Thu, Apr 25, 2019 11:34होमपेज › Kolhapur › अपघाताच्या कारणाचे गूढ कायम

अपघाताच्या कारणाचे गूढ कायम

Published On: Jan 29 2018 1:40AM | Last Updated: Jan 28 2018 11:56PMकोल्हापूर : प्रतिनिधी

चालकाची डुलकी नडली की, अ‍ॅक्सल तुटल्याने शिवाजी पुलाचा कठडा तोडून ट्रॅव्हलर थेट पंचगंगा नदीत शंभर फूट खोल कोसळली. याचे गूढ रविवारी दुसर्‍या दिवशीही पोलिस दलासह प्रादेशिक परिवहन (आरटीओ) विभागाच्या वरिष्ठ अधिकार्‍यांना उकलले नव्हते. आरटीओ व विशेष तज्ज्ञ पथकाकडून ट्रॅव्हलर तपासणीचा अहवाल सोमवारी उपलब्ध झाल्यानंतर नेमके कारण स्पष्ट होईल, असे पोलिस अधीक्षक संजय मोहिते यांनी रविवारी स्पष्ट केले.

चालकाचा ताबा सुटून टेम्पो ट्रॅव्हलर येथील शिवाजी पुलाचा कठडा तोडून पंचगंगा नदीत कोसळल्याने झालेल्या भीषण दुर्घटनेत पुणे जिल्ह्यातील बालेवाडी येथील 13 जण जागीच ठार झाल्याची घटना नुकतीच घडली आहे. कोल्हापूर शहरात आजवर झालेल्या अपघातात हा सर्वाधिक बळी घेणारा भीषण अपघात ठरला आहे.

प्रथमदर्शनी ट्रॅव्हलर चालकाच्या डुलकीमुळे दुर्घटना घडल्याचे सांगण्यात येत असले तरी सीसीटीव्ही फुटेजमधील घटनाक्रम लक्षात घेतल्यास डुलकीसह अन्य काही कारण असू शकते, असा निष्कर्ष वरिष्ठ पोलिस अधिकारी, प्रादेशिक परिवहन (आरटीओ) अधिकार्‍यांतून पुढे येत आहे.

आरटीओ पथकासह वाहन तज्ज्ञांनीही संबंधित ट्रॅव्हलरची शनिवारी दोनवेळा तपासणी केली. पंचगंगा पुलावरून कोल्हापूरकडे येणारी ट्रॅव्हलर क्षणार्धात कठड्याच्या दिशेने वळल्याने कदाचित अ‍ॅक्सल तुटल्यामुळेही अचानक ही स्थिती उद्भवू शकते,असा वरिष्ठाधिकार्‍यांसह तज्ज्ञांचाही सूर आहे.

पोलिस अधीक्षक मोहिते यांनीही वेगवेगळ्या शक्यता गृहीत धरून नेमके कारण शोधण्याचा प्रयत्न सुरू असल्याचे सांगितले. आरटीओसह तज्ज्ञांकडून ट्रॅव्हलरच्या तपासणीचा अहवाल आज दुपारपर्यंत शक्य आहे. असे ‘करवीर’चे पोलिस निरीक्षक तथा तपासाधिकारी दिलीप जाधव यांनी स्पष्ट केले.

जखमींना पुण्याला हलविले

पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी नातेवाईकांशी चर्चा करून जखमींना उपचारासाठी पुणे अथवा मुंबईला हलविण्याची विनंती केली. त्यानुसार जखमी प्राजक्ता नांगरे, मंदा केदारी, मनीषा वरखडे यांना पुण्यातील लता मंगेशकर हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. जखमींवरील वैद्यकीय उपचाराचा खर्च शासन करेल, असेही पालकमंत्र्यांनी स्पष्ट केले.

मुख्यमंत्र्यांकडून जखमींच्या प्रकृतीची विचारपूस

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दुर्घटनेतील मृत व जखमींच्या नातेवाईकांशी संपर्क साधून विचारपूस केली. जखमींच्या वैद्यकीय उपचारासाठी शासन सर्व सहाय्य करेल, असेही ते म्हणाले.