेत पोहोचली होती. 

एस.टी.तील कॉलेज तरुणांनी माळीची धुलाई केल्यानंतर तो आणखी भडकला. तरुणांच्या हातातील कोयता हिसकावून घेऊन पुन्हा बहीण व भाचीवर हल्ल्याचा त्याने प्रयत्न केला. त्यात गिरजाबाई गवळी यांच्या डोक्याला मोठी इजा झाली. स्नेहलसह गिरजाबाई एस.टी.त रक्‍ताच्या थारोळ्यात कोसळल्या. 

प्रक्षुब्ध प्रवाशांनी माळवीला एस.टी.तून बाहेर फरफटत आणून अंगावरील कपडे फाटेपर्यंत चोप दिला. कळे पोलिस ठाण्याचे सहायक निरीक्षक देसाई व त्यांच्या सहकार्‍यांनी जमावाच्या तावडीतून माळवीला ताब्यात घेतले. हल्लेखोरासह सर्व जखमींना शासकीय रुग्णालयात दाखल केले आहे. एस.टी.तील या थरारक घटनेमुळे पन्हाळा, करवीर तालुक्यात खळबळ उडाली आहे.

पोलिसांनी दिलेली माहिती अशी, शामराव माळी याचा पोंबरेत चिकन विक्रीचा व्यवसाय आहे. त्याला दारूचे व्यसन जडले आहे. सकाळपासून मद्यधुंद अवस्थेत तो पोंबरे बसस्थानक परिसरात वावरत होता. स्नेहल कोल्हापुरात शिक्षण घेत आहे. कॉलेजमध्ये शिकवणीचे वर्ग सुरू असल्याने ती आईसमवेत पडसाळी-कोल्हापूर एस.टी.तून कोल्हापूरकडे येत होती.

 

Tags : kolhapur, kolhapur news, crime, woman attacked, st bus,