होमपेज › Kolhapur › अर्भक विक्री : संशयितांना ‘पोक्सो’

अर्भक विक्री : संशयितांना ‘पोक्सो’

Published On: Jul 05 2018 1:38AM | Last Updated: Jul 04 2018 10:44PM



इचलकरंजी : वार्ताहर

कुमारी माता व विधवा महिलांची बेकायदेशीरपणे प्रसूती करून अर्भकांची विक्री केल्याच्या डॉ. अरुण पाटील प्रकरणाच्या गुन्ह्याचा तपास योग्य रितीने सुरू आहे का, या अनुषंगाने बुधवारी नवी दिल्‍ली येथील केंद्रीय दत्तक प्राधिकरण विभाग आणि जिल्हा महिला व बालविकास विभागाच्या सदस्य तसेच अधिकार्‍यांनी तपासी अधिकारी प्रभारी पोलिस उपअधीक्षक कृष्णात पिंगळे यांची भेट घेऊन माहिती घेतली. यावेळी त्यांनी गुन्ह्याच्या तपासाबाबत सविस्तर चर्चा केली. पिंगळे यांनी या प्रकरणात डॉ. अरुण पाटील याचा मुलगा ऋषिकेश पाटील याच्यावर अटकेची कारवाई करण्याबरोबरच या प्रकरणाचा सखोल तपास सुरू असल्याचे स्पष्ट केले. 

कुमारी माता व विधवा महिला यांची बेकायदेशीर प्रसूती करून, त्यांच्या अर्भकाची विक्री करण्यात येत असल्याचा प्रकार चार महिन्यांपूर्वी शहरात उघडकीस आला होता. याप्रकरणी नवीन दिल्ली येथील केंद्रीय दत्तक प्राधिकरण विभाग आणि जिल्हा महिला व बालविकास विभाग, जिल्हा बालसंरक्षण कक्ष, बालकल्याण समिती यांच्या संयुक्‍त पथकाने जवाहरनगरमधील डॉ. पाटील यांच्या दवाखान्यावर छापा टाकून डॉ.पाटील याच्यासह तपासाअंती अर्भक विकत घेणार्‍या नवरगाव येथील अमोल चहांदे व पत्नी प्रेरणा चहांदे याच्यासह डॉ.पाटील याची पत्नी उज्ज्वला यांना गजाआड केले होते. 

या गुन्ह्याचा तपास योग्य रितीने सुरू आहे का, याची माहिती घेण्यासाठी बुधवारी केंद्रीय दत्तक प्राधिकरण विभागाचे सदस्य शिवानंद डंबाळ, प्रिया चोरगे, जिल्हा महिला व बालविकास विभागाचे अधिकारी नितीन मस्के इचलकरंजीत आले होते. त्यांनी तपासी अधिकारी पोलिस उपअधीक्षक पिंगळे यांची भेट घेतली व त्यांच्याशी चर्चा केली. याबाबत पत्रकारांशी बोलताना डंबाळ म्हणाले, चार महिन्यांपूर्वी डॉ. पाटील हा साथीदारांच्या मदतीने रुग्णालयात महिला व युवतींची बेकायदेशीरपणे प्रसूती करीत होता. त्यातून अर्भकही लाखो रुपयांना विक्री केल्याचे उघडकीस आले होते. डॉ.पाटील याने अशा पद्धतीने अर्भक दत्तक देणे हे बालकांचे लैंगिक शोषण या सदरात मोडत असल्याने त्याच्यावर ‘पोक्सो’ (प्रोटेक्शन ऑफ चिल्ड्रेन फ्रॉम सेक्शुअल ऑफेन्सेस अ‍ॅक्ट) अंतर्गत कारवाई करण्यात यावी, अशी मागणी लावून धरली होती.

त्याचबरोबर या गुन्ह्याचा प्राथमिक तपास तत्कालीन पोलिस उपअधीक्षक विनायक नरळे यांच्याकडे होता. मात्र, त्यांच्याकडून समाधानकारक कारवाई न झाल्यामुळे हा तपास त्यांच्याकडून काढून घ्यावा, अशी मागणी विशेष पोलिस महानिरीक्षक विश्‍वास नांगरे-पाटील यांच्याकडे करण्यात आली होती. त्यानुसार सध्याचा तपास प्रभारी पोलिस उपअधीक्षक पिंगळे करीत आहेत. पिंगळे यांच्याकडून समाधानकारक तपास सुरू असल्याचेही यावेळी डंबाळ यांनी सांगितले.  पिंगळे यांनी दवाखान्याचा परवाना डॉ. ऋषिकेश याच्या नावे असल्याने त्यालाही सहआरोपी करून एप्रिल महिन्यात अटक केली होती. त्याचबरोबर सर्व संशयितांवर ‘पोक्सो’अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पाटील याने एका पतसंस्थेत पाच महिलांच्या नावे बनावट खाते उघडले आहे. त्यामध्ये लाखो रुपयांची रक्‍कम जमा केल्याचे उघडकीस आले असून, या खात्यावरील सर्व व्यवहार पाटील हाच पाहत असल्याचे तपासात उजेडात आले आहे. या अनुषंगानेही तपास सुरू आहे.