Tue, Apr 23, 2019 13:49होमपेज › Kolhapur › हंगाम मार्चअखेर गुंडाळणार?

हंगाम मार्चअखेर गुंडाळणार?

Published On: Dec 14 2017 2:18AM | Last Updated: Dec 14 2017 12:30AM

बुकमार्क करा

हमीदवाडा : मधुकर भोसले 

साखर कारखाने व ऊस उत्पादनात कोल्हापूर जिल्हा आघाडीवर आहे. म्हणजे काहीवेळेला येथील कारखान्यांचे गळीत हंगाम अगदी जूनपर्यंतदेखील लांबले आहेत. जलसमृद्ध अशा या जिल्ह्यात ऊस खूप मोठ्या प्रमाणात पिकवला जातो; पण वाढलेले साखर कारखाने व अगोदरच्या कारखान्यांनी केलेले गाळप क्षमतेचे विस्तारीकरण, यामुळे आता एप्रिल-मेपर्यंत कारखाने चालण्याचे दिवस संपले आहेत, असेच चित्र आहे. कारखानेदेखील कमी दिवसात अधिक गाळप करण्याच्या मानसिकतेत आहेत. यामुळेच यावर्षीचा गळीत हंगामदेखील मार्चपर्यंत गुंडाळण्याची चिन्हे आहेत. 

प्रतिवर्षी कारखान्यास ऊस घालणे हे शेतकर्‍यांसाठी खूप कष्टप्रद काम. त्यातही डिसेंबरअखेर ऊस नाही गेला, तर वाढत्या तापमानामुळे ऊस घालवणे आणखी दिव्यच होते. यासाठी होणार्‍या विनवण्या व खर्च पाहायलाच नको; पण गेल्यावर्षी दुष्काळी पार्श्‍वभूूमीमुळे अपवाद वगळता फेब्रुवारीअखेर कारखान्यांचे हंगाम गुंडाळले. यावर्षी दुष्काळी स्थिती नाही. मात्र, तरीही कारखान्यांची वाढती संख्या व गाळप क्षमतांचा विस्तार, यामुळे उसासाठी कारखाने आतापासूनच धावाधाव करत आहेत.

जिल्ह्यातील ऊस पिकवणार्‍या एकाच गावात एकाचवेळी सध्या 5 ते 6 कारखान्यांची तोड सुरू आहे. आता एकमेकांच्या कार्यक्षेत्रात शिरकाव करण्याबरोबरच कर्नाटकातील कारखानेही सीमेलगतच्या उसासाठी घुसले आहेत. त्यामुळे ऊसटंचाई हा विषय कारखान्यांसमोर आहेच. म्हणून तर निघालेल्या तोडग्यापेक्षा कारखान्यांनी अधिक दर दिला. कार्यक्षेत्रात ऊसतोड करताना पाळीपत्रक पाळले जाते. मात्र, बाहेरचा ऊस आणताना लावण, खोडवा, निडवा असा कोणताही भेदभाव न ठेवता मिळेल तो ऊस आणला जात आहे. त्यामुळे यावर्षी गेल्यावर्षीपेक्षा अधिक हंगाम चालला, तरी तो मार्चच्या पुढे जाईल, अशी शक्यता नाही.

उसाच्या फसव्या नोंदी 

ऊस उत्पादक शेतकरी पूर्वीप्रमाणे आता केवळ एकाच कारखान्याकडे उसाची नोंद करत नाहीत. दोन ते तीन कारखान्यांकडे एकाच क्षेत्राचा करार केला जातो. त्यामुळे कारखान्यांच्या रेकॉर्डवर जितके ऊस क्षेत्र असते. तितके प्रत्यक्षात उपलब्ध नसते. रान लवकर रिकामे करणे, चांगला ऊस दर अशा कारणांस्तव जिकडे योग्य वाटेल, तिकडे शेतकरी ऊस पुरवत असतात. त्यामुळे या फूग आणणार्‍या फसव्या नोंदीदेखील गाळपाचे उद्दिष्ट पूर्ण करताना विचारात घेण्याची वेळ कारखान्यांवर आली आहे.