होमपेज › Kolhapur › वाहतूक पोलिसांनी पर्यटकांची लूट थांबवावी

वाहतूक पोलिसांनी पर्यटकांची लूट थांबवावी

Published On: May 31 2018 1:38AM | Last Updated: May 30 2018 11:16PMकोल्हापूर : प्रतिनिधी 

पार्किंगची सुविधा उपलब्ध करावी, पर्यटकांवर होणारी दंडात्मक कारवाई थांबवावी, अशा मागण्यांसाठी शिवसेनेच्या वतीने शहर वाहतूक शाखेवर बुधवारी मोर्चा काढण्यात आला. वाहतूक नियोजनाबाबत महापालिका, पोलिस प्रशासन यांची तातडीने बैठक घेण्याची मागणी यावेळी करण्यात आली. बुधवारी दुपारी साडेबारा वाजता सीपीआर चौकातून मोर्चाला सुरुवात झाली. हातात भगवे ध्वज घेऊन शिवसैनिक मोर्चात सहभागी झाले होते. ‘पर्यटकांची लूट करणार्‍या पोलिसांचा, धिक्‍कार असो’, ‘पार्किंग सुविधांकडे दुर्लक्ष करणार्‍या महापालिका प्रशासनाचा, निषेध असो’, ‘जय भवानी, जय शिवाजी’ अशा घोषणा यावेळी देण्यात आल्या. 

शहर वाहतूक शाखेसमोर मोर्चा आल्यानंतर शिवसेना जिल्हाप्रमुख संजय पवार, विजय देवणे यांनी वाहतूक शाखेचे निरीक्षक अशोक धुमाळ, मनपा कनिष्ठ अभियंता राजेंद्र वेल्हाळ यांना धारेवर धरले. पार्कींग सुविधा कधी उपलब्ध होणार ?, बंद सिग्‍नल चालू होणार की नाही?,  झेब्रा क्रॉसिंगचे पट्टे रंगविणे, सम-विषम पार्कींगचे बोर्ड लावणे, गर्दीच्या ठिकाणी पोलिस, सूचना फलक उभारणे अशा विविध प्रश्‍नांची सरबत्ती शिवसैनिकांनी केली. 

संजय पवार यांनी काही मोजके पोलिस पर्यटकांची अडवणूक करुन पैसे उकळत असल्याचे निदर्शनास आल्याचे सांगितले. तसेच बेशिस्त पार्कींगमुळे क्रेनमधून आणल्या जाणार्‍या दुचाकींच्या दंडातून शासनाला किती रुपये मिळतात याचाही हिशोब द्यावा, अशी मागणी करण्यात आली. तसेच वाहतूक कोंडीबाबत वरिष्ठ अधिकारी, प्रशासन, महापालिका यांची 1 जून रोजी स्वतंत्र बैठक आयोजित करण्याची मागणी करण्यात आली.यावेळी विजय देवणे, सुजित चव्हाण, शिवाजीराव जाधव, दुर्गेश लिंग्रस, शुभांगी पोवार, शशीकांत बिडकर, अवधूत साळोखे, दिलीप जाधव, राजू जाधव, राजेंद्र पाटील, रणजीत आयरेकर यांच्यासह शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.