Sat, Apr 20, 2019 08:05होमपेज › Kolhapur › सराईत चोरट्यांनी वर्षभर झोप उडविली!

सराईत चोरट्यांनी वर्षभर झोप उडविली!

Published On: Dec 21 2017 1:53AM | Last Updated: Dec 20 2017 11:20PM

बुकमार्क करा

कोल्हापूर : दिलीप भिसे

सरत्या वर्षात गंभीर गुन्ह्यांमध्ये काहीअंशी घट असली तरी सराईत चोरट्यांसह चेनस्नॅचर टोळ्यांनी समाजातील सर्वच घटकांची अक्षरश: झोपच उडविली आहे. घरफोडी, जबरी चोरीच्या घटनांसह महागड्या वाहन चोरीप्रकरणी वर्षभरात 2 हजार 395 गुन्ह्यांची भर पडली आहे. सराईत टोळ्यांनी थैमान घालूनही एकाही गंभीर गुन्ह्याचा छडा लावण्यात यंत्रणेला यश आले नाही.

स्थानिक गुन्हे अन्वेषण वगळता जिल्ह्यातील पोलिस ठाण्यांतर्गत प्रभारी अधिकार्‍यासह डी.बी. पथकाची कामगिरी दिसून आली नाही. सरत्या वर्षात चोरी,चेनस्नॅचिंग गुन्ह्यात लाखो रुपयांच्या ऐवजांवर चोरट्यांनी डल्ला आहे. त्यात दरोडा 12, जबरी चोरी 127, घरफोडी 291, दिवसा चोरी 35, रात्री 256, सर्वचोरी 837, दुचाकी 422,चारचाकी 14, इतर चोरी 411 अशा 2 हजार 395 गुन्ह्यांची नोंद झाली आहे. गुन्हेगारीचा वाढता आलेख पोलिस यंत्रणेला निश्‍चितच भुषणावह नाहीत.

40 खुनांसह 90 हल्ल्यांचे प्रयत्न

खून, खुनाच्या प्रयत्नासह सदोष मनुष्य वधाच्या गुन्ह्यात कमालीची वाढ झाली आहे. खून 40, खुनाचा प्रयत्न 90 अशा घटना घडल्या आहेत. सदोष मनुष्यवधप्रकरणी 9 गुन्हे दाखल आहेत. गतवर्षीच्या तुलनेत त्यात वाढ झाली आहे.  

महिला अत्याचाराच्या गुन्ह्यात वाढ 

लैंगिक अत्याचाराच्या गुन्ह्यात काहीअंशी घट झाली आहे. मात्र विनयभंग, छेडछाडीमध्ये  वाढ झाली आहे. 81 निष्पाप महिला कामांधवासनेच्या शिकार बनल्या आहेत. विनयभंगप्रकरणी  196 गुन्हे दाखल आहेत. गतवर्षी 164 घटना घडल्या होत्या. त्यात 32 गुन्ह्यांची वाढ झाली आहे. शारीरिक, मानसिक छळाला कंटाळून 8 महिलांनी मृत्यूला कवटाळले आहे.

सरकारी कर्मचार्‍यांवर हल्ले वाढले

शासकीय कर्मचार्‍यांवरील हल्ल्याच्या घटनांमध्ये सरत्या वर्षात वाढ झाली आहे. जानेवारी ते 15 डिसेंबर 2017 काळात हल्ल्याच्या 60 घटना घडल्या आहेत. गतवर्षीच्या तुलनेत 16 टक्क्यांनी वाढ झाली आहे. राजकीय हस्तक्षेपासह गंभीर गुन्ह्यात संशयितांना आश्रय देण्याच्या घटनांमध्येही वाढ झाली आहे.

साडेतीन हजारांवर टपोर्‍यांवर खटले

कॉलेज कॅम्पसमधील टपोर्‍यांच्या उचापती युवतींसह पालकांना डोकेदु:खी ठरल्या आहेत. त्याला पायबंद घालण्यासाठी जिल्ह्यात पोलिस ठाण्यांतर्गत निर्भया पथकांची नियुक्‍ती करण्यात आली. पथकाला कारवाईचे अधिकारही देण्यात आले. सरत्या वर्षात 3 हजार 574 टवाळखोरांवर खटले दाखल करण्यात आले आहेत. गतवर्षी 1 हजार 477 गुन्ह्यांची नोंद झाली होती.

गुंडागर्दी आणि टोळ्यांची दहशत

गुंडागर्दीसह संघटित टोळ्यांच्या दहशतीचे स्तोम जिल्ह्यात वाढू लागले आहे. गर्दी मारामारीप्रकरणी जिल्ह्यात सरत्या वर्षात 237 गुन्ह्यांची पोलिस ठाण्यांतर्गत नोंद झाल्याचे दिसून येेते. दुखापतीप्रकरणी 579 गुन्हे दाखल आहेत. गतवर्षाच्या तुलनेत 70 गुन्ह्यांची त्यात वाढ झाली आहे. जिल्ह्यात चालू वर्षात लहान-मोठे असे एकूण 335 अपघात घडले आहेत. शिवाय ठकबाजी, विश्‍वासघात या गुन्ह्यांत वाढ झाल्याचे दिसून येते.

वर्षभरात 172 जणांचे अपहरण

वर्षभरात 172 जणांच्या अपहरणाच्या घटना घडल्याचे सांगितल्यास त्यावर फारसा कोणाचा विश्‍वास बसणार नाही. मात्र, जिल्ह्यात या घटना घडल्या आहेत. अर्थात प्रेमायणातून... अल्पवयीन मुलींच्या अपहरणाच्या घटनांचा त्यात समावेश आहे. अल्पवयीन मुलगी बेपत्ता अथवा गायब झाल्यास सुधारित कायद्यानुसार अपहरणाचा गुन्हा दाखल होतो. दाखलपैकी बहुतांशी गुन्ह्यात कथित मजनूंना कायदेशीर कारवाईची झळ सोसावी लागली आहे.