Fri, Jul 19, 2019 16:36होमपेज › Kolhapur › SSC :कधी मोटू, कधी पतलू बनणार्‍या विनायकचे यश

SSC :कधी मोटू, कधी पतलू बनणार्‍या विनायकचे यश

Published On: Jun 08 2018 7:33PM | Last Updated: Jun 08 2018 7:33PMकुरुंदवाड : जमीर पठाण 

घरची आर्थिक परिस्‍थिती हलाखीची, शाळेची वह्या पुस्‍तकं घेण्यासाठीही परिस्‍थिती आड येऊ लागली म्‍हणून मग विनायक अजित कोळी याने स्‍वत:च शक्‍कल लढवून शिक्षणाची कास धरली. वेगवेगळ्या कार्याक्रमाध्ये मोटू, पतलू, बेबो, जोकरचे कपडे धारण करून लहान वयातच मग लहान मुलांची करमणूक करण्यास त्याने प्रारंभ केला. या अशा कार्यक्रमातून मिळणाऱ्या पैशातून आपल्या वडिलांच्या प्रपंचालाही तो मदत करू लागला. शाळा, घर यामध्ये त्याने लहान वयातच मग लक्ष देण्यास सुरूवात केली आणि आई वडीलांना मदत करू लागला. काम करून शाळा करू लागला आणि विनायकने आपल्या विश्वासाच्या बळावर मग दहावीत ६२ टक्‍के मिळवून यश मिळवले. या त्याच्या यशात जसे कुटुंबियांचा हात आहे तसाच हात त्याच्या मित्र परिवाराचा आहे. मित्रांच्या मदतीने पुस्‍तकांची झेरॉक्‍स मारून दर्ग्यामध्ये बसून त्याने अभ्यास केला आणि यश संपादन केले.

कुरुंदवाड येथील अजित अण्णासाहेब कोळी या शेतमजुराच्या घरी जन्माला आलेल्या विनायक कोळी याची घरची परिस्थिती अत्यंत गरिबीची. परिस्‍थिती गरीबीची असली तरी विनायकची शिक्षण घेण्याची जिद्द मोठी होती. आपल्या कुटुंबावर आपल्या शैक्षणिक खर्चाचा बोजा पडू नये यासाठी काहीतरी रोजगार करण्याचे त्याने ठरवले. बाल कामगार गुन्हा कायद्यांमुळे त्याला कामही मिळत नव्हते असे असतानादेखील त्याने न खचता बाजारपेठेतील व्यापाऱ्यांच्या जाहिराती वाटण्यापासून त्याने आपल्या प्रापंचिक आणि शैक्षणिक जीवनाला सुरुवात केली.

मात्र हे कामही दररोज नसल्याने त्याने जयसिंगपूरमधून मोटू, पतलू, बेबो, जोकरचे कपडे भाड्याने आणून लग्न, विवाह, बारसे, जावळ अशा कार्यक्रमाच्या ठिकाणी जाऊन तो लहान मुलांची करमणूक करू लागला. या करमणुकीच्या माध्यमातून बेटी बचाव बरोबरच शिक्षणाचे महत्त्वही तो सांगायचा. हे सांगत असताना आपल्या पोटचा खळगा व शैक्षणिक इच्छा पूर्ण करण्यासाठी आपल्या शुभ कार्यामध्ये मला करमणुकीचे काम द्या अशी तो विनंती करून या व्यवसायातून त्याने शैक्षणिक जीवनात उज्ज्वल यश संपादन करून गरीब विद्यार्थ्यांच्या समोर आदर्श निर्माण केला.

आज सकाळपासूनच नाल साहेब दर्गा चौक परिसरातील नागरिकांनी दर्ग्यात रात्रीभर बसून अभ्यास करणाऱ्या विनायकचा निकाल काय लागला अशी विचारपूस करत होते. अनेकांची  निकाल काय लागणार अशी उत्कंठा शिगेला पोहचली होती. जोकराच्या करमणुकीच्या जीवनातून शैक्षणिक जीवन साध्य करत असलेल्या विनायकचा निकाल लागताच अनेकांना अश्रू अनावर झाले तर त्याला काहीनी उचलून खांद्यावर घेत आनंदोत्सव साजरा केला. या पुढेही शिक्षण घेऊन स्पर्धा परीक्षेच्या माध्यमातून मोठा अधिकारी होऊन आईवडिलांना सुखात ठेवण्याचे स्वप्न असल्याचे विनायकने सांगितले.