होमपेज › Kolhapur › अतिरिक्‍त शिक्षकांची नजर संचमान्यतेकडे

अतिरिक्‍त शिक्षकांची नजर संचमान्यतेकडे

Published On: Jun 01 2018 2:05AM | Last Updated: May 31 2018 10:17PMकोल्हापूर : राजन वर्धन

माध्यमिक शिक्षण विभागात गतवर्षी झालेल्या अतिरिक्‍त शिक्षकांचा प्रश्‍न चांगलाच गाजला. जिल्ह्यात जवळपास 150 शिक्षकांचा प्रश्‍न मार्गी लागला आणि केवळ 50 शिक्षक अतिरिक्‍त राहिले. या शिक्षकांचे लक्ष आगामी संचमान्यतेकडे लागून राहिले आहे. आजपासून (दि.1) संचमान्यतेचा कॅम्प लागणार आहे. चार दिवस विविध तालुक्यांतील शाळांतील शिक्षकांना आपली कागदपत्रे घेऊन हजेरी लावावी लागणार आहे. दरम्यान, अतिरिक्‍त शिक्षकांच्या समायोजनानुसार हजर करून न घेतलेल्या जिल्ह्यातील 19 शाळांची पदे व्यपगत (रद्द) करण्यासाठी शासनाकडे प्रस्ताव पाठविला आहे. यामुळे या सर्व शाळांची संचमान्यता होणार नाही. 

गतवर्षी बोगस शाळा किंबहुना संस्थांची पोलखोल करण्यासाठी पटपडताळणी मोहीम राज्य पातळीवर राबविण्यात आली होती. त्यात कोल्हापूर जिल्ह्यातील अनेक शाळांत बोगसगिरी दिसून आली होती. यातूनच अनेक शाळांतील शिक्षक अतिरिक्‍त ठरले होते. प्रारंभी, जिल्ह्यात जवळपास दोनशेवर शिक्षक माध्यमिक विभागात अतिरिक्‍त ठरले होते. त्यामुळे बोगस पटावरील शाळा चालविणार्‍यांचे धाबे दणाणले होते. यामुळे मुले प्रत्यक्षात नसताना केवळ अनुदान व शिक्षकांचे वेतन शासनाकडून लाटले जात होते, याला चांगलाच अटकाव बसला. किंबहूना, ज्या शाळेत पटच नाही, अशा शाळेतील शिक्षक शिकवणीपेक्षा नेतेगिरीच जादा करत होते. 

दरम्यान, शिक्षणाधिकारी म्हणून किरण लोहार रूजू झाले. त्यांनी शासन निर्णयाला डावलून नवीन भरती करू पाहणार्‍या संस्थांना लगाम घालत अतिरिक्‍त शिक्षकांना सामावून घेण्याचे आदेश निर्गमित केले. सुरुवातीला अनेक संस्थांनी त्याला नकार दिला; पण लोहार यांनी अशा संस्थांना अतिरिक्‍त शिक्षकांना हजर करून न घेणार्‍या शाळांतील मुख्याध्यापकांचे वेतन रोखले. त्यालाही न जुमानणार्‍या संस्थांना संबंधित पदाची गरज नसल्याचे समजून, हे पद व्यपगत करण्याचा इशारा शासन अध्यादेशाच्या प्रतिसहीत दिला. पण त्याला न जुमानणार्‍या जिल्ह्यातील 19  शाळांची पदे व्यपगत केली आहेत. यामध्ये आजरा - 5, करवीर - 2, हातकणंगले -7, शिरोळ - 1 या तालुक्यांसह कोल्हापूर शहरातील 4  शाळांचा समावेश आहे. जिल्ह्यात सद्यस्थितीला 50 शिक्षक अजूनही अतिरिक्‍त ठरत आहेत.

जिल्ह्यातील सर्व शाळांची संचमान्यता करण्याचे काम शैक्षणिक वर्षापूर्वी केले जाते. त्यानुसार संस्थेतील मंजूर पदे, कार्यरत वर्गनिहाय पदे, त्यांची वेतन पत्रके, सेवाज्येष्ठता यादी, अतिरक्‍त होणार्‍या अथवा रिक्‍त पदावर हजर करून न घेतलेल्या शिक्षकांची सरल पोर्टलवर भरलेली माहिती, तसेच निवृत्त शिक्षक, वाढलेली अथवा कमी झालेली विद्यार्थी संख्या यानुसार प्रत्येक शाळेतील शिक्षक संख्या निश्‍चित करण्यात येणार आहे. त्यामुळे अतिरिक्‍त 50 शिक्षकांचे लक्ष आता या संचमान्यतेकडे लागून राहिले आहे. सोयीच्या शाळा मिळविण्यासाठी  शिक्षकांनी आतापासून तयारी सुरू केली आहे.