Sat, Aug 17, 2019 16:13होमपेज › Kolhapur › चौकशीसाठी नोटीस देऊनही पोलिस अधीक्षक सपकाळ गैरहजर

चौकशीसाठी नोटीस देऊनही पोलिस अधीक्षक सपकाळ गैरहजर

Published On: Jul 24 2018 1:32AM | Last Updated: Jul 24 2018 1:24AMकोल्हापूर : प्रतिनिधी

भारत राखीव बटालियनच्या कोल्हापूर युनिटमधील लाचखोरीप्रकरणी ‘एसीबी’ने चौकशीची व्याप्ती वाढविली आहे. बटालियनचे पोलिस अधीक्षक (समादेशक) खुशाल सपकाळ यांना चौकशीसाठी ‘एसीबी’ कार्यालयात उपस्थित राहण्यासाठी नोटीस बजावूनही गैरहजर राहिल्याने सोमवारी सायंकाळी पुन्हा त्यांना नोटीस लागू करण्यात आली आहे.मुख्य संशयित व पोलिस उपअधीक्षक मनोहर गवळी, वरिष्ठ पोलिस निरीक्षक मधू सकटसह सहा जणांच्या जामीन अर्जावर जिल्हा व सत्र न्यायाधीश (4) आर. एस. निंबाळकर यांच्या न्यायालयात सोमवारी सुनावणी झाली. दोन्हीही बाजूकडून युक्‍तिवाद झाला. त्यावर मंगळवारी निर्णय शक्य आहे.

खेळाडू पोलिसाकडून चाळीस हजार रुपयांची लाच घेताना लाचलुचपत प्रतिबंधक पथकाने भारत बटालियनचे पोलिस उपअधीक्षक मनोहर गवळी, निरीक्षक सकट, प्रमुख लिपिक राजकुमार रामचंद्र जाधव, सहायक फौजदार रमेश भरमू शिरगुप्पे, आनंदा महादेव पाटील, पोलिस कान्स्टेबल प्रवीण प्रधान कोळी यांना अटक केली. न्यायालयाने त्यांना सहा दिवसांची पोलिस कोठडीही दिली आहे.

‘एसीबी’च्या चौकशीत पोलिस अधीक्षक (समादेशक) सपकाळ यांचे नाव निष्पन्‍न झाले आहे. तपासाधिकारी गिरीश गोडे यांनी सपकाळ यांना चौकशीसाठी कोल्हापूर येथील ‘एसीबी’च्या कार्यालयात उपस्थित राहण्याबाबत शनिवारी (दि. 21) नोटीस लागू केली होती.

सोमवारी (दि. 23) सकाळी अकरा ते सायंकाळी पाच वाजेपर्यंत हजर राहण्याबाबत त्यांना सूचना देण्यात आल्या होत्या. मात्र, सपकाळ अनुपस्थित राहिल्याने पुन्हा त्यांना नोटीस बजावण्यात आली आहे,  असेही गोडे यांनी सांगितले. चौकशीअंती संभाव्य कारवाईबाबत निर्णय होईल, असे ते म्हणाले. पोलिस अधीक्षकांना चौकशीसाठी नोटीस काढल्याने बटालियनच्या अधिकारी, कर्मचार्‍यांत खळबळ उडाली आहे.जेरबंद संशयित गवळीसह सहा जणांच्या जामीन अर्जावर तपासाधिकारी गोडे यांनी न्यायालयात हरकत घेतली. संशयितांना जामीन झाल्यास फिर्यादीवर दबावतंत्राचा अवलंब होऊ शकतो. फिर्यादीच्या जीवितालाही धोका निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यांचा जामीन अर्ज फेटाळण्यात यावा, अशी मागणी त्यांनी न्यायालयाकडे केली.