Mon, Sep 24, 2018 03:18होमपेज › Kolhapur › चोरट्यांनी एसटीचा नियंत्रण कक्ष पेटविला

चोरट्यांनी एसटीचा नियंत्रण कक्ष पेटविला

Published On: Dec 24 2017 1:44AM | Last Updated: Dec 23 2017 11:50PM

बुकमार्क करा

कागल : प्रतिनिधी

कागल बसस्थानकामधील वाहतूक नियत्रंण कक्षामध्ये चोरीच्या उद्देशाने गेलेल्या चोरट्यांच्या हाती रोख रक्‍कम लागली नाही म्हणून चोरट्यांकडून नियत्रंण कक्षालाच आग लावण्यात आली आहे. वाहतूक नियंत्रक कक्षाला लागलेल्या आगीत कामगार पासचे  फॉर्म, आरक्षण फॉर्म, अनाऊन्समेंट सिस्टीम, कंट्रोल चार्ट आदीसह महत्त्वाची कागदपत्रे जळून खाक झाली आहेत. त्याचबरोबर तिजोरी, खुर्च्या आगीच्या भक्षस्थानी पडल्या. यामध्ये अंदाजे दोन लाख रुपयांचे नुकसान झाल्याची फिर्याद वाहतूक नियंत्रक  मारुती  पाटील यांनी कागल पोलिसांत दिली आहे. चोरट्यांनी एकाच रात्री एक नियंत्रण कक्ष पेटवून दिला, तर 4-5 दुकाने फोडण्याचा प्रयत्न केला.

चोरट्यांनी बसस्थानक परिसरातील बँकेच्या एटीएम मशिनची केबिन, मोबाईल दुकान, सराफ दुकान, लॉटरी सेंटर, औषध दुकान फोडण्याचा प्रयत्न केला; मात्र या ठिकाणी फारसे काही चोरीला गेलेले नाही. सकाळी सहा वाजता नियत्रंण कक्ष उघडण्यासाठी गेलेल्या कर्मचार्‍यांना आग लागल्याचे निदर्शनास आले.  कर्मचार्‍यांनी कागल नगरपालिकेच्या अग्‍निशमन  दलाच्या मदतीने आग आटोक्यात आणली.